राखी पौर्णिमेची तयारी. Pudhari File Photo
संपादकीय

तडका : तयारी पौर्णिमेची

लाडकी बहीण योजनेमुळे सावित्रीचा आनंद द्विगुणित, राखी स्वतः तयार करणार

पुढारी वृत्तसेवा

आता गं बाई सावित्री, कशाचं ताट तयार करायलीस? कुणाला ओवाळायची तयारी चाललीय?

अगं, यावर्षीच्या राखी पौर्णिमेची तयारी करत आहे. यावर्षी आपण बहिणींसाठी राखी पौर्णिमा बरच काही घेऊन आली आहे.

अगं, पण श्रावण अजून लांब आहे. एवढी कशाची तयारी करतेस आतापासूनच? राखी पौर्णिमा जवळ येईल तेव्हा पाहू की!

हे बघ, ते काही नाही. राखी मी स्वतः हाताने तयार करणार आहे आणि माझ्या लाडक्या भावाला बांधणार आहे. यावर्षी नवीन भाऊ भेटला ना मला. तुला पण भेटलाच आहे की गं!

हे बघ, असं कोड्यात बोलू नकोस. जे काय बोलायचे ते स्पष्ट बोल.

अगं, नवीन भाऊ म्हणजे राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथदादा शिंदे. आपल्यासारख्या लाडक्या बहिणींसाठी महिना दीड हजार रुपये द्यायची योजना आणली आहे तेव्हापासून मी शिंदेदादाला भाऊ मानायला सुरुवात केली आहे. काय व्हायचं ना की, माझा नवरा खर्चायला रुपया म्हणून हातात ठेवायचा नाही. त्यांच्याकडेबी पैसे दोनच टाईम येते. सोयाबीन विकल्यावर आन कपाशी विकल्यावर. ते तरी काय करतील? इथं दिवसाला शंभर-दोनशे रुपये लागतात. लेकरांना गोळ्या-बिस्कीट खायला, पुस्तकं आनायला, भाजीपाला आनायला, काय म्हणून एक खर्च नसतो घर म्हनलं की! आपली ही अडचण ओळखून शिंदेदादांनी लाडकी बहीण योजना आणली आणि त्याच्यातला आपला अर्ज मंजूर झाला, तर दर महिन्याला दीड हजार रुपये आपल्या खात्यात येणार आहेत.

अगं पण, अर्ज करायला लय पळापळ करायला लागली लोकांना असं आलंय पेपरात. हे प्रमाणपत्र काढ, ते प्रमाणपत्र काढ, हे कार्ड द्या, ते कार्ड द्या अशी बरीच धावपळ सुरू आहे म्हणतात सगळीकडे. हे बघ ताई, सरकारी काम म्हणल्यावर काही ना काहीतरी कागदपत्र लागतीलच का नाही? तरी, आता कागदपत्रे संख्या एकदम कमी करून टाकली आणि सरकारी कर्मचार्‍यांना सांगितले की, अर्ज मंजूर करा फटाफट म्हंजे पैसे मिळतील लोकांना खटाखट! माझा तर अर्ज पण भरून झाला. माझ्या नवर्‍याने सर्व कागदपत्रे गोळा केली, जमा केली आणि अर्ज दाखल झाल्याची पावती पण मिळाली. आता तू म्हणशील माझ्या नवर्‍याने एव्हढ्या तातडीने हे काम का केलं असेल? तो म्हणाला, तुला एकदाचे दीड हजार रुपये महिना सुरू झाले की, मग माझ्या मागे किरकीर राहणार नाही. आता आमच्या घरात माझ्या सासुबाईंचा पण अर्ज आहे. सासू म्हातारी आहे. तिला कशाचा आलाय खर्च? तिचे दीड हजार पण माझेच आहेत.आता बहीण खूश तर दाजीबी खूश!

हे बघ सावित्री, आमचे मालकपण लय प्रयत्न करायलेत कागदपत्र गोळा करायची. आपल्याला काही त्याच्यातलं कळत नाही; पण आज ते कागदपत्रे गोळा होऊन अर्ज दाखल होईल. मी काय म्हणते तेवढेच महिन्याला दीड हजार रुपये. इथे मोलमजुरी करून बराशी खांदायला गेले, तर दीड हजार रुपये कमवायला पाच दिवस दिवसरात्र राबावे लागते. त्याच्यापेक्षा हे थेट खात्यात येणारे दीड हजार आपली जिंदगी बदलून टाकणार, याच्यात मला काही शंका राहिली नाही बघ!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT