अहमदाबाद : विद्यमान पंतप्रधान व गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विशेष निमंत्रणावरून ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी त्यांची 21 जून 2013 रोजी भेट घेतली. त्यावेळी संखेडा झोपाळ्यावर ना. मोदी व डॉ. जाधव यांच्यात दिलखुलास दीड तास चर्चा झाली. छायाचित्रात डावीकडे ‘पुढारी’चे समूह संपादक डॉ. योगेश जाधव. (Pudhari File Photo)
संपादकीय

PM Narendra Modi 75th Birthday: जिगरबाज दोस्त मोदीजी

‘परमेश्वर एखाद्या महापुरुषाला ज्या मुशीतून जन्माला घालतो तद्नंतर ती मूसच तो तोडून टाकतो.’

पुढारी वृत्तसेवा

PM Narendra Modi 75th Birthday

डॉ. प्रतापसिंह जाधव मुख्य संपादक, ‘पुढारी’

‘परमेश्वर एखाद्या महापुरुषाला ज्या मुशीतून जन्माला घालतो तद्नंतर ती मूसच तो तोडून टाकतो.’

सुप्रसिद्ध स्कॉटीश तत्त्वचिंतक थॉमस कार्लाईल यांचं हे विधान जगातल्या कुठल्याही महापुरुषाला तंतोतंत लागू पडते. भारतापुरता विचार करायचा झाला, तर नेहरूजी हे एक महान व्यक्तिमत्त्व होतं आणि भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हेसुद्धा तेवढंच महान व्यक्तिमत्त्व! परंतु, दोघे एकमेकांसारखे मुळीच नाहीत. कारण, नेहरूजींसमोरच्या समस्या वेगळ्या होत्या. आव्हानं वेगळी होती आणि मोदीजी ज्या काळात पंतप्रधान झाले, त्या काळातील समस्या अधिक बिकट होत्या. आव्हानं अधिक जटिल होती, तरीही मोदीजींनी ज्या धैर्यानं आणि ज्या लढाऊ बाण्यानं या सर्वांना तोंड देऊन देशाला विकासाच्या मार्गानं पुढं नेलं, त्याला तोड नाही.

मोदीजींचं हे यश पाहिल्यानंतर पुन्हा एकदा, थॉमस कार्लाईलच्या आणखी एका विधानाची आवर्जून आठवण येते. Strong Leaders are born and not made. कधी कधी मोदीजींच्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचं व्यक्तिमत्त्व वास करीत असल्याचा आभास होतो. कदाचित आपल्या देशाला एका पोलादी पुरुषाची गरज आहे, हे लक्षात घेऊन देवानं त्या मुशीत पोलादी रसायनच ओतलं असावं, असं म्हटलं तर ते अतिशयोक्तीचं ठरणार नाही.

कारण, दि. 26 मे 2014 रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर मोदीजींनी अथक आणि अदम्य परिश्रम घेऊन देशाला उन्नतीच्या मार्गाकडे ज्या पद्धतीने नेण्याचा प्रयत्न केलेला आहे, तसा प्रयत्न जगातल्या अन्य कुठल्या नेत्यानं क्वचितच केला असेल. मुळात पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेताच संसद भवनापुढे आपला माथा टेकूनच मोदीजींनी कार्यारंभ केला आणि आपण प्रधानमंत्री नव्हे, तर देशाचे प्रधानसेवक असल्याची ग्वाही त्यांनी जनतेला दिली. मोदीजींच्या ‘सब का साथ, सब का विकास’ या उदात्त ध्येयामुळेच गेली अकरा वर्षे देशाचे चित्र पालटून गेलेले आहे, यात शंकाच नाही.

