आशिष शिंदे
डिजिटल विश्वात आपण मुक्तपणे वावरत असलो, तरी पेन आणि कागद यांचा जादुई स्पर्श नेहमीच कायम राहिल असे आपल्याला वाटते. एखादे पत्र लिहायचे असो, शाळेत अथवा कॉलेजमधील नोटस असो अथवा ऑफिस मीटिंगमध्ये मुद्दे टिपायचे! इतकेच काय अचानक डोक्यात आलेलेली एखादी कल्पनादेखील आपण पेन घेऊन कागदावर उतरवतो. इतके या पेनचे महत्त्व. प्रत्येकाच्या खिशात दिसणारी ही साधी लेखणीसुद्धा देखील सध्याच्या गॅजेट वर्ल्डमध्ये स्मार्ट झाली आहे. नुसती स्मार्ट नाही, तर तुमच्या बॉल पेनमध्ये आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स अवतरले आहे. आता पेन फक्त लिहिणार नाही, तर तब्बल 52 पेक्षा जास्त भाषांमध्ये ट्रान्सलेशनदेखील करेल.
दिसायला हा स्मार्ट एआय पेन अगदी सामान्य पेनसारखाच वाटतो. स्टील आणि प्लास्टिकच्या मिश्रणात बनलेला हा पेन फक्त 30 ग्रॅम वजनाचा आहे; पण या साध्या दिसणार्या पेनच्या आत एआय असिस्टंट चिप, ब्लूटूथ 5.2, नॉईस कॅन्सलिंग मायक्रोफोन, मायक्रोएसडी कार्ड स्लॉट आणि 30 तासांचा बॅटरी बॅकअप अशी हायटेक यंत्रणा बसवलेली आहे. यात कोणताही स्क्रीन नाही; पण वर दिलेले मल्टिफंक्शन बटण मोड बदलण्याचे काम करते. हे पेन स्मार्ट फोनशी ब्लूटूथने जोडले जाते आणि एका तासाच्या चार्जनंतर तब्बल तीस तास सलग काम करते.
या पेनची खरी जादू आहे, त्याचे एआय इंटिग्रेशन. तुम्ही काहीही लिहायला घेतले की, हे पेन लगेच तुमच्याशी संवाद साधते. शब्द सुचवणे, वाक्य पूर्ण करणे, कल्पना मांडणे, मेल ड्राफ्ट करणे हे सगळे हे पेन सहज करते. एवढेच नव्हे, तर हे 52 पेक्षा जास्त भाषांमध्ये रिअल टाईम ट्रान्सलेशन करते. तुमचे इंग्रजी वाक्य मराठीत किंवा मराठी नोट इंग्रजीत झटक्यात ट्रान्सलेट होते. पेनमध्ये असलेला नॉईस कॅन्सलिंग मायक्रोफोन तुमचा आवाज ओळखतो आणि मीटिंग्ज, क्लासेस किंवा इंटरव्ह्यू रेकॉर्ड करतो. त्यानंतर तो आवाज मायक्रोएसडी कार्डवर साठवतो आणि ट्रान्सक्रिप्शन फिचरद्वारे लिखित मजकुरात रूपांतरित करतो.
हँडरायटिंग टू डिजिटल टेक्स्ट हे याचे आणखी एक प्रभावी वैशिष्ट्य. तुम्ही कागदावर लिहिलेले हे पेन डिजिटल स्वरूपात बदलतो. म्हणजेच नोटबुक आणि लॅपटॉप यांच्यातील दरी मिटवणारा हा पूलच म्हणावा लागेल. शिवाय हे पेन तुमच्या बोलण्यावरून नोटस् घेते, रिमाईंडर्स सेट करते, टू-डू लिस्ट तयार करते आणि तुमच्या लिखाण शैलीनुसार सुधारणा सुचवते. हा एआय पेन विद्यार्थ्यांपासून पत्रकारांपर्यंत, लेखकांपासून व्यावसायिकांपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त ठरतो. मीटिंगमध्ये घेतलेले नोटस् आपोआप डिजिटल स्वरूपात सेव्ह होतात, आवाजाचे लिखाणात रूपांतर होते आणि भाषांतर एकाचवेळी होते. ज्यांना वेळ वाचवायचा आहे आणि कामात अचूकता हवी आहे, त्यांच्यासाठी हा पेन खरोखरच क्रांतिकारी ठरू शकतो. या पेनचे डेटा स्टोरेज एन्क्रिप्टेड असल्याने प्रायव्हसीबाबत काळजी करण्याची गरज नाही. अमेरिकेत याची किंमत पाच ते सहा हजार रुपयांच्या घरात आहे.