Axiom Space AX-4  (Pudhari File Photo)
संपादकीय

Axiom Space AX-4 | झेप नव्या पर्वासाठी

Shubanshu Shukla Space Journey | भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे लवकरच अ‍ॅक्सिओम स्पेसच्या एक्स-4 मिशनद्वारे आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकाचा (आयएसएस) दौरा करणारे पहिले भारतीय नागरिक ठरणार आहेत.

पुढारी वृत्तसेवा
प्रा. विजया पंडित

भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे लवकरच अ‍ॅक्सिओम स्पेसच्या एक्स-4 मिशनद्वारे आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकाचा (आयएसएस) दौरा करणारे पहिले भारतीय नागरिक ठरणार आहेत. सुमारे 40 वर्षांनंतर पहिल्यांदा भारतीय अंतराळवीर अंतराळात प्रवास करतोय. अ‍ॅक्सिओम स्पेस 4 वर एक प्रयोग मायक्रोग्रॅव्हिटीमध्ये अंतराळवीर इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले आणि संगणकांशी कसा संवाद साधतात, यावर केंद्रित असणार आहे. यामागे ‘इस्रो’चा उद्देश अंतराळातील संगणकीय स्क्रीन वापरामुळे शरीरावर आणि मेंदूवर होणार्‍या परिणामांचे विश्लेषण करणे आहे.

भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला लवकरच इतिहास रचणार आहेत. ते अ‍ॅक्सिओम मिशन-4 अंतर्गत स्पेसएक्सच्या ड्रॅगन कॅप्सूलमधून आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकाची यात्रा करणार आहेत. त्यांच्या निमित्ताने पहिल्यांदाच भारतीय वैमानिक खासगी अंतराळ मोहिमेत सहभागी होणार आहे. ड्रॅगन हे एलन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीने विकसित केलेले पुनर्वापरायोग्य अंतराळयान आहे. अंतराळयात्रेकरू व साहित्य पृथ्वीवरून आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकापर्यंत पोहोचवणे आणि सुरक्षितपणे परत आणणे, हा या यानाचा उद्देश आहे. या यानाचा आकार कॅप्सूलसारखा असल्यामुळे याला ड्रॅगन कॅप्सूल म्हणतात.

अलीकडेच भारतीय वंशाची अंतराळयात्री सुनीता विल्यम्स 8 महिन्यांनंतर याच ड्रॅगन कॅप्सूलच्या सहाय्याने अंतराळातून पृथ्वीवर परत आली होती. त्यांच्या सोबत आणखी तीन अंतराळयात्री होते. एक्स-4 ही स्पेसएक्सची 53 वी ड्रॅगन मोहीम असून, 15 वी मानवी अंतराळ मोहीम आहे. या मोहिमेत शुभांशू शुक्ला यांच्यासोबत कमांडर पेगी व्हिटसन (अमेरिका), मिशन स्पेशालिस्ट स्लावोस उज्नांस्की (पोलंड), मिशन स्पेशालिस्ट टिबोर कापू (हंगेरी) हे अन्य तीन आंतरराष्ट्रीय अंतराळवीर सहभागी असणार आहेत.

शुभांशू शुक्ला ज्या कॅप्सूलमध्ये प्रवास करणार आहेत, ते क्रू ड्रॅगन आहे. ड्रॅगन कॅप्सूल स्पेसएक्सचा फाल्कन-9 रॉकेट अंतराळात सोडतो. रॉकेट काही उंचीवर पोहोचल्यानंतर ड्रॅगन कॅप्सूलला कक्षेत (ऑर्बिटमध्ये) सोडतो. हे कॅप्सूल पूर्णतः स्वयंचलित (ऑटोनॉमस) आहे. म्हणजेच, ते स्वतःहून अंतराळ स्थानकाशी जोडते आणि आपली उड्डाण दिशा व नियंत्रण सांभाळते; मात्र आपत्कालीन स्थितीत हस्तक्षेप करण्यासाठी वैमानिकाची गरज असते आणि ते काम शुभांशू करणार आहेत. शुभांशू शुक्ला सुमारे 14 दिवस आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकावर असतील. ते या मोहिमेत वैमानिकाची भूमिका निभावतील आणि ड्रॅगन कॅप्सूलच्या उड्डाण, डॉकिंग आणि परतीच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवतील. त्यांच्या सोबत अमेरिका, हंगेरी आणि पोलंड येथील अंतराळयात्री असतील. ही मोहीम पूर्णतः खासगी स्वरूपाची असून अ‍ॅक्सिऑम स्पेस या कंपनीकडून तिचे संचालन केले जात आहे.

या मोहिमेमुळे भारताचा मान आणि गौरव संपूर्ण जगात पुन्हा एकदा उंचावण्याचा क्षण आला आहे. भारतीय वायुदलातील ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला 10 जून 2025 रोजी अंतराळस्थानकासाठी प्रस्थान करणार होते; परंतु काही कारणास्तव ही मोहीम पुढे ढकलली आहे. त्यांच्या या मोहिमेमुळे 1984 मध्ये राकेश शर्मा यांनी सोव्हिएत संघाच्या सहकार्याने केलेल्या ऐतिहासिक अंतराळ प्रवासाची आठवण ताजी झाली आहे. राकेश शर्मा हे अंतराळात गेलेले पहिले भारतीय होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2023मध्ये अमेरिकेच्या दौर्‍यादरम्यान शुभांशू शुक्ला यांची या मोहिमेसाठी घोषणा केली होती. हे मिशन भारत आणि ‘नासा’मधील सहकार्याचे प्रतीक मानले जात आहे. यासाठी शुभांशू यांनी स्पेसएक्स व अ‍ॅक्सिओम स्पेस यांच्याकडून खास प्रशिक्षण घेतले आहे.

