भटक्या कुत्र्यांच्या समस्यांवर देशात नेहमीच चर्चा होत असते. त्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी निर्बीजीकरण करण्यापासून ते मारून टाकण्यापर्यंत अनेक पर्याय सुचवले जातात. कोणताही प्रश्न आजकाल थेट कोर्टापर्यंत जात असतो. त्यामुळे साहजिकच भटक्या कुत्र्यांचा प्रश्न कोर्टापर्यंत गेला आणि काही प्रमाणात त्याचा निर्णयही आला. यावरूनही बरेच चर्वितचर्वण झालेले आहे. माणसांच्या किंवा व्यक्तींच्या किंवा गुन्ह्यांच्या अनेक केसेस कोर्टामध्ये वर्षांनुवर्षे चालतात. त्या पार्श्वभूमीवर कुत्रे अवघ्या 10 दिवसांत कोर्टात केस जिंकले, असे म्हणावे लागेल.
प्रश्न ऐरणीवर आला की, थेट वरच्या कोर्टात जातो. शासनाने एखादा निर्णय घेतला की, त्याला कोर्टामध्ये चॅलेंज केले जाते. तेव्हा साहजिकच प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन कोर्टात त्यावर तत्काळ सुनावणी सुरू होते आणि फैसला सुनावला जातो. कोणत्याही प्राण्यांचा प्रश्न उभा राहिला की भूतदया असणारी जनता आवर्जून जागी होत असते. गेल्या वीस पंचवीस वर्षांत ज्यावर वाद झाला नाही, असा कुठलाही प्रश्न या देशात निर्माण झाला नाही की काय, अशी शंका वाटते. धरणाची उंची वाढवण्यापासून ते कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यापर्यंत अनेक प्रश्न सुप्रीम कोर्टापर्यंत जात असतात. शासनही जेव्हा कोणता निर्णय घेते, तेव्हा त्यालाही कल्पना असते की, हा प्रश्न कोर्टात जाणारच आहे. तूर्त कुत्र्यांच्या समस्येने मात्र गंभीर रूप धारण केलेले आहे, हे निश्चित आहे.
भुकेले असणारे भटके कुत्रे रात्रीच्या वेळेला त्यांच्या अनुवंशानुसार अधिक आक्रमक होते. तुम्ही शहरातल्या कुठल्याही वसाहतीत राहत असाल किंवा ग्रामीण भागातील गल्लीत राहत असाल आणि काही कारणांमुळे तुम्हाला रात्री परत येण्यास उशीर झाला, तर तुमच्या घराच्या परिसरामध्ये पाय टाकण्याची तुम्हाला भीती वाटते. याचे कारण म्हणजे हे भटकेश्वर श्वान होत. श्वान हा एक तर टोळीने राहणारा प्राणी आहे. यांचे जे जंगली बांधव म्हणजे जंगली कुत्रे आहेत, ज्यांना ‘ढोल’ असे म्हटले जाते, त्याला तर वाघही घाबरून असतो. हे टोळीने शिकार करतात. यांचे नियोजन मजबूत असते. सुसाट वेगाने धावणार्या हरणाचा सुद्धा ते नियोजनाने फडशा पाडत असतात.
श्वानाचा मूळ वंशज लांडगा आहे, असे मानले जाते. लांडगा हा देखील क्रूर प्राणी असून, त्याने एखाद्या प्राण्यावर हल्ला केला, तर तो प्राणी पूर्णतः मरण्याची पण तो वाट पाहत नाही. लांडग्यांची टोळी जिवंतपणे त्या प्राण्याचे लचके तोडायला सुरुवात करते. पुढे भटक्या श्वानांमध्ये हेच गुण आले असतील, तर नवल नव्हते. भटक्या श्वानांना पुरेसे अन्न मिळत नाही, त्यामुळे ते चिडचिडे झालेले असतात. अशावेळी ते कोणाही लहान मुलावर, व्यक्तीवर हल्ला करण्याची शक्यता असते. असे हल्ले अत्यंत जीवघेणे असतात आणि या स्वरूपाच्या बातम्या पाहायला मिळतात. सुप्रीम कोर्टाचा कोणीही वकील नव्हता, तरीही श्वान मंडळींनी ही केस जिंकलेली आहे. महानगरपालिका आणि तत्सम संस्थांच्या गाड्या भटक्या श्वानांना पकडून नेऊन त्यांची नसबंदी करून त्यांना सोडून देतात.