संत कबीरांचा एक प्रसिद्ध दोहा आहे, ‘ऐसी वाणी बोलिए, मन का आपा खोए, औरन को शीतल करे, आपहुं शीतल होए ।’ म्हणजेच अशी वाणी बोलावी जी मनातील अहंकार दूर करते, इतरांना शांती देते आणि स्वतःलाही शांत करते. हा वाणीतील संयम आणि माधुर्याचा आदर्श आहे, जो समाजात शांतता आणि सलोख्याचे वातावरण निर्माण करतो; पण राजकारणाच्या जगात वाणीचे स्वरूप याच्या अगदी उलट झाले आहे. येथे राजकारण्यांचा प्रयत्न असतो की, जिभेच्या धारेने जास्तीत जास्त मतदान पदरात पाडून घेता यावे. त्यामुळेच राजकारणात सध्या एक नवीनच प्रघात रूढ झाला आहे. त्यांची वाणी गदारोळ निर्माण करणारी असावी, असा त्यांचा प्रयत्न असतो.
उमेश कुमार
निवडणुकीच्या काळात नेत्यांची भाषा इतकी धारदार होते की, मूळ मुद्दे आणि धोरणे मागे पडतात आणि केवळ आरोप-प्रत्यारोपांचा गदारोळ संपूर्ण वातावरणावर वर्चस्व गाजवतो. ‘राजकारणात अशी वाणी बोलावी की, ज्यामुळे गदारोळ होईल’ हाच ट्रेंड अधिक लोकप्रिय आहे. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईबद्दल केलेल्या अशोभनीय टिप्पणीचे प्रकरण शांत होत नाही तोच ‘बिडी आणि बिहार’च्या प्रकरणाने जोर धरला. केरळ काँग्रेसच्या युनिटने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली, ज्यात ‘बिडी आणि बिहार’ यांची तुलना केली होती. केरळ काँग्रेसने म्हटले की ‘बी’वरून बिडी आणि ‘बी’वरून बिहार होते. ही तुलना निवडणुकीच्या आखाड्यात आग लावण्यासाठी पुरेशी होती. प्रकरण चिघळल्यानंतर केरळ काँग्रेसने ही पोस्ट सोशल मीडियावरून काढून टाकली; पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. काँग्रेसलाही आपल्या प्रदेश युनिटच्या चुकीची जाणीव झाली होती. याच्या काही दिवसांपूर्वीच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बिहारला ‘छोटे राज्य’ म्हणून संबोधून वाद निर्माण केला होता. हे वक्तव्य त्यांनी राजकीय समीकरणांच्या द़ृष्टीने केले असले, तरी बिहारच्या जनतेने याला आपल्या अस्मितेवरचा हल्ला मानले.
भाजपने ही दोन्ही विधाने उचलून धरली आणि त्याला ‘काँग्रेस विरुद्ध बिहार’ असा रंग दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संधीचे सोने करत थेट विरोधी पक्षांवर हल्ला चढवला. त्यांनी बिहारसाठी एक विशेष पूर्ण रूप सादर केले. ते म्हणजे बी - समृद्ध बिहार, आय - अद्भुत बिहार, एच - प्रामाणिक बिहार, ए - महत्त्वाकांक्षी बिहार आणि आर - साधनसंपन्न बिहार! मोदी यांची ही व्याख्या केवळ एक घोषणा नव्हती; तर बिहारच्या अस्मितेला सन्मान देण्याची एक राजकीय रणनीती होती. त्यांनी काँग्रेसच्या विधानांना अपमान संबोधले आणि भाजपच्या वतीने बिहारी जनतेमध्ये अभिमानाची भावना निर्माण केली. काँग्रेस नेत्यांची वादग्रस्त विधाने काही नवीन नाहीत. कधी पंतप्रधान मोदींवर वैयक्तिक टीका, कधी हिंदू धर्मावर कठोर शब्द, तर कधी एखाद्या राज्याची तुलना नकारात्मक प्रतीकाशी करणे, या प्रत्येकवेळी काँग्रेस स्वतःला बचावात्मक भूमिकेत आणते. खर्गे यांचे ‘बिहार छोटे राज्य’ हे विधान विरोधी पक्षांच्या एकजुटीला कमकुवत करणारे ठरले. भाजपने लगेचच प्रश्न उपस्थित केला की, जो पक्ष स्वतःला राष्ट्रीय पर्याय मानतो, तो बिहारसारख्या ऐतिहासिक आणि राजकीयद़ृष्ट्या महत्त्वाच्या राज्याला छोटे कसे म्हणू शकतो? भाजपने नेहमीच अस्मितेच्या राजकारणाला शस्त्र बनवले आहे.