एक्स-4च्या चालक दलाने आणि स्पेसएक्सच्या तांत्रिक पथकांनी संपूर्ण प्रक्षेपण पूर्वाभ्यास केला आहे. यामध्ये फाल्कन-9 रॉकेटची स्टॅटिक फायर चाचणीसुद्धा करण्यात आली आहे. शुभांशू हे अत्यंत अनुभवी पायलट असून झुंझार बाण्याचे आहेत. त्यांनी सुई-30 एमकेआय, मिग-21, मिग-29, जग्वार, हॉॅक, डॉर्निअर-228 व अ‍ॅन-32 यासारख्या विविध विमानांचे 2000 तासांहून अधिक उड्डाण केले आहे. 2019 मध्ये विंग कमांडर, तर मार्च 2024 मध्ये ग्रुप कॅप्टन या पदावर त्यांची बढती झाली. 2019 मध्ये ‘इस्रो’ने गगनयान मोहिमेसाठी त्यांची निवड केली.

या मोहिमेसाठी भारत सरकारने सुमारे 548 कोटी रुपये खर्च केले आहेत. यामध्ये शुभांशू यांची तसेच त्यांच्या बॅकअप अंतराळवीर प्रशांत नायर यांची प्रशिक्षण प्रक्रिया समाविष्ट आहे. या मोहिमेचा मुख्य हेतू म्हणजे, भारताच्या ‘गगनयान’ या स्वदेशी मानवयुक्त अंतराळ मोहिमेपूर्वी प्रत्यक्ष अनुभव मिळवणे, मायक्रोग्रॅव्हिटीमध्ये जैविक आणि वैज्ञानिक प्रयोग करणे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय अंतराळ संशोधनाची प्रतिमा उंचावणे हा आहे. शुक्ला आणि त्यांच्या सहकार्‍यांनी या मोहिमेत आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकावर (आयएसएस) 14 दिवस राहून विविध प्रयोग करावयाचे आहेत. हे प्रयोग जैवतंत्रज्ञान, मानवी आरोग्य, अन्नधान्याचे बीज संवर्धन, पृष्ठभागाविना झोप, स्नायूंचा र्‍हास आणि मानवी जैविक चक्रांवर होणार्‍या परिणामांवर आधारित आहेत. विशेष म्हणजे, हे प्रयोग भारतीय संस्थांनीच विकसित केले आहेत आणि यामध्ये भारतीय संशोधनाच्या मोठ्या शक्यता आहेत.

या मोहिमेवर होणारा खर्च अनेकांना खूप मोठा वाटू शकतो; परंतु जागतिक स्तरावर मानवयुक्त अंतराळ मोहिमांचा खर्च पाहता ही रक्कम तुलनेने कमी आहे. तसेच या खर्चाचा उपयोग केवळ शास्त्रीय संशोधनापुरता मर्यादित नसून, भारताच्या अंतराळ संशोधनाला जागतिक व्यासपीठावर घेऊन जाण्याच्या द़ृष्टीनेही अत्यंत मोलाचा आहे. या मोहिमेमुळे भारताच्या गगनयान मिशनसाठी आवश्यक अनुभव आणि कौशल्य प्राप्त होणार आहे. भविष्यातील चांद्रमोहिमा आणि मंगळ मोहिमांसाठी हे मिशन फलदायी ठरेल. याशिवाय जैवतंत्रज्ञान, औषधनिर्माण, आरोग्य आणि अन्नधान्य उत्पादन यामधील संशोधन मानवाच्या पुढील पिढ्यांच्या द़ृष्टीने परिणामकारक ठरणारे आहे. याचप्रमाणे शुभांशू शुक्ला यांनी भारतातल्या विद्यार्थ्यांसोबत थेट संवाद साधण्याची योजना आखली आहे. त्यामुळे विज्ञान क्षेत्रात खास करून अंतराळविज्ञान, खगोलशास्त्राच्या क्षेत्रात तरुणांचा ओढा वाढण्यास मदत होईल.

शेवटी अशा प्रकारच्या मोहिमा केवळ प्रतिष्ठेपुरत्या मर्यादित नसतात, तर त्या देशाच्या विज्ञानविषयक स्वावलंबनासाठी आणि तांत्रिक सामर्थ्य वाढवण्यासाठी अत्यावश्यक असतात. जेव्हा आपण हा खर्च देशाच्या एकूण वार्षिक उत्पन्नाशी तुलना करतो, तेव्हा हा फक्त 0.005 टक्क्यांइतका अल्प भाग ठरतो; पण त्यातून मिळणारी प्रेरणा, संशोधन आणि जागतिक सहकार्याचा फायदा अमूल्य असतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT