राजर्षी शाहू महाराज यांचे कर्तृत्व अफाट होते आणि त्यांची प्रतिभाही तेवढीच अफाट होती. तळागाळातील समाजासोबत असलेली त्यांची बांधिलकी आजच्या काळातही आपल्याला विचार करायला लावणारी आहे. शाहू महाराज हे देशातील पहिले राजे होते, ज्यांनी स्वतःच्या संस्थानात आरक्षण सुरू केले. सामाजिक समतेच्या द़ृष्टीने शाहूंचे विचार आजही मोलाचे ठरणार आहेत. औद्योगिकीकरण करणे, शेतीबरोबर जोडधंदेही असावेत, पाण्याचे नियोजन, विजेचा प्रश्न, शेतकर्यांसाठी व्यापारी पेठ, तरुण मुलांना साजेशी मल्लविद्या या शाहू महाराजांच्या कार्याचे आणि विचारांचे अनुकरण करण्याची मोठी गरज आहे.
शाहू महाराज यांचा जन्म 1884 चा आहे आणि 1922 मध्ये त्यांचे निधन झाले. म्हणजेच त्यांना पन्नास वर्षांचेच आयुष्य लाभले; पण एवढ्या आयुष्यातही त्यांनी जे कार्य केले ते मोठे होते. त्यांच्या राज्याचा रोहण समारंभ 1894 मध्ये झाला आणि ते दत्तक म्हणून कोल्हापूरला आले होते. आपल्याकडे सयाजीराव किंवा शाहू महाराज हे असे काही संस्थानिक होऊन गेले, ज्यांची प्रतिभा आणि तळागाळातील समाजासोबत असलेली बांधिलकी आजच्या काळातही आपल्याला विचार करायला लावणारी आहे. शाहू महाराजांच्या जीवन प्रवासाची अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील. 1919 मध्ये कोल्हापूर संस्थानात माणगावला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सभा झाली होती. बाबासाहेब हे दलित समाजातील होते. त्यामुळे तिथल्या सभेत काही लोकांनी बोलताना शाहू महाराज आमचे नेते आहेत, असा उल्लेख भाषणामध्ये केला; परंतु शाहू महाराजांनी त्या परिषदेत सर्वांना सांगितले की, तुमचे नेते हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरच आहेत. वास्तविक पाहता, तेव्हा बाबासाहेबांचा काळ सुरू व्हायचा होता. त्यावेळी ते शिक्षण घेत होते, तरीही शाहू महाराजांनी त्यांचा अशाप्रकारे उल्लेख केला होता, हे लक्षात घ्यावे लागेल. यानंतरच्या काळात त्यांची आणि बाबासाहेबांची गट्टी जमली.
बाबासाहेब आंबडेकर लंडनमध्ये शिकायला असताना त्यांनी शाहू महाराजांना एक पत्र लिहिले होते. यामध्ये त्यांनी लंडनमध्ये ब्राम्हणेत्तर पक्षासाठी काही कार्य करायचे असेल, तर ते मी करू शकेन, असे कळवले होते. त्यावेळी कौन्सिलच्या निवडणुकांसाठी ब्राह्मणेतर पक्ष निर्माण झाला होता आणि त्याला संसदेत स्थान होते. डॉ. आंबेडकर यांना शिक्षणासाठी सयाजीरावांनीही मदत केली; पण त्यांच्या जीवनात शाहू महारांजांचे एक वेगळे स्थान होते. याचे कारण शाहू महाराजांचा पहिल्यापासून कल हा तळागाळातील लोकांकडे होता. त्यांच्याकडे राहणारी अभयारण्यातील जी धनगर मंडळी होती, ज्यांना ‘डंगी धनगर’ म्हणून संबोधले जात असे, त्यांच्याशी राजर्षी अतिशय प्रेमाने वागायचे. हे प्रेम इतके प्रामाणिक होते की, शाहू महाराज त्यांची भाकरी खात असत, त्यांना स्वतःचे जेवण देत असत, त्यांना स्वतःच्या पंगतीला जेवायला बसवत असत. यामध्ये कुठेही नाटकीपणा वा ढोंगीपणा नव्हता. शाहूंना काही कुठली निवडणूक लढायची नसल्यामुळे वा मते मिळवायची नसल्यामुळे अशा प्रकारचा नाटकीपणा करण्याची गरजच नव्हती; पण राजा असूनसुद्धा मनापासून प्रेम ज्याला म्हणतात ते त्यांनी अभिव्यक्त केले.
