भारतीय राजकारणाच्या पटावर काँग्रेस पक्ष सध्या एका विचित्र आणि आव्हानात्मक वळणावर उभा आहे. एका बाजूला पक्ष सलगच्या निवडणुकीतील पराभवांच्या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे पक्षाचे सर्वोच्च नेते राहुल गांधी स्वतःला एक गंभीर आणि परिपक्व नेता म्हणून स्थापित करण्यासाठी जीवाचे रान करत आहेत; पण सॅम पित्रोदा यांनी वादग्रस्त वक्तव्य करून राहुल यांच्या मेहनतीवर पाणी फेरले आहे.
उमेश कुमार
भारत जोडो यात्रेपासून ते मतदार अधिकार यात्रेपर्यंत त्यांनी देशभरात फिरून तळागाळातील संघटनात्मक बांधणीला नवसंजीवनी देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे. राहुल गांधी यांनी तरुण, शेतकरी, महिला आणि समाजातील उपेक्षित घटकांशी थेट संवाद साधला. मरगळलेल्या कार्यकर्त्यांत नवा जोश भरला आणि काँग्रेसला पुन्हा एकदा सत्तेचा एक सक्षम पर्याय म्हणून उभे करण्याची धडपड केली. हा प्रवास निश्चितच सोपा नव्हता; पण त्यांच्या अथक परिश्रमातून हळूहळू एक अशी राजकीय जमीन तयार होत होती, ज्यावर पक्ष भविष्यातील यशाची इमारत उभारू शकत होता; परंतु काँग्रेसच्या राजकारणाची ही एक मोठी शोकांतिका आहे की, प्रत्येक वेळी जेव्हा पक्ष अशा मेहनतीच्या जोरावर दोन पावले पुढे टाकण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा पक्षाच्या आतूनच कुणीतरी ज्येष्ठ नेता एक असे बेजबाबदार वक्तव्य करतो, जे या संपूर्ण मेहनतीवर पाणी फेरते. ही समस्या नवीन नाही; पण गेल्या काही वर्षांत तिने गंभीर स्वरूप धारण केले. वाचळखोरांमध्ये सर्वात आघाडीवर असलेले नाव म्हणजे सॅम पित्रोदा! ते केवळ चार दशकांहून अधिक काळ काँग्रेसशी जोडलेले नाहीत, तर ते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय, मार्गदर्शक आणि राजकीय गुरू म्हणूनही ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक विधानाकडे केवळ त्यांचे वैयक्तिक मत म्हणून पाहिले जात नाही, तर ते राहुल यांच्या विचारांचे प्रतिबिंब मानले जाते आणि इथेच खरी समस्या निर्माण होते.
नुकतेच पित्रोदा यांनी एका मुलाखतीत पाकिस्तान, नेपाळ आणि बांगला देशचा उल्लेख करत म्हटले की, ‘मला या देशांमध्ये घरासारखे वाटते.’ वरवर पाहता हे विधान मैत्रीपूर्ण आणि सलोख्याचे वाटू शकते; पण भारताच्या संवेदनशील राजकारणात विशेषतः पाकिस्तानचे नाव घेणे हे राजकीय आत्महत्येपेक्षा कमी नाही. भारताचे पाकिस्तानसोबतचे नाते हे केवळ शेजारी देशाचे नाही; ते युद्ध, फाळणीच्या रक्तरंजित जखमा, दहशतवाद आणि खोलवर रुजलेल्या द्वेषाने भरलेले आहे. फाळणीची शोकांतिका, त्यानंतर झालेली तीन विनाशकारी युद्धे आणि सीमेपलीकडून होणार्या सततच्या दहशतवादी हल्ल्यांमुळे सामान्य भारतीयांच्या मनात पाकिस्तानबद्दल अविश्वास आणि तिरस्काराची भावना खोलवर रुजली आहे. याच जनमानसाला भाजपने अचूकपणे ओळखले आहे. कोणताही भारतीय नेता पाकिस्तानच्या बाजूने थोडी जरी मवाळ भूमिका घेताना दिसला, तर जनता त्याला तत्काळ देशद्रोही ठरवते.
