टांगा पलटी घोडे फरार Pudhari File Photo
संपादकीय

टांगा पलटी घोडे फरार

शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत उत्तम आहे महाराज

पुढारी वृत्तसेवा

‘महाराजांचा विजय असो. मी आपल्या राज्याचा प्रधान उपस्थित आहे महाराज. आज्ञा करावी.’

‘प्रधानजी, आपल्या राज्यातील प्रभावतीनगरीचे हालहवाल कसे आहेत, याचा रिपोर्ट तत्काळ सादर करा.’ ‘होय महाराज. शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत उत्तम आहे महाराज. रस्त्यांची अवस्था आधी गहू, ज्वारी स्वच्छ करण्यासाठी वापरलेल्या चाळणीसारखी झाली होती, आता ती अधिक दुर्दशा होऊन रवा चाळण्याच्या चाळणी सारखी होऊन बसली आहे. गावातील एकही रस्ता चालण्याच्या लायकीचा राहिलेला नाही. दुचाकी वाहन चालवताना पाण्याने भरलेल्या खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे नागरिक धडाधड पडत आहेत. चारचाकी वाहनांना खड्डे किती खोल आहेत, ते कळत नसल्यामुळे ती जागोजागी अडकून पडत आहेत. तरी परंतु येथील नागरिक सुख, समाधानी जीवन जगत आहेत, हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे महाराज.’

‘वाह! प्रधानजी, आम्ही खूश आहोत आमच्या नागरिकांवर. रस्त्यांची दुर्दशा ही आम्ही मुद्दामच नागरिकांसाठी करून ठेवलेली आहे. उद्या राज्यावर एखादे परकीय संकट चालून आले, तर शत्रूसुद्धा प्रभावतीनगरीवर आक्रमण करणार नाही, याची आम्हाला खात्री आहे. रस्त्यांची एवढी बिकट अवस्था करून टाका की, शत्रूचे रणगाडेसुद्धा अडकून पडले पाहिजेत. आपत्कालीन संकटामध्ये आपण आपल्या राज्याची राजधानी याच नगरीत हलवूयात म्हणजे परकीय सेना आमच्यापर्यंत पोहोचणारच नाही. ते आम्ही मागे मेडिकल टुरिझम वाढवण्यासाठी सूचना केली होती त्याचे काय झाले.’

‘जी महाराज. प्रभावतीनगरीमध्ये अनेक महिला दूर दुरून येत आहेत. पार नाशिक, कोल्हापूर, भोपाळपासून गर्भवती महिलांची परभणी शहराच्या दिशेने रांग लागलेली आहे.’

‘काय सांगता काय प्रधानजी? गर्भवती महिलांनी या नगरीत येण्याचे कारणच काय?’

‘होय महाराज. आजकाल गर्भवती महिलांमध्ये सिझेरियनचे प्रमाण खूप वाढलेले आहे. शिवाय बाळंतपणात असंख्य अडचणी येत असतात. तुमचा भव्य फोटो लावून आम्ही राज्याच्या सीमांवर सर्वत्र मोठे बॅनर लावले आहेत. त्यावर असे लिहिले आहे की, ‘प्रभावतीनगरीत या आणि आपली डिलिव्हरी सुखरूप आणि नॉर्मल करून घ्या.’ आपला मोबाईल हातात घेतलेला चालतानाचा फोटो आणि त्याखाली ही सुखरूप डिलिव्हरीची ऑफर पाहून देशभरातून महिलांची गर्दी नगरीत होत आहे महाराज. बाहेरगावच्या महिला बस स्टँडवर उतरल्यानंतर ऑटोमध्ये बसून संपूर्ण गावाचा फेरफटका मारतात. रस्त्यांची बिकट अवस्था आणि ऑटोवाल्यांचे भन्नाट चालवणे यामुळे गर्भवती स्त्रीचा गर्भ हळूहळू मोकळा होतो आणि दवाखान्यात दाखल होताच काही मिनिटांत ते बाळ आईला कुठल्याही वेदना न देता या पृथ्वीतलावर अवतरते.’

‘वाह! प्रधानजी, आम्ही खूश आहोत तुमच्यावर. पुढील दहा वर्षे तरी या नगरासाठी एकही रुपया मंजूर करू नका. रस्ते आहेत त्यापेक्षा अधिक खराब झाले पाहिजेत म्हणजे मेडिकल टुरिझम वाढेल

आणि राज्याच्या तिजोरीत मोठी भर पडू शकेल.’ ‘होय महाराज.एक-दोन रस्ते बरे आहेत, ते पण उखडून टाकण्याची सूचना अधिनस्त कर्मचार्‍यांना देत आहे.’

‘येत्या रविवारी आमचा हवाई दौरा ठेवा आणि समस्त नागरजनांना आम्ही येत आहोत, अशी वर्दी द्या.’ ‘जी महाराज. आज्ञा द्यावी. महाराजांचा विजय असो.’

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT