शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्याला सुरूंग   File Photo
संपादकीय

Shinde Sena Crisis | शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्याला सुरूंग

ठाकरे सेना फोडून पक्ष काबीज करणार्‍या एकनाथ शिंदेंच्या गटालाही आता तोच फुटीचा अनुभव येत आहे.

पुढारी वृत्तसेवा

विनोद काकडे

मुंबईनंतर बाळासाहेबांच्या शिवसेनेला सर्वात भरभरून प्रेम मिळाले ते छत्रपती संभाजीनगरातूनच (पूर्वीचे औरंगाबाद). येथूनच नंतर संपूर्ण मराठवाड्यात शिवसेनेची पाळेमुळे घट्ट रुजली. 90 च्या दशकात संभाजीनगरची महापालिका, नंतरच्या काळात सातत्याने लोकसभा आणि विधानसभेच्या नऊपैकी दरवेळी किमान पाच जागांवर शिवसेनेचा भगवा फडकला. त्यामुळे मुंबईनंतर संभाजीनगर हा शिवसेनेचा अभेद्य असा बालेकिल्ला समजला जाऊ लागला. परंतु अडीच वर्षांपूर्वी जेव्हा शिवसेनेत अभूतपूर्व फूट पडली, तेव्हा या बालेकिल्ल्यालाही एकनाथ शिंदे यांनी जबरदस्त खिंडार पाडले.

गेल्या वर्षभरात शिंदे सेनेने ठाकरे सेनेचे उरलेसुरलेले शिलेदार आपल्या तंबूत घेत हा बालेकिल्ला अधिकच मजबूत केला. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिंदे सेनेने संभाजीनगरातील नऊपैकी सहा जागा लढविल्या आणि सहाच्या सहाही जागांवर भगवा फडकविला. आगामी जिल्हा परिषद, महानगरपालिका निवडणुकीसाठीही शिंदे सेनेने जोरदार तयारी सुरू केलेली होती. परंतु शिंदे सेनेलाही आता फुटीचा झटका बसू लागला आहे. ठाकरे सेना फोडून पक्ष काबीज करणार्‍या एकनाथ शिंदेंच्या गटालाही आता तोच फुटीचा अनुभव येत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या छत्रपती संभाजीनगर या बालेकिल्ल्याला आता खिंडार पडण्यास सुरुवात झाली आहे. बरे, सुरुंग लावण्याचे काम दुसरे तिसरे कुणी नाही तर त्यांचा मित्र पक्ष असलेल्या भाजपनेच सुरू केले आहे.

नुकतेच शिंदे सेनेचे कन्नड येथील जिल्हाप्रमुख भरतसिंह राजपूत यांनी अनेक पदाधिकारी, सरपंचांसह भाजपमध्ये प्रवेश केला. त्यातून शिंदे सेना सावरत नाही तोच महिला जिल्हाप्रमुख शिल्पाराणी वाडकर याही शिंदे सेनेला ‘जय महाराष्ट्र’ करीत भाजपवासीय झाल्या. इतकेच नव्हे तर फुलंब्री नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार असलेले आनंदा ढोके यांनी मतदान तोंडावर आलेले असताना लढतीतून माघार घेत भाजपमध्ये प्रवेश केला.

आता आणखी एक जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळही शिंदे सेनेचे महत्त्वाचे नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या कार्यपद्धतीवर उघड उघड नाराजी व्यक्त करीत आहेत. जंजाळही शिंदे सेना सोडून भाजपचे कमळ हाती धरण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

विशेष म्हणजे फोडाफोडीवरून शिंदे सेना आणि भाजपमधील वाद दिल्लीपर्यंत गेल्यानंतर यापुढे मित्रपक्षात फोडाफोडी करू नका, असा संदेश दिल्लीतून आला होता. त्यानंतरही स्थानिक भाजपने सुरुंग लावण्याचे काम सुरूच ठेवले आहे. ही बाब शिंदे सेनेसाठी चिंतेचा विषय बनली आहे. स्थानिक गटातटाचे राजकारण थांबवून ही फुटाफुटी थोपविण्यात एकनाथ शिंदे यांनी तातडीने पावले उचलली नाहीत तर महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांपर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले असेल!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT