घटस्फोटांचे वाढते प्रमाण पाहता कुटुंब संस्थेचे काय होणार, याची काळजी समाजातील सर्वच लोकांना लागून राहिलेली आहे. घटस्फोट टाळण्यासाठी काय करता येईल, यावर आम्ही पण विचार केला. तुम्हाला पटतो का ते पाहा. आशीर्वादाशिवाय आपल्याकडे काही खरे नाही. बाण मारून ज्याचा वध करायचा आहे त्याचेपण आशीर्वाद घ्यावे लागतात. आजकाल विभक्त कुटुंबे असतात. नवरा, बायको आणि एक किंवा दोन मुले. अशावेळी घरातील कर्त्या (?) पुरुषाने कुणाचा आशीर्वाद घ्यायचा हा एक मोठा प्रश्न आहे. देवाच्या तर आपण पाया पडतोच; पण घरात वडिलधारे कुणी असेल तर? यावरून आमच्या सुपीक मेंदूमधून ही आयडिया उत्पन्न झाली.
आपल्याला आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल, तर मराठी तरुणांनी आपल्यापेक्षा वयाने मोठ्या तरुणीशी लग्न केले, तर बरेच प्रश्न सुटू शकतात. एक म्हणजे, पत्नी वयाने मोठी असेल आणि एखाद्या महत्त्वाच्या कामाला जायचे असेल, तर चटकन पत्नीच्या पाया पडून तिचा आशीर्वाद घेऊन निघाले, तर काय बिशाद आहे अपयशाची? कार्याला यश 1000 टक्के मिळणार म्हणजे मिळणार. याबाबत आपण शेक्सपियर, सचिन तेंडूलकर यांची उदाहरणे तपासू शकतो.
बरे, दुसरे म्हणजे मराठी पुरुषांना इगो असतो. बायको काही बोलली की, तो माथे भडकावून घेतो. समजा एखाद्याची बायको त्याला म्हणाली की, तुम्हाला काही अक्कल आहे का?’ तर तो हमखास तिच्या थोबाडीत ठेवून देणार. माझी अक्कल काढतेस? असे म्हणून कानाखाली आवाज काढणार. अशावेळी पत्नी वयाने मोठी असेल, तर तो म्हणू शकतो, ‘ती बोलली तर वाईट काय वाटून घ्यायचे? तिचा अधिकारच आहे. शेवटी सीनियरच आहे. यामुळे इगोसंबंधित प्रश्न संपून संसार सुरळीत चालू शकतो. अशा प्रकारचे वेगवेगळे फंडे काढून संसार सुरळीत कसा राहील, याचा जरूर प्रयत्न केला पाहिजे. आधुनिक काळात पती आणि पत्नी नोकरी करत असतील, तर त्यांच्यात बर्याच वेळा इगोचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे त्यांचा घटस्फोट होण्याची वेळ येते. स्वतःला शहाणे समजण्याची आणि इतरांना काहीच अक्कल नसल्याची वृत्ती समाजात बळावत चालली असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. लग्न हा एक संस्कार आहे. त्याचे पावित्र्य टिकवणे सर्वांची जबाबदारी असताना त्याचे काहीच कोणाला देणे-घेणे नसल्याचे दिसून येत आहे.
विशेषतः प्रेमविवाह फार काळ टिकतील याची काही सध्या स्थिती नाही. एकमेकांची गुण आणि अवगुण माहीत असल्याने त्यांच्यात माघार घेण्याची प्रवृत्ती अजिबात नसते. त्यामुळे त्यांच्या नात्यात कटुता लवकरच निर्माण होते आणि दोघांचा काडीमोड व्हायला मग वेळ लागत नाही. केवळ आवेशात निर्णय घ्यायचे आणि मग पश्चाताप करून घ्यायचा. एकमेकांना दोष देणारी पिढीच निर्माण होत आहे.