तळागाळातील, गोरगरिबांच्या अन्न, पाणी आणि निवार्‍याची चिंता करण्याबरोबरच तरुणाईला उद्योगप्रवण करणारी तसेच स्वच्छ भारत अभियानाबरोबरच आत्मनिर्भर भारताचा ध्यास घेणारी त्यांची असामान्य दूरद़ृष्टीच देशाला महासत्ता हे बिरुद मिळवून देण्यात यशस्वी ठरली आहे आणि ही बाब सर्व भारतीयांसाठी निश्चितच अभिमानाची म्हणावी लागेल.

हरित क्रांतीइतकीच शैक्षणिक क्रांतीही महत्त्वाची असते, हे ध्यानी घेऊन मोदीजींनी या देशात शिक्षणाचा व्यापक पाया रचला. सुमारे 490 नवीन विद्यापीठांना मान्यता देत असतानाच त्यांनी तब्बल आठ हजारांहून अधिक महाविद्यालयेही देशभर सुरू केली. पीएलआय योजनेमुळे भारत जगातील दुसर्‍या क्रमांकाचा फोन उत्पादक देश बनला आहे. ही केवळ अभिमानाची नव्हे, तर गर्वाची गोष्ट म्हटली पाहिजे.

तसेच परराष्ट्र धोरणातही भारतानं योग्यवेळी योग्य भूमिका घेऊन जगात दबदबा निर्माण केला. ‘जी-20’चे यजमानपद आपल्याकडं घेण्यात मोदीजींची मोठी दूरद़ृष्टी दिसून आली. भारतात संपन्न झालेल्या या परिषदेमुळे भारतीय संस्कृती जगभरात पोहोचली, हे मुद्दाम अधोरेखित करावेच लागेल.

कोणत्याही सरकारचं यश, ते जनतेला पायाभूत सुविधा किती व कसं देतं, यावरच अवलंबून असतं. हे ध्यानी घेऊन मोदीजींनी गेल्या अकरा वर्षांत पायाभूत सुविधांवर सर्वाधिक भर देऊन देशाला उन्नतीच्या राजमार्गावरून फार पुढे नेलं आहे, यात शंका नाही. मोदीजींचं एनडीए सरकार 2014 मध्ये स्थापन झालं, तेव्हा भारताचं दरडोई वार्षिक उत्पन्न 86,647 रुपये होतं. ते 2022-23 मध्ये दुप्पट होऊन 1,72,000 रुपये झालं.

आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करणारा आपला देश, मोदीजींच्या नेतृत्वाखाली अंतराळात झेप न घेईल तरच नवल! आपल्या ‘इस्रो’नं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रोव्हर सॉफ्ट लँड करून इतिहास रचला आणि ही कामगिरी करणारा भारत जगातला पहिला देश ठरला, हे विशेष होय. भारतानं अंतराळ व्यवस्था खुली केली असून आता या क्षेत्रात दोनशेपेक्षा अधिक स्टार्टअप्स काम करत आहेत. अर्थातच मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रोत्साहनामुळेच हे घडू शकलं, हे निर्विवाद!

मोदीजींनी केवळ सामाजिक आणि आर्थिक क्रांतीच केली असं नाही, तर त्यांनी भौगोलिक क्रांतीही घडवून आणली, यात वादच नाही. दि. 5 ऑगस्ट 2019 हा दिवस देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला. जम्मू-काश्मीरला देशापासून अलग ठेवणारं राज्यघटनेतील कलम 370 आणि 35-अ, मोदीजींच्या निर्धारयुक्त इच्छाशक्तीनं याच दिवशी रद्द करण्यात आलं आणि काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत देश खर्‍या अर्थानं एकसंध झाला, एकात्म झाला.

प्रत्येक माणसाच्या जगण्यामागं एक विशिष्ट असा कार्यकारणभाव असतो. किंबहुना नियती त्याच्याकडून ते कार्य करून घेण्यासाठीच त्याला जन्माला घालत असते. मोदीजींच्या हातूनही महान कार्य व्हायचे होते, ते म्हणजे रामजन्मभूमीवरचं प्रभू श्रीरामाचं मंदिर होय. शेकडो वर्षे खितपत पडलेला रामजन्मभूमीचा प्रश्न मोदीजींनी मोठ्या कौशल्यानं सोडवला आणि त्या ठिकाणी मंदिराची उभारणी करून एक नवा इतिहासच घडवला.

