तडका : अभिनव आंदोलन

अभिनव आंदोलन
अभिनव आंदोलन
Published on
Updated on

एक आटपाट नगर होते. नव्हे-नव्हे, परभणी नावाचा एक जिल्हा आहे. तेथे जिंतूर नावाचा एक तालुका आहे. तालुका आहे म्हटल्यानंतर समस्यांची संख्या जिल्ह्यापेक्षा अधिक असते, हे महाराष्ट्रात ठरलेले आहे. या जिंतूर नावाच्या खेडेवजा शहरामध्ये एक चौक आहे. ट्रक, बस, कार, मोटारसायकली, सायकली अशी असंख्य वाहने या चौकाला ओलांडून जात असतात. रस्त्याच्या बाजूला खड्डा पडला असेल, तर तो कसाबसा चुकवता येतो; परंतु चौकात रस्त्याच्या मधोमध एक मोठा खड्डा पडला होता. या खड्ड्यातून वळण रस्ता असल्यामुळे रात्रीच्या वेळी अनेक वाहनचालकांना हा खड्डा दिसत नसे. हा खड्डा ओलांडून जाणे या परिसरात असणार्‍या शाळा, मंगल कार्यालय, खासगी शिकवण्यांतील सर्व लोकांना आणि विद्यार्थ्यांना आवश्यक होते. त्यामुळे सायकलीवरून खड्ड्यात पडून अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याच्या असंख्य घटना घडल्या होत्या. जिंतूर या शहराचे वैशिष्ट्य म्हणजे जागरूक नागरिक ही दुरवस्था पाहून निराश झाले.

सामाजिक प्रश्नांबद्दल जागरूक असणार्‍या अनेक संघटनांनी आणि युवकांनी हा खड्डा त्वरित बुजवावा, अशी मागणी लावून धरली होती आणि त्याप्रमाणे असंख्य निवेदने संबंधित अधिकार्‍यांना दिली होती. या अधिकार्‍यांना एवढे सर्व होऊनही त्याची दखल घ्यावी वाटली नाही. शहरातील कुणाही लोकप्रतिनिधीला, ज्यांची स्वतःची निवडणुकीच्या वेळी जाहीर केलेली संपत्ती कोट्यवधीची असते, असे वाटले नाही कीस चार-पाच ट्रक मुरूम टाकून आपण किमान तो खड्डा तूर्त बुजवून घ्यावा. जिंतूर शहरातील युवकांचा नाइलाज झाला आणि त्यांनी चक्क भीक मांगो आंदोलन केले. राज्य महामार्गावरचा रस्ता असल्यामुळे अनेक कार आणि इतर वाहने तिथून जात होती. प्रत्येक कारवाल्याला थांबवून या युवकांनी कळकळीने, ‘शासनाकडे हा खड्डा बुजवण्यासाठी पैसे नाहीत, कृपया दहा रुपये द्या’ अशी भीक मागायला सुरुवात केली. उद्देश केवळ एकच होता की, काहीतरी करून हा खड्डा बुजवणे. अधिकारी निवेदने घेऊन कचरापेटीत टाकतात; मग शेवटी या लोकांकडे एकच पर्याय होता तो म्हणजे जनतेच्या दारी जाणे. रस्त्याने जाणारी जनता पण स्वतःच्या विविध प्रश्नांनी गांजलेली असते, तरीही त्यांनी एक रुपयापासून शंभर रुपयांपर्यंत दान या युवकांना केले. काही एक रक्कम जमा झाल्यानंतर त्यात पदरमोड करीत त्यांनी मुरूम आणला आणि तो खड्डा बुजवला. बेफिकीर शासनाचा निषेध म्हणून त्या खड्ड्यावर त्यांनी बेशरमाचे भले मोठे झाड आणून लावले. आहे की नाही अभिनव आंदोलन!

जिंतूर शहरातील हे युवक आसपासच्या प्रत्येक खेड्यात जाऊन वृक्ष संवर्धन मोहीम राबवत असतात. झाडे लावा, झाडे जगवा मोहीम जिंतुरात जोरात सुरू असते. त्याच युवकांना भाऊ-बहिणीचे अपघात टळावेत म्हणून भीक मागून तो खड्डा बुजवून त्यावर बेशरमाचे झाड लावावे लागले, याची खंत कुणाला तरी वाटणार आहे काय? आता त्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयाच्या आसपास किमान शंभर तरी बेशरमाची झाडे लावावीत, म्हणजे हे कार्यालय खर्‍या अर्थाने सुशोभित होईल. जिंतूरच्या युवकांनो, तुमचे खूप-खूप कौतुक आहे. वृक्ष लागवड मोहीम जोरात सुरू ठेवा, त्याचबरोबर जमेल तिथे, जिथे आवश्यक असेल तिथे बेशरमाची झाडे पण लावा.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news