अमोल पवार
आपण रोज सकाळी, मैदानात गणवेशातील कवायत करणाऱ्या ‘त्या’ स्वयंसेवकांना पाहतो. राजकारणापासून समाजकारणापर्यंत त्यांचा प्रभाव सर्वदूर आहे. पण या ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’ची खरी कहाणी काय आहे? एक असे संघटन ज्याने १०० वर्षांत तीन बंदी आणि अनेक वादळं झेलूनही आपला विस्तार साधला.
कोणी म्हणत, हा फक्त एक सांस्कृतिक गट आहे; कोणी म्हणत, ही तर एक गुप्त राजकीय चळवळ आहे. पण, सत्य नक्की काय आहे. एका डॉक्टराने लावलेल्या 'राष्ट्रशक्ती'च्या औषधी रोपाचे आज एका विराट वटवृक्षत रुपांतर झाले आहे त्याची ही शताब्दी आहे! संघ म्हणजे निव्वळ माणसे नाहीत, तो आहे अखंड राष्ट्रव्रताचा यज्ञ, जो गेल्या १०० वर्षांपासून अव्याहतपणे धगधगत आहे.
डॉ. हेडगेवारांचा रामबाण उपाय
१९२५ ची ती विजयादशमी... नागपूरचे डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी नेमके ओळखले की, भारताच्या पराधीनतेचे मूळ कारण समाजातल्या 'आंतरिक दुर्बलतेत' दडलेले आहे. त्यांनी ठरवले, एका नव्या 'संस्कारशाळे'ची स्थापना करायची. लहान मुलांना एकत्र आणायचे, त्यांना खेळातून देशभक्ती, शारीरिक क्षमता आणि अनुशासन शिकवायचे.
हा विचार तेव्हाचा जेंव्हा देश पारतंत्र्यात होता, चार चौघात देशभक्ती बद्दल बोलणे म्हणजे इंग्रजी सैनिकांचा ससेमिरा मागे लागलाच समजा . डॉ. हेडगेवारांनी 'व्यक्तिनिर्माण' या मूलमंत्रावर भर दिला. त्यांच्या मते, 'हिंदुत्व' म्हणजे कोणताही संकुचित धर्म नाही; ती आहे भारताची हजारो वर्षांची जीवनदृष्टी. एका डॉक्टरने, समाजाच्या 'चरित्रनिर्मिती'ची शस्त्रक्रिया करण्याचा केलेला हा प्रयत्न, पुढे १९४० मध्ये गुरुजी (मा. स. गोळवलकर) यांच्याकडे संघटनेची धुरा येताच देशव्यापी झाला.
राष्ट्रीय अस्मितेचे टप्पे
संघाच्या १०० वर्षांच्या प्रवासातील काही मैलाचे दगड आहेत, जे 'संघटित राष्ट्रीय शक्ती' चे दर्शन घडवतात:
फाळणीचा थरार आणि निर्वासितांची ढाल (१९४७):
देशाचे विभाजन झाल्यावर पंजाब आणि बंगालच्या सीमांवर रक्तपात सुरू असताना, 'मृत्यूच्या दारातून' हजारो हिंदू व शीख निर्वासितांना सुरक्षित भारतात आणण्याचे 'अघोषित युद्ध' स्वयंसेवकांनी लढले. सेवा, सुरक्षा आणि पुनर्वसनाचे हे कार्य 'राष्ट्र प्रथम' या मंत्राचे ज्वलंत उदाहरण ठरले.
गोवा आणि दादरा-नगर हवेली मुक्ती संग्राम (१९५४-६१):
गोवा आणि दादरा-नगर हवेली पोर्तुगीज जोखडातून मुक्त करण्यात संघ कार्यकर्त्यांनी शौर्याची पराकाष्ठा केली. शांततामय मार्गाऐवजी, 'वसंतराव ओक' यांच्यासारख्या संघ कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष संघर्ष करून ही भूमी भारताला मिळवून दिली. हे कार्य म्हणजे निव्वळ राजकारण नव्हते, तर 'राष्ट्रवादाची प्रत्यक्ष कृती' होती.