गुजरातमध्ये ‘गौरव यात्रा’ असो, बंगालमध्ये ‘जय श्रीराम’चा नारा असो किंवा तामिळनाडूमध्ये भाषा आणि संस्कृतीचा मुद्दा असो, भाजपला हे चांगलेच माहीत आहे की, जनता आपल्या वारशांचा अपमान सहन करत नाही. बिहारच्या बाबतीतही भाजपने काँग्रेसच्या चुकांना ‘अपमान’ म्हणून सादर केले आणि लगेचच मोदी यांची नवी व्याख्या लोकांसमोर ठेवली. हे थेट अपमान विरुद्ध सन्मान असे राजकारण आहे, ज्यात भाजपला आघाडी मिळताना दिसत आहे.
राजकारणात जीभ घसरण्याचा इतिहास जुना आहे. काँग्रेसच्या नेत्यांपासून ते भाजप आणि इतर पक्षांपर्यंत, जवळपास प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी कधी ना कधी अशी विधाने केली आहेत, ज्यांनी निवडणुकीचे वातावरणच बदलून टाकले. 2014 लोकसभा निवडणुकीत प्रियांका गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना नीच प्रवृत्तीची व्यक्ती म्हटले होते.
भाजपने याला गरीब आणि मागास जातींचा अपमान ठरवून प्रत्युत्तर दिले आणि मोदी यांनी प्रत्येक सभेत याला सहानुभूती आणि अभिमानाचा मुद्दा बनवले. याआधी मणिशंकर अय्यर यांची ‘चहावाला’ ही टिप्पणी भाजपसाठी वरदान ठरली होती. मोदी यांनी आपली पार्श्वभूमी लोकांच्या भावनांशी जोडून सर्वसामान्यांचा विश्वास जिंकला.
भाजप नेत्यांची जीभही अनेकदा घसरली आहे. गिरीराज सिंह यांनी सोनिया गांधींवर केलेली वैयक्तिक टिप्पणी, साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी गोडसेला देशभक्त म्हणणे किंवा योगी आदित्यनाथ यांचे ‘अब्बाजान’ वक्तव्य, ही सर्व विधाने विरोधकांसाठी शस्त्र बनली; पण फरक हा आहे की, भाजपने अनेकदा या वादग्रस्त विधानांनाही आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला.
निवडणुकीचे राजकारण आता घोषणा आणि आश्वासनांपेक्षा अधिक जिभेवर आणि विधानांवर अवलंबून राहू लागले आहे. इंडिया आघाडीत काँग्रेसची भूमिका सर्वात मोठी आहे; पण हीच भूमिका अनेकदा ओझेही बनते. खर्गे आणि केरळ युनिटच्या टिप्पण्यांनंतर राजद नेते तेजस्वी यादव यांना स्पष्टीकरण द्यावे लागले. ते म्हणाले की, हे काँग्रेसचे विधान आहे, राजदचे नाही. ही परिस्थिती आघाडीतील अस्वस्थता दर्शवते. बिहारसारख्या राज्यात, जिथे राजदचा मोठा मतदारवर्ग आहे, तिथे काँग्रेसची विधाने संपूर्ण आघाडीला नुकसान पोहोचवू शकतात.
भारतीय राजकारण आता बदलू लागले आहे. एकेकाळी निवडणुका घोषणा आणि आश्वासनांवर लढल्या जात होत्या. इंदिरा गांधी यांची ‘गरिबी हटाव’, अटलबिहारी वाजपेयी यांचे ‘सुशासन’ किंवा मोदी यांचे ‘अच्छे दिन’ या घोषणांनी निवडणुकीच्या राजकारणाला दिशा दिली होती. आज परिस्थिती बदलली आहे. आता एखादे चुकीचे विधान किंवा सोशल मीडिया पोस्टच निवडणुक मुख्य मुद्दा बनते. भाजप आता प्रत्येक सभेत आणि पोस्टरवर काँग्रेसला बिहारविरोधी आणि स्वतःला बिहार समर्थक ठरवण्याची मोहीम राबवत आहे. हेच राजकारणाचे नवे वास्तव आहे. जिथे प्रत्येक शब्द तोलून मापून बोलावा लागतो. राजकारणात कबीरांच्या वाणीचा आदर्श आता कुठेच दिसत नाही.