अभय कुलकर्णी, आंतरराष्ट्रीय अभ्यासक
फेब्रुवारी 2022 मध्ये सुरू झालेल्या रशिया आणि युक्रेन युद्धाला तीन वर्षे चार महिने उलटून गेले आहेत. आता आंतरराष्ट्रीय स्ट्रॅटेजिक स्टडीज संस्था आणि रँड कॉर्पोरेशनच्या अहवालांमधून या युद्धात झालेल्या एकंदर हानीचा आकडा समोर आला असून तो चक्रावून टाकणारा आहे. या अहवालानुसार, रशियाविरुद्धच्या युद्धात युक्रेनला आतापर्यंत सुमारे सुमारे 50 लाख कोटी रुपयांहून अधिक फटका बसला आहे; तर रशियाची आतापर्यंत सुमारे 250 ते 300 अब्ज डॉलरची आर्थिक हानी झाली आहे.
युद्धामध्ये होणारी जीवितहानी व वित्तहानी संबंधित राष्ट्रांना प्रचंड मोठा फटका देऊन जाते. दोन महायुद्धांमधील आणि त्यानंतरच्या शीतयुद्धामधील अमानुष नरसंहार आणि विनाश पाहिल्यानंतर भविष्यातील युद्धे टाळण्यासाठी, शांतता प्रस्थापित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांसारख्या संघटनांची स्थापना झाली. अनेक शांतता करार झाले. दरम्यानच्या काळात जागतिकीकरणाचे युग अवतरले आणि राष्ट्रा-राष्ट्रांमधील आर्थिक परस्परावलंबित्व वाढत गेले. यामुळे तिसर्या महायुद्धाच्या भीषण सावटापासून अद्यापपर्यंत तरी जग सुरक्षित राहिले आहे. खरे पाहता शीतयुद्धानंतर अमेरिकाकेंद्री एकध—ुवीय विश्वरचना आकाराला आली आणि जगाचा राजकीय भूगोल बदलून गेला. त्यानंतर राष्ट्रांमध्ये छोटे-मोठे संघर्ष होत राहिले. अमेरिकेकडून काही राष्ट्रांमध्ये हस्तक्षेपी कारवाया झाल्या. आखातामध्येही काही संघर्ष झाले. पण ते प्रदीर्घ काळ चालले नाहीत. मात्र अलीकडच्या काळात अझरबैजान आणि आर्मेनिया युद्धाने पारंपरिक युद्धाची धग संपलेली नाही हे जगाला कळून चुकले. या युद्धाचा अग्नी शांत झाल्यानंतर फेब—ुवारी 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर आक्रमण केले आणि जगाच्या युद्ध इतिहासाच्या पुस्तकात एक घनघोर लढाईची नोंद झाली.
या युद्धाला तीन वर्षे चार महिने उलटून गेले आहेत. आधुनिक इतिहासात सर्वाधिक काळ चाललेले युद्ध म्हणून या संघर्षाची इतिहासात नोंद झाली आहे. चिंतेची बाब म्हणजे, अद्यापही हे युद्ध थांबलेले नसून कोणत्याही एका चुकीमुळे हे युद्ध अणुयुद्धात परावर्तित होऊ शकते, अशी टांगती तलवार जगावर कायम आहे. अलीकडेच अमेरिकेने युक्रेनला नव्याने आधुनिक शस्त्रास्त्रे देण्याची तयारी केली असल्याचे समोर आले आहे.
अलीकडेच आंतरराष्ट्रीय स्ट्रॅटेजिक स्टडीज संस्था आणि रँड कॉर्पोरेशनच्या अहवालांमधून या युद्धात झालेल्या एकंदर हानीचा आकडा समोर आला असून तो चक्रावून टाकणारा आहे. जागतिक बँक, यूएनडीपी व युक्रेन सरकारच्या माहितीनुसार 70 टक्क्यांपेक्षा अधिक सार्वजनिक पायाभूत रचना पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहे किंवा ती गंभीररीत्या नुकसानग्रस्त झाली आहे. युक्रेनच्या जीडीपीत 2022-23 दरम्यान 30 ते 40 टक्क्यांपर्यंत घसरण झाली असून सुमारे 80 लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. दोन्ही बाजूंकडील एकत्रितपणे सुमारे 5 ते 6 लाख सैनिक जखमी झाले आहेत.
या अहवालांनुसार युद्धात युक्रेनला आतापर्यंत सुमारे 550 ते 600 अब्ज डॉलर (सुमारे 50 लाख कोटी रुपये) इतकी थेट व अप्रत्यक्ष आर्थिक हानी झाली आहे. ही हानी प्रामुख्याने पायाभूत संरचना उद्ध्वस्त झाल्यामुळे, ऊर्जा प्रकल्प व औद्योगिक युनिटस्च्या विनाशामुळे, शेतजमिनी बेचिराख झाल्याने व स्थलांतरितांमुळे झाली आहे. या भीषण युद्धात युक्रेनला प्रचंड तोटा झाला असला, तरी या युद्धाचे परिणाम आता केवळ रणभूमीपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. एका बाजूला हजारो लष्करी व नागरी रचना धुळीत मिळाल्या आहेत; तर दुसर्या बाजूला दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांवर व पर्यावरणावरही त्याचा खोलवर परिणाम झाला आहे.