विधिषा देशपांडे
भारतात भटक्या कुत्र्यांची समस्या गेल्या काही वर्षांत गंभीर स्वरूप धारण करत आहे. सध्या देशभरात अंदाजे सहा कोटी मोकाट कुत्री असल्याचे पशुकल्याण मंडळ सांगते. हे कुत्री दरवर्षी लाखो लोकांवर हल्ले करतात, त्यापैकी अनेक हल्ले जीवघेणे ठरतात. रेबीजसारख्या रोगामुळे भारतात दरवर्षी 20 हजारांहून अधिक मृत्यू होतात, ज्यामुळे भारताला जगातील रेबीज राजधानी मानले जाते. एवढेच नव्हे, तर हे कुत्रे रस्ते अपघातांचे मोठे कारण आहेत.
भटकी कुत्री वन्यजीवांवर हल्ले करतात, कचर्यात भटकून पर्यावरण दूषित करतात आणि रस्त्यांची स्वच्छता बिघडवतात. या समस्येवर उपाय म्हणून अनेक वेळा कुत्र्यांना शहरांतून हटवण्याचा विचार मांडला जातो; पण त्याच वेळी शास्त्रज्ञ एक महत्त्वाचा इशारा देतात, तो म्हणजे व्हॅक्यूम इफेक्ट. व्हॅक्यूम इफेक्ट म्हणजे काय, तर जेव्हा एखाद्या भागातून सर्व मोकाट कुत्री हटवली जातात, तेव्हा त्या ठिकाणी उपलब्ध असणारे अन्नस्रोत आणि मोकळी जागा नव्या कुत्र्यांना आकर्षित करते. त्यामुळे काही काळातच नवीन कुत्र्यांचे थवे त्या भागात येऊन स्थायिक होतात. हा परिणाम घडण्याचे कारण म्हणजे कचरा व उघड्यावर टाकलेले अन्न तसेच पडून राहते आणि ती जागा रिकामी असल्याने नव्या प्राण्यांसाठी आकर्षण ठरते. अशा वेळी हटवण्याच्या कारवाईचा मूळ उद्देश फोल ठरतो आणि समस्या पुन्हा तीव्र स्वरूपात उद्भवते, कधीकधी आधीपेक्षाही अधिक गंभीर होते.
प्रगत देशात भटके प्राणी किंवा कीटक नियंत्रणाचे पहिले पाऊल म्हणजे त्यांच्या अन्नस्रोतांवर बंदी घालणे; पण भारतात उलट धोरण दिसते. प्राणिमित्र सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना खाऊ घालण्याचा सल्ला देतात. यामुळे नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षिततेचा मुद्दा हा कुत्र्यांना प्रोत्साहन देणार्या धोरणात बदलतो. अमेरिकेची पर्यावरण संरक्षण संस्था कुत्र्यांच्या विष्ठेला विषारी प्रदूषक मानते. केवळ शंभर कुत्र्यांची दोन ते तीन दिवसांची विष्ठा इतकी हानिकारक असते की, 20 मैल परिसरातील जलस्रोत प्रदूषित होऊ शकतात. भारतातील सहा कोटी मोकाट कुत्री रोज सुमारे 30 हजार टन विष्ठा रस्त्यांवर टाकतात. ती पाणी, माती आणि हवेला प्रदूषित करून अनेक रोगांचा प्रसार करते.
भारत सरकारने 2001 साली लागू केलेल्या पशुजन्म नियंत्रण नियमांनुसार कुत्र्याची केवळ नसबंदी आणि लसीकरण करून त्यांना पुन्हा त्यांच्या परिसरात सोडणे अपेक्षित आहे. 2023 मध्ये या नियमांना पशुपालन विभागाने सुधारित स्वरूप दिले. मात्र, या संपूर्ण प्रक्रियेत कचरा व्यवस्थापन आणि अन्नस्रोत नियंत्रणाकडे दुर्लक्ष झाले. परिणामी, व्हॅक्यूम इफेक्टचा धोका टळत नाही. एलन बेक यांच्या ‘द इकॉलॉजी ऑफ स्ट्रे डॉग्स’ या पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे, भटकी कुत्री कचरा पसरवून चोहोकडे अस्वच्छता निर्माण करतात, उंदीर व इतर कीटकांसाठी अन्नस्रोत उपलब्ध करून देतात, आणि त्या मार्गे मानवी आरोग्यास अधिक धोका निर्माण करतात.
भटकी कुत्री हटवल्यास काही फायदे निश्चित मिळू शकतात. कुत्र्यांच्या हल्ल्यांत घट, रेबीजसारख्या रोगांपासून संरक्षण, रस्ते अपघातांची संख्या कमी होणे, वन्यजीवांवरील हल्ले कमी होणे, आणि कचर्यामुळे होणार्या प्रदूषणावर नियंत्रण. याशिवाय, शहरी स्वच्छतेत सुधारणा होते आणि वैद्यकीय उपचार व अपघात व्यवस्थापनावरील आर्थिक भार कमी होतो. पर्यटनालाही चालना मिळू शकते. पण, हे फायदे मिळवण्यासाठी कुत्री हटवण्याबरोबरच सखोल कचरा व्यवस्थापन, अन्नस्रोतांचे पूर्ण नियंत्रण आणि ठोस निरीक्षण यंत्रणा आवश्यक आहे; अन्यथा व्हॅक्यूम इफेक्ट निर्माण होऊन संपूर्ण प्रयत्न वाया जातात. म्हणूनच भारतात मानवी आरोग्य, सार्वजनिक सुरक्षितता, पर्यावरण आणि प्राण्यांच्या कल्याणाचा समतोल साधणारी धोरणे राबवली जावीत.