डोळ्यात तेल घालून सीमांचे रक्षण करणार्‍या आमच्या जवानांच्या डोळ्यांत धूळ फेकून काही दहशतवादी पहलगाम येथे आले आणि त्यांनी 26 निष्पाप यात्रेकरूंची निर्घृण हत्या केली. या दुर्दैवी घटनेनं सारा देश हादरला; पण मोदीजींनी जशास तसे उत्तर दिलं. दि. 7 मे 2025 ची मध्यरात्र पाकिस्तान व पाकिस्तानधार्जिण्या दहशतवाद्यांसाठी काळरात्र ठरली. मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली भारतीय लष्करानं ‘ऑपरेशन सिंदूर’ ही मोहीम राबवून ‘इट का जवाब पत्थर से’ दिला. या मोहिमेत जवळ जवळ सारे जग भारताच्या बाजूने होते, हा मोदीजींनी गेल्या अकरा वर्षांत राबवलेला परराष्ट्र धोरणाचा विजय होय.

देशाची छाती पोलादासारखी दणकट राहावी आणि जगानं भारतापासून दबकून राहावं, या दूरद़ृष्टीतून मोदीजींनी भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा अमेरिकेच्या ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ या महाकाय शिल्पाशी स्पर्धा करणारा भव्य पुतळा गुजरातमध्ये उभा केला. हे मोदीजींच्या दूरद़ृष्टीचे द्योतकच म्हणावे लागेल.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून पहिल्यांदाच भारताचे वजन सर्व जगामध्ये वाढलेले आहे. मोदीजींच्या कार्यकर्तृत्वामुळे जगाची भारताकडे बघण्याची नजर आता आदरयुक्त झालेली आहे. यात शंभर टक्के योगदान मोदीजींचे आहे, हे त्यांचे शत्रूही मान्य करतील.

मोदीजी एक यशस्वी, धाडसी आणि कर्तृत्ववान राज्यकर्ते आहेत, यात शंकाच नाही. म्हणून एक कुटुंबवत्सल व्यक्ती म्हणून किंबहुना एक जीवाभावाचा मित्र म्हणून ते किती ग्रेट आहेत, हेसुद्धा कुठेतरी नोंदवणं आवश्यक आहेच.

माझी आणि मोदीजींची मैत्री ही सुमारे वीस वर्षांपासूनची. कदाचित कोणाला पटणारही नाही किंबहुना मला स्वत:लाही कधी कधी या गोष्टीचा अचंबा वाटतो. त्याचं असं झालं. सुमारे वीस वर्षांपूर्वी 2003 मध्ये मी कोल्हापुरातच एका विवाह समारंभाला उपस्थित राहिलो होतो. हा विवाह भाजपच्या बाबा देसाई यांच्या मुलाचा होता. त्या विवाहाला भाजपचे राष्ट्रीय नेते गोपीनाथजी मुंडे हेही आलेले होते. त्यांच्यासोबत मोदी आले होते. गोपीनाथजींनी त्या मोदींशी माझी ओळख करून दिली. ते म्हणाले, ‘हे नरेंद्र मोदी. आमच्या गुजरात भाजपचे धडाडीचे मुख्यमंत्री.’ ती माझी व मोदीजींची पहिली भेट होती. डोळ्यांत मोठी स्वप्नं घेऊन दिलखुलासपणे बोलणारे मोदी मनाला खूपच भावले. तरीही पहिल्याच भेटीत आमची घट्ट मैत्री जमली. कारण, मला स्वतःला समविचारी माणसांपेक्षा स्वतःच्या विचारांशी प्रामाणिक असणारा माणूस आवडतो. मोदीजी तसेच होते. म्हणून आमची मैत्री जमली व ती उत्तरोत्तर वाढत गेली.