गौ-हत्या बंदी आंदोलन (१९६६):
देशात गोवंश हत्येविरुद्ध आवाज उठवण्यासाठी संघाने सक्रिय भूमिका घेतली. १९६६ मध्ये दिल्लीत झालेल्या ऐतिहासिक आंदोलनात अनेक संतांसोबत लाखो लोकांनी सहभाग घेतला. संघाचा हा सहभाग 'भारतीय संस्कृती आणि कृषी व्यवस्थेच्या' रक्षणासाठी होता. या आंदोलनाने संघाच्या सामाजिक बांधिलकीची व्यापकता दाखवून दिली.
आणीबाणीचा संग्राम (१९७५-७७): लोकशाहीसाठी बलिदान
इंदिरा गांधींनी लादलेली आणीबाणी हा लोकशाहीवरचा सर्वात मोठा हल्ला होता. संघ स्वयंसेवक एका रात्रीत भूमिगत झाले आणि लोकशाही वाचवण्यासाठी भूमिगत आंदोलन उभे केले. हजारो स्वयंसेवकांना तुरुंगवास सोसावा लागला. संघाने केलेले हे 'भूमिगत योगदान' हे भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील एक तेजस्वी पर्व आहे.
श्रीराम जन्मभूमी आंदोलन: अस्मितेचा पुनर्जागर (१९८०-९० दशक):
विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून संघाने रामजन्मभूमी आंदोलनात निर्णायक भूमिका घेतली. बाबरी ढाच्याचे पतन ते भव्य राम मंदिराची प्रतिष्ठापना या प्रवासात संघाने हिंदू समाजाला एका सांस्कृतिक ध्रुवाभोवती एकत्र आणले. हे आंदोलन केवळ एक धार्मिक मुद्दा नव्हता, तर भारतीय अस्मितेच्या पुनरुत्थानाचा आणि राष्ट्रवादाच्या प्रकटीकरणाचा महत्त्वाचा टप्पा होता.
सामाजिक बांधिलकी आणि 'शक्ती केंद्रे': संघटनांचे जाळे
समर्थ रामदासस्वामी यांच्या उक्ती प्रमाणे
सामर्थ्य आहे चळवळीचे । जो जो करील तयाचे।
परंतु तेथे भगवंताचे । अधिष्ठान पाहिजे।।
शताब्दीचा वर्तमान संकल्प: 'समरसता' ते 'विश्वगुरू'
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या नेतृत्वाखाली संघाने आपला दृष्टिकोन अधिक व्यापक केला. आज संघाचा भर 'सामाजिक समरसता', 'पर्यावरण' आणि 'कुटुंब प्रबोधन' यांसारख्या विषयांवर आहे. त्यांनी जातीय भेदभावाविरुद्ध सक्रिय भूमिका घेत, समाजातल्या प्रत्येक घटकाला आत्मसन्मान देण्याचा प्रयत्न केला.
हा केवळ भूतकाळाचा गौरव नाही, तर पुढील १०० वर्षांसाठी भारताला 'विश्वगुरू' बनवण्याच्या संकल्पाची ही सुरवात आहे. संघाने 'पंच परिवर्तन' (सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मानसिक) यावर भर दिला आहे. याचा अर्थ, भारताला केवळ आर्थिक महासत्ता बनवायचे नाही, तर 'नैतिक आणि सांस्कृतिक महासत्ता' बनवायचे आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही केवळ एक शिस्तबद्ध संघटना नाही; ती एक 'राष्ट्रवादी प्रयोगशाळा' आहे. एका डॉक्टरच्या 'राष्ट्र प्रथम' या विचारातून सुरू झालेला हा यज्ञ, आज कोट्यवधी स्वयंसेवकांच्या ‘समिधा’ नी जगाला दिशा देण्याची क्षमता बाळगून आहे.