प्रेमळपणासोबतच शाहूंची दूरद़ृष्टीही विलक्षण होती. त्यांनी सामाजिक समतेचा जो विचार आहे तो फक्त शब्दातून न मांडता कृतीतून दर्शवून दिला. सामाजिक न्यायाचा प्रश्न त्यांनी स्वतःच्या संस्थानात हाताळला. याचे उदाहरण म्हणजे आरक्षण. शाहूंच्या पूर्वीच महात्मा जोतिबा फुले यांनी आरक्षणाची मागणी केलेली होती. समाजाने ज्यांना मागे ठेवले आहे, उपेक्षित ठेवले आहे त्यांना विशेष संधी दिली पाहिजे, असे त्यांचे म्हणणे होते. 1902 मध्ये शाहू महाराजांनी फुलेंची ही मागणी प्रत्यक्षात आणली आणि त्यांच्या संस्थानामध्ये राखीव जागांची सुरुवात केली. शाहू महाराज हे देशातील पहिले राजे होते ज्यांनी स्वतःच्या संस्थानात आरक्षण सुरू केले.
शाहूंचे दुसरे सर्वात मोलाचे कार्य म्हणजे त्यांनी शिक्षणाला दिलेली चालना. त्या काळात ‘लिव्हणं ब्राह्मणाचं आणि दानं कुणब्याचं’ अशी म्हण प्रचलित होती. कुणबी म्हणजे शेतकरी. कुणब्याने कधी अक्षराच्या बाजूला जाऊ नये, असे म्हटले जात असे. समाजाची ही मानसिकता लक्षात घेऊन शाहू महाराजांनी विद्यार्थ्यांसाठी जातवार वसतिगृह तयार केली. यामध्ये जैन, मराठा, ख्रिश्चन, अस्पृश्य आदींसाठी शाहूंनी उभारलेली वसतिगृहे आजही कोल्हापुरात आहेत. या वसतिगृहांमुळे खेड्यापाड्यांतून कोल्हापुरात शिक्षणासाठी येणार्या विद्यार्थ्यांची राहण्याची सोय झाली.
शाहू महाराजांना मल्ल मानलं गेेलं आहे. कुस्त्यांसाठी आणि कुस्तीगीर घडवण्यासाठीही त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक प्रयत्न केले. भीमकाय, निरोगी शरीरयष्टी शाहू महाराजांना निसर्गत:च लाभली होती. स्वत:प्रमाणे आपली प्रजाही बलदंड व निरोगी शरीराची व्हावी म्हणून त्यांनी कोल्हापुरात अनेक तालमींची निर्मिती केली. या तालमीतून पैलवानांच्या राहण्याची आणि दैनंदिन खुराकाची, तसेच पैलवानांना मार्गदर्शन करण्यासाठी अनेक नामवंत वस्तादांची सोय करून दिली. प्रत्येक तालमीत तयार होणार्या पैलवानांमध्ये स्पर्धा निर्माण व्हावी म्हणून कुस्त्यांची मैदाने भरवण्यात येऊ लागली. त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्रातही त्यांनी मोलाचे कार्य केले. जयसिंगपूरसारखी व्यापारी नवी पेठ तयार केली. नंतर शाहू मिल उभी केली.
राधानगरीचे धरण बांधले. या धरणाच्या पाण्यावर लिफ्ट इरिगेशनची सुरुवात झाली. मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न शाहूंनी सोडवला. तसेच मुली व्यायाम करत असताना कोणी बघू नये, त्यांना मोकळेपणाने खेळता यावे म्हणून शाळेभोवती कंपाऊंड बांधून घेतले. शाहू महाराज राहणीमानात साधे होते. ते स्वतःला शेतकरी मानून घेत असत आणि शेतकरी मानूनच त्यांनी आपल्या सर्व गोष्टी केल्या आहेत. कोल्हापुरात जी सहकारी चळवळ उभी राहिली, तिचा पाया शाहू महाराजांनी घातला होता. आजच्या परिस्थितीत समाजाला शाहूंच्या विचारांची अत्यंत गरज आहे. सामाजिक समतेच्या द़ृष्टीने शाहूंचे विचार अत्यंत मोलाचे ठरणार आहेत. औद्योगिकीकरण करणे, शेतीबरोबर जोडधंदेही असावेत, पाण्याचे नियोजन, विजेचा प्रश्न, शेतकर्यांना व्यापारी पेठ, तरुण मुलांना साजेशी मल्लविद्या या शाहू महाराजांच्या कार्याचे आणि विचारांचे अनुकरण करण्याची आजही महाराष्ट्राला मोठी गरज आहे.
(शब्दांकन : कीर्ती कदम)