भाजप प्रत्येक संधीवर स्वतःला राष्ट्रवादाचे एकमेव ठेकेदार आणि काँग्रेसला राष्ट्रविरोधी ठरवण्याची एकही संधी सोडत नाही. अशा स्थितीत पित्रोदांचे विधान भाजपसाठी एखाद्या अनमोल भेटीपेक्षा कमी नव्हते. जेव्हा काँग्रेसचा एक वरिष्ठ नेता, जो राहुल गांधींचा गुरू मानला जातो, तो पाकिस्तानला ‘घरासारखे’ म्हणतो, तेव्हा विरोधी पक्षांनाच नव्हे, तर सामान्य जनतेलाही तो राष्ट्रहिताच्या विरोधात वाटणे स्वाभाविक आहे.
भाजपने ही संधी सोन्यासारखी साधली. त्यांनी पित्रोदांच्या विधानाला थेट राहुल गांधींच्या विचारांशी जोडत जनतेसमोर काँग्रेसच्या देशप्रेमावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले. भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी तत्काळ प्रतिक्रिया दिली की, पित्रोदांना पाकिस्तान घरासारखे वाटत असेल, तर त्यांनी तिथेच निघून जावे, तर केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी त्यांना ‘गद्दार’ संबोधले. सोशल मीडियावर हे विधान वार्याच्या वेगाने पसरले आणि काँग्रेसला पुन्हा एकदा बचावात्मक पवित्रा घेण्यास भाग पडले.
पित्रोदांनी काँग्रेसला अशा अडचणीत टाकण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यांच्या वादग्रस्त विधानांची एक मोठी मालिकाच आहे. 2019 मध्ये त्यांनी 1984 च्या शीख दंगलींवर प्रतिक्रिया देताना ‘झाले ते झाले’ असे असंवेदनशील विधान केले होते, ज्यामुळे काँग्रेसला मोठा फटका बसला. त्याच वर्षी बालाकोट एअर स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्यांनी भाजपला राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर काँग्रेसला घेरण्यासाठी आयते कोलीत पुरवले. 2018 मध्ये त्यांनी‘मंदिरामुळे रोजगार मिळत नाही’ असे विधान करून भाजपला काँग्रेसवर ‘हिंदू श्रद्धेवरील हल्ला’ म्हणून टीका करण्याची संधी दिली. 2024 च्या निवडणुकीदरम्यान त्यांनी दक्षिण भारतीयांना ‘आफ्रिकन लोकांसारखे’ संबोधून मोठे वादळ निर्माण केले होते, ज्यामुळे त्यांना अखेर ‘इंडियन ओव्हरसीज काँग्रेस’च्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला.
आता पाकिस्तानबद्दलचे विधान पुन्हा एकदा भाजपच्या हाती असे धारदार शस्त्र देऊन गेले आहे, ज्याचा वापर करून ते आगामी काळात काँग्रेसवर सतत प्रहार करत राहतील. खरे तर, पित्रोदांची सर्वात मोठी समस्या ही आहे की, ते तांत्रिक आणि वैचारिक मुद्दे जनतेच्या भावनांपेक्षा मोठे मानतात. ते एका बौद्धिक आणि तांत्रिक विश्वात जगतात, जिथे तर्काला सर्वाधिक महत्त्व असते; पण राजकारण केवळ तर्कावर चालत नाही. ते भावना, प्रतीके आणि जनमानसाच्या आकलनावर चालते. या संपूर्ण घटनाक्रमातील सर्वात मोठी शोकांतिका ही आहे की, एका बाजूला राहुल गांधी जेवढी मेहनत घेतात, तेवढ्याच वेगाने पित्रोदांसारख्या नेत्यांची विधाने ती मेहनत कमकुवत करतात. राहुल स्वतःला एक गंभीर, संवेदनशील आणि जमिनीवरचा नेता म्हणून सादर करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्यांच्या यात्रांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला आहे. त्यांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी तरुणांना आवाहन केले आहे; पण जेव्हा त्यांचेच निकटवर्तीय पाकिस्तानचे गुणगान गातात किंवा अशी असंवेदनशील टिप्पणी करतात, तेव्हा राहुल यांची सर्व मेहनत संशयाच्या भोवर्यात सापडते. भाजप यालाच ‘राहुल यांचे विचार’ म्हणून जनतेसमोर सादर करते आणि काँग्रेसविरोधात एक भावनिक वातावरण तयार करण्यात यशस्वी होते. राहुल गांधींसमोर सर्वात मोठे आव्हान केवळ भाजपचा सामना करणे नाही, तर आपल्याच पक्षातील अशा बेजबाबदार आवाजांवर नियंत्रण मिळवणे, हे आहे.