पुढे मोदीजी गुजरातचे मुख्यमंत्री झाले. मला त्यांचे कौतुक व अभिमान वाटला. ते मला वारंवार गुजरात भेटीचे निमंत्रण देत होते. परंतु, माझ्या कार्यबाहुल्यामुळे मला ते शक्य होत नव्हते. परंतु, मोदींजींना भेटण्याची ओढ तर लागून राहिलीच होती. दरम्यानच्या काळात गुजरातमध्ये भीषण भूकंप झाला. त्यावेळी मी माझ्या ‘पुढारी’च्या माध्यमातून गुजरात मदत फंड जमा केला व त्या पैशातून भूज येथे एक हॉस्पिटल उभे केले. या सगळ्याची नोंद मोदीजी घेत होते आणि मला गुजरात भेटीचे स्टँडिंग इन्व्हिटेशन देऊन ठेवलेलेच होते.

अखेर दि. 21 जून 2013 रोजी तो योग जुळून आला. मी तसेच योगेश त्या दिवशी मोदीजींच्या भेटीसाठी गांधीनगरला पोहोचलो. पंचामृत भवनाच्या दुसर्‍या मजल्यावरच्या मुख्यमंत्र्यांच्या कक्षातच आमची भेट झाली. मुख्यमंत्र्यांच्या दालनाचा दरवाजा उघडून मोदीजी स्वतः बाहेर आले आणि ‘या जाधवजी’ असं हर्षानंदानं उद्गारीत मला व योगेशला कडाडून मिठी मारली आणि मग आम्हाला आत घेऊन जाऊन सोफ्यावर बसवले आणि हसत चक्क मराठीतून म्हणाले, ‘आम्ही जनतेचे पुढारी, तुम्ही आमचे पुढारी.’ सुमारे दोन दिवस आम्ही त्यांचा पाहुणचार घेतला. त्या दोन दिवसांत आम्हाला सारा गुजरात फिरून दाखवण्यात आला. मोदीजींच्या नेतृत्वाखाली गुजरातची झालेली प्रगती पाहून आम्ही भारावून गेलो.

गुजरात सोडताना मोदीजी मला म्हणाले, ‘गुजरातची प्रगती आपण पाहिलीत. अशीच प्रत्येक राज्यांची प्रगती व्हावी, असं मला वाटतं.’ त्यावर मी म्हणालो, ‘काय सांगावं, ती तुमच्या हातूनच व्हायची असेल.’ मग ते म्हणाले, ‘मी तर फक्त गुजरातचाच मुख्यमंत्री आहे.’ त्यावर मी म्हणालो, ‘देशाचे पंतप्रधानही लवकरच व्हाल,’ त्यावर ते खळाळून हसले व म्हणाले, ‘दिल्ली अभी बहूत दूर हैं।’

परंतु, मोदीजींकरता दिल्ली आता फार दूर राहिलेली नव्हती. पुढे अगदी लवकरच मोदीजींची पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून निवड झाली आणि खरोखरीच 2014 च्या निवडणुकीत भाजपला विजय मिळाला. नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाले.

‘पुढारी’मध्ये ही बातमी मी सिक्स लाईनसह छापली. त्याची शाई वाळते न वाळते तोच, मोदीजींचा मला फोन आला. मोदीजी म्हणाले, ‘जाधवजी, मी पंतप्रधान होईन हे अभ्यासपूर्णपणे सांगणारे आपणच एकमेव संपादक आहात, आपल्याला मी कसा विसरेन?’ त्यावर मी त्यांचे पंतप्रधान झाल्याबद्दल मनापासून अभिनंदन केलं. तेव्हा ते म्हणाले, ‘प्रधानमंत्री म्हणू नका. प्रधानसेवक म्हणा!’

