‘रील’ आता केवळ मनोरंजन नाही, तर मानसिक विकृतीचं प्रतिबिंब बनली आहे. समाजाने खलनायकात आकर्षण पाहायला सुरुवात केली. तरुणवर्ग या पात्रांमधून स्वतःतील ‘बंडखोर’ जिवंत ठेवतो. त्याला वाटते की व्यवस्थेविरुद्ध लढण्याचा मार्ग म्हणजे हिंसा. हा प्रभाव आता मनोरंजनापुरता नाही, तर मानसिकतेचा भाग बनला आहे.
उमेश कुमार
मुंबईतील ओलीस नाट्याच्या घटनेने पुन्हा दाखवून दिले की, सिनेमा किंवा वेब सीरिजचा प्रभाव आता फक्त पडद्यापुरता राहिलेला नाही. मुंबईतील चाललेला हा थरार एखाद्या फिल्मी पटकथेप्रमाणेच होता. अखेर पोलिसांनी सर्व ओलीस सुरक्षित सोडवले आणि चकमकीत आर्य ठार झाला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार आर्य याची बोलण्याची शैली, मुलांना घाबरवण्याची पद्धत सर्व काही फिल्मी होते. ही घटना एकमेव नाही. रोजच कुठे ना कुठे एखादा फिल्मी मेंदू वास्तवात रीलचं रूप घेतो; पण ही ‘रील’ आता केवळ मनोरंजन नाही, तर मानसिक विकृतीचं प्रतिबिंब बनली आहे. दिल्लीतील जहागीरपुरी भागात तीन अल्पवयीन मुलांनी एका व्यक्तीचा ‘फिल्मी स्टाईलमध्ये’ खून केला. पोलिस चौकशीत त्यांनी सांगितले की, ते ‘पुष्पा’ आणि ‘भौकाल’मधील गँगस्टरच्या जीवनशैलीने प्रभावित झाले होते आणि ‘गुन्हेगारी जगात प्रसिद्ध’ होण्याची इच्छा त्यांना होती.
आजचा युवक रील वर्ल्डमध्ये एवढा गुंतला आहे की त्याला खरे-खोटे यातील फरक समजत नाही. पूर्वीच्या चित्रपटांत समाजाची कथा असायची. गरिबी, प्रेम, संघर्ष, भ्रष्टाचार असायचा; पण आता चित्रपट समाजाला शिकवतात की कोणता संघर्ष ‘ट्रेंडी’ आहे आणि कोणता अपराध ‘स्टायलिश’. वेब सीरिजच्या जगात हिंसा, बदला, फसवणूक आणि लैंगिकता हे आता नेहमीचे विषय झाले आहेत. प्रत्येक प्रेक्षक स्वतःला त्या कथेतला नायक समजू लागतो. त्यामुळे लोकांचे निर्णय, बोलण्याची पद्धत, कपडे सगळेच स्क्रीनवरून प्रेरित आहेत. सोशल मीडियाने या प्रभावाला अनेक पटींनी वाढवले आहे. आज प्रत्येक व्यक्तीच कॉन्टेंट बनला आहे. प्रत्येक चेहरा कॅमेर्यासमोर आहे. प्रत्येक भावना एक ‘स्टोरी’ झाली आहे, आणि प्रत्येक चूक एक ‘व्हायरल मोमेंट’ ठरत आहे. समाज आता रिअॅलिटी शोसारखा जगतो आहे.
वेब सीरिजनी प्रेक्षकांना ‘थ्रिल’चे व्यसन लावले आहे. आता सनसनाटी असल्याशिवाय कथा अपूर्ण वाटते. त्यामुळे गुन्हेगारालाही ‘नायक’ म्हणून दाखवले जाते. मिर्झापूर, पाताल लोक, स्कॅम 1992, सेक्रेड गेम्स यांनी गुन्हेगारीला ‘स्मार्टनेस’ आणि ‘बुद्धिमत्ते’ची नवी व्याख्या दिली. परिणामी, समाजाने खलनायकात आकर्षण पाहायला सुरुवात केली. तरुणवर्ग या पात्रांमधून स्वतःतील ‘बंडखोर’ जिवंत ठेवतो. त्याला वाटते की व्यवस्थेविरुद्ध लढण्याचा मार्ग म्हणजे हिंसा. अपयश आले की तो स्वतःला फिल्मी नायकासारखा नाट्यमय निर्णय घेताना पाहतो. मुंबईतील घटना हे सिद्ध करते की हा प्रभाव आता मनोरंजनापुरता नाही, तर मानसिकतेचा भाग बनला आहे.
समाजाची भाषा देखील बदलली आहे. संभाषणात ‘डायलॉग’ आले आहेत. युवकांची विचारसरणी ‘स्क्रिप्टेड’ वाटते. जिथे संवेदनशीलता होती तिथे आता ‘सस्पेन्स’ आहे, जिथे भावना होत्या तिथे ‘एक्स्प्रेशन’. लोक दुःखही कॅमेर्यासाठी जगतात, हास्यही ‘फिल्टर’मधून शोधतात. रीलचा हा कब्जा फक्त शहरी युवांपुरता मर्यादित नाही; गावं, खेडी, लहान शहरांपर्यंत पोहोचला आहे. लोक मुलांची नावंही फिल्मी पात्रांवर ठेवू लागले आहेत. कपडे, चष्मे, फॅशन सगळं काही वेब सीरिज ठरवतात. समाजात आता ‘मूल्य’ नव्हे, ‘द़ृश्य’ महत्त्वाचे झाले आहे.
