मित्रा, रिटायरमेंटनंतर लोक नेमके काय करत असतात? म्हणजे असं बघ की, कालपरवापर्यंत छानसे ड्रेस घालून उत्साहाने ऑफिसला जाणारा माणूस अचानक एक दिवशी सेवानिवृत्त होऊन घरी बसतो. यानंतरच्या आयुष्यात हे लोक नेमके काय करत असतात?
हे बघ भावा, माझ्या रिटायरमेंटला अजून पंधरा-वीस वर्षे आहेत, तरीपण मी असंख्य निवृत्त माणसे पाहिलेली आहेत. निवृत्तीचे शासकीय कर्मचार्यांचे वय 58 असते. प्राध्यापक आणि तत्सम मंडळींचे 60 असते. आज-काल आयुष्यमान वाढल्यामुळे वयाच्या साठीत बहुतांश लोक सक्षम आणि सक्रिय असतात. असा सक्रिय माणूस अचानक घरी बसला की, सगळ्यात जास्त काय करत असेल, तर खूप बोलायला सुरुवात करतो. वाटेल ते बोलत राहणारा माणूस म्हणजे रिटायर्ड माणूस, असेही म्हणता येईल.
तू म्हणतोस ते बरोबर आहे मित्रा! नोकरीच्या काळात त्याला वेळच नसतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत चाकरमान्याप्रमाणे नोकरी करणे आणि संध्याकाळच्या वेळी कुटुंबासाठी काम करणे एवढी दोनच कर्तव्ये त्याला असतात. कार्यालयामध्ये बॉस नावाचा व्यक्ती असल्यामुळे तिथे बोलता येत नाही आणि घरी पत्नी नावाची बॉस असल्यामुळे त्याला घरी बोलायला मिळत नाही. सहाजिकच रिटायर झाला की, त्याला ‘झाले मोकळे आकाश’ असे होते आणि तो किती बोलू आणि किती नको असे करतो; पण मला एक सांग, आज तू हा विषय का काढलास?
कारणही तसेच आहे. उच्च पदस्थ सरकारी अधिकार्यांच्या निवृत्तीनंतरच्या बोलण्यावर आणि वागण्यावर केंद्र सरकारने काही बंधने आणली आहेत. अशा व्यक्ती वाटेल ते बोलायला लागल्या आणि वाटेल तसे वागायला लागल्या, तर त्यांना पेन्शन मिळणार नाही असेच शासनाने सुनावले आहे. अशा उच्च पदस्थ व्यक्ती बरेचदा सरकारी निर्णय ठरविण्याच्या कामात आघाडीवर असतात आणि निवृत्त झाल्यानंतर शासनाचे कसे चुकले यावर बोलत असतात. आता तसे बोललेले चालणार नाही. गप्प बसावे लागेल. कारण, शासनाचे निर्देशच तसे आहेत.
पण, मी काय म्हणतो, निवृत्त व्यक्तीकडे असा असतोच कितीसा काळ? साधारण 75 वर्षे आयुष्यमान धरले आणि साठाव्या वर्षी निवृत्ती मिळाली, तर जेमतेम पंधरा वर्षे त्याच्याकडे असतात. त्यातील पहिली दोन-तीन वर्षे मी कशी यशस्वी नोकरी केली, कसा यशस्वी संसार केला, मुलाबाळांना कसे मार्गी लावले, या बढाया मारण्यात जातात. काही काही लोक तर आपला स्वतःचा अंतकाळ येईपर्यंत स्वतःच्या शहाणपणाच्या गोष्टी इतरांना कारण नसताना सांगत असतात.
होय तर! मीही खूपदा पाहिले आहे की, साहेब म्हणून रिटायर झालेल्या व्यक्ती बाहेर पडल्यानंतर तोच मान अजूनही मिळावा म्हणून धडपडत असतात.