ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. एकनाथ वसंत तथा ई. व्ही. चिटणीस  
संपादकीय

शतक पाहणारा शास्त्रज्ञ ः प्रा. चिटणीस

पुढारी वृत्तसेवा
उदय कुलकर्णी

ज्येष्ठ भौतिक व अवकाश शास्त्रज्ञ ‘पद्मभूषण’ प्रा. एकनाथ वसंत तथा ई. व्ही. चिटणीस हे आज गुरुवार ( दि. 25 जुलै) रोजी वयाच्या शंभरीत पदार्पण करीत असल्याने कोल्हापुरात जन्म झालेल्या या शास्त्रज्ञाविषयी...

1985 मध्ये भारत सरकारने ज्यांना ‘पद्मभूषण’ सन्मान प्रदान केला, असे ज्येष्ठ भौतिक व अवकाश शास्त्रज्ञ एकनाथ वसंत चिटणीस यांच्याशी गेल्या वर्षी पुण्यातून फोनवरून बोलणे झाले होते. हे संभाषण ‘चांद्रमोहीम-3’ला यश मिळाल्यानंतर त्या अनुषंगाने सुरू होते. घडले असे की, ‘चांद्रमोहीम-3’ यशस्वी झाल्यावर एका लेखात भारतातील अवकाश संशोधन क्षेत्रातील पाया रचणारे वैज्ञानिक म्हणून प्रा. चिटणीस यांच्याविषयी लिहिले. ते त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि 99 वर्षे वयाचे प्रा. चिटणीस यांनी मला फोन केला, ज्यांनी भारतीय अवकाश संशोधन संस्थेसाठी थुंबा येथील अग्निबाण प्रक्षेपण केंद्राची जागा शोधली व निश्चित केली. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम मुलाखतीसाठी आल्यानंतर त्यांची गुणवत्ता ओळखून त्यांच्यावर कोणती जबाबदारी सोपवावी, याबाबत डॉ. विक्रम साराभाई यांना सूचना दिली, असा शास्त्रज्ञ माझ्याविषयीच्या काळजीने मला सूचना देत होता. प्रा चिटणीस यांच्याशी माझा परिचय झाला, तो शास्त्रज्ञ डॉ. आर. व्ही. भोसले यांच्यामुळे. डॉ. भोसले हे अहमदाबाद येथील फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीतून निवृत्त झाल्यावर जन्मगावाच्या ओढीने 1988 मध्ये कोल्हापुरात परतले. डॉ. भोसले यांचे प्रा. चिटणीस, डॉ. कलाम यांच्याशी जवळचे संबंध होते. साहजिकच अवकाश संस्थेच्या ‘एज्युसॅट’ या उपग्रहाच्या योजनेची डॉ. भोसले यांना माहिती होती. शिवाजी विद्यापीठाने स्वतंत्र अवकाश संशोधन विभाग सुरू करून या संधीचा फायदा उठवावा, असा डॉ. भोसलेंचा प्रयत्न होता. तर अशा डॉ. भोसलेंना कोल्हापूर महापालिकेने ‘कोल्हापूर भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला. समारंभात नाव पुकारले तरी डॉ. भोसले सन्मान स्वीकारण्यासाठी उठले नाहीत. ‘सर, काय झालं?’ डॉ. भोसले म्हणाले, ‘माझ्यापेक्षा सर्वार्थाने ज्येष्ठ आणि कोल्हापुरातच जन्मलेला माणूस इथे असताना मी ‘कोल्हापूर भूषण’ सन्मान कसा स्वीकारू?’ डॉ. भोसले यांच्या आधी प्रा. चिटणीस यांचा सत्कार केल्यानंतर डॉ. भोसले यांनी आपला सत्कार स्वीकारला.

प्रा. चिटणीस यांचा जन्म कोल्हापूरचा हे समजल्यानंतर मी त्यांना गाठलेच. प्रा. चिटणीस, डॉ. भोसले व मी अशी गप्पांची मैफल जमली. भारताच्या वैज्ञानिक प्रगतीचा पाया भक्कम व्हावा यासाठी पंडित नेहरू यांनी डॉ. होमी भाभा, डॉ. विक्रम साराभाई तसेच प्रा. चिटणीस यांना विश्वासू सहकारी म्हणून कसे स्वातंत्र्य दिले, यासह अनेक बाबींचा तपशील गप्पांमध्ये उलगडत गेला. प्रा. चिटणीस यांनी प्रथम रसायनशास्त्र आणि नंतर भौतिकशास्त्रात पदवी संपादन केली. त्यानंतर रेडिओ संपर्क क्षेत्रातील पदविका पूर्ण केली. इलेक्ट्रॉनिक्स विषयातील पदव्युत्तर पदवीही मिळवली. अहमदाबादच्या भौतिकशास्त्र संशोधन प्रयोगशाळेत संशोधन कार्याचा प्रारंभ केला. थुंबा व श्रीहरिकोटा या अनुक्रमे अग्निबाण व उपग्रह प्रक्षेपणासाठी निवडलेल्या जागांच्या निश्चितीत प्रा. चिटणीस यांचा वाटा मोलाचा होता. ‘इन्सॅट’ ही उपग्रहांची मालिका आखण्यामध्येही प्रा. चिटणीस यांची लक्षणीय भागीदारी होती.

प्रा. चिटणीस यांनी 1950 ते 60 या दशकात वैश्विक किरणांशी संबंधित संशोधन केले. त्यांची पीएच.डी.ही याच विषयाशी संबंधित आहे. पुढे तीन वर्षे अमेरिकेतील मॅसॅच्युसेटस् तंत्रज्ञान संस्थेत संशोधन केल्यानंतर 1960 -70 या दशकात त्यांनी अवकाश संशोधन व क्ष-किरण या विषयावरील संशोधनावर लक्ष केंद्रित केले. अंतराळ संशोधनविषयक तंत्रज्ञानाचा शेती, हवामान, आरोग्य, शिक्षण, दूरसंपर्क, मनोरंजन अशा विविध क्षेत्रात वापर करण्याच्या द़ृष्टीने 1970 च्या दशकात ‘नासा’च्या सहकार्याने ‘साईट’ हा बहुपयोगी प्रकल्प आखला गेला. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची अंमलबजावणी प्रा. चिटणीस यांनी केली होती. याच प्रकल्पामुळे 1975-76 च्या दरम्यान देशातील विविध राज्यांमधील 2900 खेड्यांमध्ये दूरचित्रवाणी संच पोहोचू शकले होते. 1962 मध्ये अंतराळ संशोधनासाठी डॉ. साराभाई यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या राष्ट्रीय समितीचे प्रा. चिटणीस हे सदस्य सचिव होते. ‘कंट्रीवाईड क्लासरूम’ यासारखा दूरदर्शनवरचा शैक्षणिक कार्यक्रम राबवण्यातही प्रा. चिटणीस होतेच!

SCROLL FOR NEXT