कधी काळी सिनेमा समाजाला दिशा द्यायचा, लोकांच्या मनात प्रश्न निर्माण करायचा; पण आजचा कंटेंट प्रश्न निर्माण करत नाही, तो फक्त उत्तेजना निर्माण करतो. ओटीटी प्लॅटफॉर्म्सनी या स्वातंत्र्याला ‘अमर्याद’ केलं आहे. ना सेंसर, ना मर्यादा, फक्त ‘क्लिक करा आणि पाहा’. मनोरंजनाच्या नावाखाली आता ‘मनोविज्ञानाचा खेळ’ सुरू आहे. बाजाराला समाज नको, प्रेक्षक हवेत. आणि प्रेक्षक तोच जो भावना नाही तर द़ृश्यांनी प्रभावित होतो. अशा प्रकारे सिनेमाने समाजाला नव्हे, तर विचारांनाच स्क्रीनवर कैद करून ठेवले आहे.
हा बदल फक्त सिनेमामुळे झाला असं नाही. मार्केटिंग आणि मीडियाने तो वाढवला. एखाद्या गुन्हेगाराला ‘स्टायलिश गँगस्टर’ म्हणणार्या हेडलाईन्स, एखाद्या सीनला ‘ट्रेंडिंग’ बनवणार्या रील्स, आणि एखाद्या डायलॉगला ‘मीम’ बनवणारी संस्कृती या सगळ्यांनी मिळून लोकांची संवेदना बोथट केली आहे. आता बातम्या बनत नाहीत, ‘कॉन्टेंट’ बनतो. आणि कॉन्टेंट तोच बनतो जो डोळ्यांना चकित करेल. हळूहळू समाजानेही स्वीकारले की संवेदनशील असणे आता बोअरिंग आहे, आणि ‘व्हायरल होणे’ म्हणजेच नवी यशाची ओळख.
या वाढत्या मागणीमुळे वेब सीरिजचा व्यवसाय जगभर प्रचंड वाढला. ‘द लॉर्ड ऑफ द रिंग्स : द रिंग्स ऑफ पॉवर’च्या दुसर्या सिझनचे बजेट जवळपास 1 अब्ज डॉलर (सुमारे 8300 कोटी रुपये) होते. भारतात ‘रुद्र’ आणि ‘हीरामंडी’ यांसारख्या वेब सीरिजचे बजेट 200 कोटींपेक्षा अधिक आहे. अभिनेत्यांची फीही कोट्यवधीत गेली आहे. हा बाजार झपाट्याने वाढतो आहे.
तज्ज्ञ डॉक्टर मानतात की सतत हिंसक, अराजक किंवा असामाजिक कंटेंट पाहिल्याने मेंदूत डोपामिनचे प्रमाण बदलते. माणूस ‘अॅक्शन’च्या आहारी जातो. साधं आयुष्य त्याला कंटाळवाणं वाटतं. त्यामुळे किशोरवयात राग, नैराश्य आणि आत्ममुग्धता वाढत आहे. मानसशास्त्रज्ञ याला ‘रील-रिअॅलिटी सिंड्रोम’ म्हणतात. जिथे माणूस वास्तव आणि कल्पना यातील फरक हरवतो. स्क्रीनच्या जगात त्याला ‘नियंत्रण’ वाटतं; पण प्रत्यक्ष जीवनात तो कमकुवत ठरतो. हेच असंतुलन त्याला टोकाच्या निर्णयांकडे ढकलते.
मग प्रश्न उभा राहतो, याला फक्त चित्रपट निर्माता जबाबदार का? उत्तर आहे ‘नाही’. प्रेक्षकही तितकाच जबाबदार आहे. आपणच त्या कंटेंटला ‘हिट’ केलं ज्यात हिंसा होती, आणि ज्यात चेतना होती अशा कंटेटकडे दुर्लक्ष केलं. आपण ‘संदेश’ विसरलो, ‘संवाद’ लक्षात ठेवला. आपण संवेदनांपेक्षा मनोरंजनाला प्राधान्य दिलं. आणि आज तेच मनोरंजन आपल्या मानसिकतेचं रूप झालं आहे. जर समाजाने पुन्हा ‘आरसा’ व्हायचं असेल, तर त्याने स्वतःच्या डोळ्यांनी पाहायला शिकायला हवं, स्क्रीनमधून नव्हे. कारण, सिनेमा तोपर्यंतच प्रभावी असतो, जोपर्यंत संवेदना जिवंत असते. संवेदना मेली की सिनेमा केवळ द़ृश्य म्हणून उरतो आणि समाज त्याचं प्रतिबिंब!