

अॅड. श्रीकांत जाधव माजी सदस्य, महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिल
सांगलीसह सहा जिल्ह्यांसाठी कोल्हापूर येथे खंडपीठ सुरू व्हावे, यासाठी दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव व समूह संपादक योगेशदादा जाधव यांचे मोठे योगदान आहे.
सहा जिल्ह्यांतील पक्षकारांची सोय व्हावी व पीडितांना वेळेत व कमी पैशात तसेच घरापासून जवळच्या अंतरावर न्याय मिळावा, यासाठी कोल्हापूर येथे खंडपीठ सुरू व्हावे, अशी मागणी सुरुवातीला दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी सुमारे 50 वर्षांपूर्वी केली होती. मागणीचा पाठपुरावा करता यावा, यासाठी खंडपीठ कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. सर्व गट-तट व विचार बाजूला ठेऊन सामुदायिक निर्णयातून समिती स्थापन करण्यासाठी डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी पुढाकार घेतला आहे.
समिती स्थापन झाल्यानंतर सहा जिल्ह्यांतील वकिलांचे बळ मिळावे म्हणून सुरुवातीला या सहा जिल्ह्यांतील सर्व वकील संघटनांना या समितीमध्ये स्थान मिळवून देण्याचे काम त्यांनी केले आहे. खंडपीठ कृती समितीच्या प्रत्येक आंदोलनामध्ये दैनिक ‘पुढारी’ व त्यांचा परिवार सक्रिय सहभागी होता.
खंडपीठ कृती समिती स्थापन झाल्यानंतर या सहा जिल्ह्यांतील सर्व राजकीय पक्ष व संघटना यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे योगदान मोठे आहे. त्यांनी खंडपीठासाठी पाठिंबा मिळावा, यासाठी अनेक राजकीय नेत्यांना व मंत्र्यांना विनंती केली व त्यांच्या विनंतीला मान देऊन अनेक आजी-माजी मंत्री या आंदोलनात सहभागी झाले.
आंदोलन करूनदेखील खंडपीठाची मागणी पूर्ण होत नाही, म्हणून काही वकिलांच्या तीव्र भावना होत्या. त्या भावनेतून आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा काही वकिलांचा हेतू होता. त्यांच्या या हेतूमुळे आंदोलन भरकटेल व मूळ विषय बाजूला पडेल, या हेतूने डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी समन्वय साधून आंदोलनाची दिशा भरकटू दिली नाही, हे विशेष.
मुंबई येथील काही प्रस्थापित वकिलांचा कोल्हापूर खंडपीठासाठी अप्रत्यक्ष विरोध होता. त्यांनी खंडपीठ कृती समितीमध्ये व या सहा जिल्ह्यांतील वकिलांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. त्याचाच एक भाग म्हणून सांगली, रत्नागिरी, सोलापूर या जिल्ह्यांसाठी खंडपीठाची मागणी अल्पसंतुष्ट लोकांमार्फत पुढे करण्यात आली. खंडपीठ विरोधकांची चाणक्य नीती लक्षात आल्याने डॉ. जाधव यांनी बुद्धिकौशल्य वापरून खंडपीठ कृती समितीला मार्गदर्शन करीत ही हुलकावणी हाणून पाडली.
प्रदीर्घ आंदोलनामध्ये दैनिक ‘पुढारी’च्या मुख्य संपादकांचा व पुढारी परिवाराचा मोठा वाटा आहे. आज सर्किट बेंचची घोषणा झाली आहे. या पार्श्वभूमीवर दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव व डॉ. योगेशदादा जाधव, तसेच ‘पुढारी’च्या परिवाराचे आभार मानावे तितके कमीच.