असा हा मित्रत्व जपणारा उमद्या मनाचा पंतप्रधान देशाला लाभला. त्यांच्या शपथविधीला मी व योगेश आवर्जून हजर होतो. या प्रसंगाचं औचित्य साधून मी दैनिक ‘पुढारी’त ‘मोदी पर्व’ हा विशेषांक प्रकाशित केला होता. त्याची प्रत मी त्यांना दिली. त्यावर ते कौतुकाने म्हणाले, ‘आपने इतनी सारी जानकारी कहाँ से इकठ्ठा की?’

पुढे ‘पुढारी’च्या सुवर्णमहोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून ते अगत्यपूर्वक उपस्थित राहिले आणि त्यांनी कोल्हापूरकरांची मने जिंकली. मी माझ्यासाठी काही मागितले नाही, तर कोल्हापूरच्या अनेक समस्या मांडल्या. त्यातल्या बर्‍याचशा समस्या त्यांनी पुढे सोडवल्याही. आवर्जून उल्लेख करायचा झाला, तर विमानतळ व खंडपीठाचा करावा लागेल. केवळ समारंभाचा पाहुणा म्हणून व्यासपीठावर न वावरता व्यासपीठामागे माझ्या परिवाराशीही त्यांनी संवाद साधला. त्यांच्यासोबत फोटोही काढून घेतले. तेव्हा ते म्हणाले, ‘जाधवजी, ‘पुढारी’ परिवार मेरा परिवार हैं। मैं ‘पुढारी’ परिवार का सदस्य हूँ।’

अशातर्‍हेने मोदीजी नाती जपणारे सद्गृहस्थ आहेत. हा माणूस माणसं जोडणारा आहे. म्हणूनच त्यांनी जगभर माणसं जोडली. अगदी बराक ओबामांपासून ते थेट ट्रम्प आणि पुतीन यांच्यापर्यंत त्यांनी जागतिक नेत्यांशी मैत्री केली. त्यांनी खासगी जीवनातही लहान-मोठे नातेसंबंध अगदी हळुवारपणे सांभाळले. महत्त्वाचं उदाहरण लता मंगेशकर यांचं देता येईल. हे बहीण-भावाचं नातं त्यांनी लतादीदींच्या अखेरच्या श्वासापर्यंत सांभाळलं.

त्यांच्या मर्मबंधातील ठेव म्हणजे, त्यांची आई होय. आईबद्दल त्यांच्या मनात एक हळुवार कोपरा होता. म्हणूनच राजकारणाच्या धबडग्यातही वाकडी वाट करून ते आपल्या आईला भेटायला जात असत; पण आता ती वीणही उसवली. आता आई राहिली नाही! मोदीजींच्या जीवनातील एक ‘अनमोल ऐवज’ खर्ची पडला. मोदीजी रिते झाले! अब फकिर को क्या फिकीर? देशाचा संसार करण्यासाठी मोदीजी आता स्वतंत्र झाले.

मोदीजींच्या कार्याची किंमत आजच्या पिढीला थोडीफार कमी समजत असेल; परंतु उद्याचे इतिहासकार त्यांच्या कार्याचं योग्य मूल्यमापन केल्याशिवाय राहणार नाहीत.

मला पुन्हा एकदा मोदीजींच्या बाबतीत थॉमस कार्लाईल यांचे आणखी एक वचन उद्धृत करण्याचा मोह टाळता येत नाही.

Effective Leaders are those, gifted with devine inspiration and right characteristic.

मोदीजी प्रभावी आहेत.

आशीर्वादीत आहेत.

चारित्र्यवान आहेत.

आज ते अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यांना उदंड आयुष्य व मानसन्मान लाभो, हीच भारतमातेकडे प्रार्थना!

जीवेत शरदः शतम् शतम्.

सुदिनं सुदिनं जन्मदिनम्।

भवतु मंगलम् विजयीभव सर्वदा।

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT