रो-रोचे आश्वासक पाऊल  (Pudhari File Photo)
संपादकीय

Ro-Ro Service Maharashtra | रो-रोचे आश्वासक पाऊल

राज्यात महायुती सरकार पुन्हा प्रस्थापित झाल्यानंतर नवनव्या प्रकल्पांच्या घोषणा केल्या होत्या. त्यातीलच एक होती रो-रो सेवेची.

पुढारी वृत्तसेवा

शशिकांत सावंत

राज्यात महायुती सरकार पुन्हा प्रस्थापित झाल्यानंतर नवनव्या प्रकल्पांच्या घोषणा केल्या होत्या. त्यातीलच एक होती रो-रो सेवेची. सध्या गणेशोत्सवासाठी जाणार्‍या चाकरमान्यांना रेल्वे हाऊसफुल्ल असल्याने अन्य पर्याय उपलब्ध होणे आवश्यक होते. यातीलच एक पर्याय रो-रो सेवेचा होता. मात्र, कोकणात जेटी उपलब्ध नसल्याने रो-रो सेवेबाबत प्रश्न उभे राहिले. यावर पर्याय शोधत रायगड-मांडव्याच्या धर्तीवर तरंगती जेटी उभारून रो-रो सेवेचा प्रारंभ गणेशोत्सवाआधी करण्याचा निर्णय घेतला. ही बाब चाकरमान्यांना दिलासादायक आहे.

खरे तर, महाराष्ट्रात रो-रो सेवेचे मार्ग निश्चित करताना मुंबई भाऊचा धक्का-मांडवा, मुंबई भाऊचा धक्का-नवी मुंबई, ठाणे-वसई, भाऊचा धक्का ते धरमतर खाडीमार्गे रोहा, मुरुड आणि भाऊचा धक्का ते गोवा, असे मार्ग निश्चित केले होते. मात्र, यातील मांडवा आणि भाईंदर-वसई असे मार्ग सुरू झाले. मात्र, बाकी मार्गांची प्रतीक्षा होती. यातील भाऊचा धक्का ते विजयदुर्ग असा एक मार्ग गणेशोत्सवापूर्वी सुरू करण्यासाठी विजयदुर्ग जेटीचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. या जेटीमुळे कोकणवासीयांना कोकणात जाण्याचा आणखी एक मार्ग उपलब्ध होणार आहे. त्यामुळे त्याचे स्वागतच करायला हवे. खरे तर, कोकण आणि जलवाहतूक यांचे ऋणानुबंध 90 वर्षांपूर्वीपासूनचे आहेत. ज्यावेळी रस्ते महामार्गही उपलब्ध नव्हते, त्या काळात जलवाहतुकीचा पर्याय उपलब्ध होता.

देवगड-मालवणच्या बंदरावर बोटीने हजारो प्रवासी गावाकडे येत असत. मात्र, ‘रामदास’ बोटीच्या 1947 साली झालेल्या भीषण अपघातानंतर जलवाहतुकीला पूर्णविराम मिळाला. त्यावेळी जवळपास 690 प्रवाशांना जलसमाधी मिळाली होती. बोट रेवसजवळ खडकाला आदळून बुडाली होती. त्या काळात जलवाहतूक ही धोकादायक वाटू लागल्याने ती बंद झाली. त्यानंतर आजपर्यंत जलवाहतूक फारशी सुरू झाली नाही.

आता रो रो या अत्याधुनिक सुविधेने युक्त अशी जलसेवा गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर सुरू होणे हे कोकणच्या द़ृष्टीने भाग्यच मानावे लागेल. गणेशोत्सवात लाखो गणेशभक्त कोकणात दाखल होतात. त्यामुळे रस्ते मार्गावर होणारी वाहतूक कोंडी, रेल्वेचे हाऊसफुल्लचे बोर्ड, यामुळे कोकणात पोहोचण्यास चाकरमान्यांना मोठा वेळ लागतो. विजयदुर्ग येथे खोल समुद्रात एक जुनी जेटी उपलब्ध आहे. ती जोडून तरंगती जेटी उभारून प्रायोगिक तत्त्वावर रो रो सेवा सुरू होणार आहे.

पहिल्या टप्प्यात मुंबई ते थेट विजयदुर्ग अशा सुरू होणार्‍या जलवाहतुकीला नंतरच्या काळात दिघी, दाभोळ, रत्नागिरी येथेही थांबे मिळणार आहेत. जलवाहतुकीच्या या सेवेमध्ये गाड्यांसह चाकरमान्यांना गावी पोहोचता येणार आहे. जवळपास 500 प्रवासी आणि 150 वाहने एकाचवेळी वाहून नेण्याची या जहाजाची क्षमता आहे. भाऊच्या धक्क्यावरून विजयदुर्गला पोहोचण्यासाठी चार तासांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे सर्वात जलद प्रवास या बोटीतून होऊ शकणार आहे. प्रवाशांसाठी 600 ते 1 हजार रुपये आणि गाडीसह 1,500 ते 2 हजार रुपये द्यावे लागणार आहेत. सध्या अशी सेवा भाऊचा धक्का ते मांडवा सुरू आहे. या बोटीची क्षमता 70 वाहने आणि 300 प्रवाशांची आहे. विजयदुर्ग रो-रो सेवा सुरू झाल्यास दिवसातून या सेवेच्या दोन फेर्‍या होऊ शकतील आणि यातून मोठ्या प्रमाणात चाकरमानी गावी पोहोचू शकतील. सिंधुदुर्गच्या प्रवाशांसाठी हा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. राज्य सरकारच्या कारभाराची ही नवी उपलब्धी मानता येईल, अशी ही सेवा असणार आहे. कोकणच्या पर्यटनालाही या सेवेचा मोठा लाभ मिळणार आहे. कोकण किनार्‍यावर 35 पर्यटनस्थळे ही जागतिक दर्जाची पर्यटनस्थळे म्हणून अधिक विकसित होऊ शकणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT