दैनंदिन जीवनात असो की, राजकारणात असो, बोलताना मोजून मापून बोलावे लागते. रोजच्या व्यवहारात काहीतरी कडवट बोलून आपणही अनेकांचा कळत नकळत अपमान करत असतो. जीभ हे दुधारी शस्त्र आहे. ते समोरच्या व्यक्तीचे मन जिंकू शकते आणि त्याचबरोबर त्या व्यक्तीबरोबर शत्रुत्वही निर्माण होऊ शकते. बोलताना भान ठेवून बोलणे आवश्यक असते. बरेचदा समोर कोणी आपले चाहते असतील, तर बोलणार्याची जीभ घसरते आणि त्यामुळे राज्यभर गदारोळ होऊ शकतो. विशेषत: तुम्ही सत्ताधारी पक्षाचे आमदार किंवा मंत्री असाल, तर तुमचे मंत्रिपदही जाऊ शकते. आपल्या राज्यात आणि इतरत्रही असे प्रकार बरेचदा झाले आहेत. नेतेमंडळी एक-दोन वेळेला सांभाळून घेतात; परंतु त्यांनी सांभाळण्याचीपण एक मर्यादा असते. वारंवार नको ते बोलण्यामधून गैरसमज होत असतील, तर मंत्रीमहोदयांना आपले पदही गमवावे लागते.
जीभ हा एक अवयव आहे. त्याचबरोबर कानही तितकाच महत्त्वाचा अवयव आहे. बोलताना ज्याची जीभ घसरते त्याचे कान टोचले जातात. कान टोचणे म्हणजे व्यवस्थित पद्धतीने समजावून सांगणे होय. ‘कान टोचणे’ हा वाक्प्रचार कसा निर्माण झाला असावा, याचा अंदाज आपण बांधू शकतो. कानाला टोचताना वेदना होत असतात. सुईसद़ृश उपकरण वापरल्यामुळे कान टोचताना अर्थात त्रास होतो. याच कारणामुळे ते लहानपणी टोचले जातात. पुन्हा बोलताना त्या व्यक्तीला कान टोचताना झालेली वेदना आठवावी हा प्रयत्न असतो. बरेच लोक असे कान टोचले गेल्यानंतर आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवतात आणि आपला पुढील राजकीय प्रवास सुखकर करून घेतात. ज्यांना बोलण्याचे भान राहत नाही, ते नेते त्याच त्याच चुका पुन्हा करतात आणि आपले पद गमावून बसतात.
राजकारणामध्ये आज-काल कुठलीही गोष्ट सहजरीत्या घेतली जात नाही. सत्ताधारी मंत्री काय करताहेत, यावर मीडियाची आणि छोट्या कॅमेर्याची सतत नजर असते. परवा एक मंत्री महोदय विधानभवनामध्ये जंगली रमी पाहताना दिसले. याचे चित्रीकरण प्रेक्षक गॅलरीमधील बसलेल्या एका व्यक्तीने केले. आपणही बरेेचदा मोबाईलवर काही पाहत असताना अचानक काही जाहिराती समोर येतात. त्या आपण काढून टाकतो. त्यासाठी अर्थात काही सेकंद लागतात. नेमके त्याच वेळेला ते चित्रीकरण केले गेले, तर ते पुन्हा पुन्हा दाखवले जाते आणि तुम्ही तो खेळ खेळत होता असे सिद्ध केले जाते. याची पुरेपूर काळजी प्रत्येक मंत्री महोदयांनी घेतली पाहिजे. ज्या खात्याचे तुम्ही मंत्री आहात, त्या संबंधित लोकांविषयी किंवा सरकार विषयी बोलताना सत्ताधारी पक्षाला अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक असते. एखाद्या मंत्र्याच्या नको त्या बोलण्यामुळे मंत्रिमंडळाची इमेज खराब होत असेल, तर कारवाई होणे निश्चित आहे.