काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी विकसित केलेले तीन परम रुद्र महासंगणक देशाला अर्पण केले. संगणकीय विज्ञान आणि तंत्रज्ञानातील नवकल्पना विकसित करून संशोधनात स्वावलंबी होण्याच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. कुठल्याही देशाची आर्थिक, सामाजिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरची ताकद काही प्रमाणात महासंगणक क्षेत्राच्या प्रगतीवर आधारित असल्याने परम रुद्र महासंगणक हा महत्त्वाचा टप्पा ठरतो.
तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे जगातील अब्जावधी लोकांच्या जीवनामध्ये फार वेगाने बदल घडताना आपण पाहतो आणि अनुभवतो आहोत. या सर्व प्रकारच्या तंत्रज्ञानात माहिती व संवादाचे तंत्रज्ञान सर्वात आघाडीवर आहे. यामुळे पूर्वी असलेले अंतराचे बंधन आता नाहीसे झाले आहे. आज सर्वांना सर्वप्रकारची माहिती मिळू शकते, तसेच परस्परांशी गतिशील संवादही होऊ शकतो. अशा प्रकारे सर्व जग जोडले जाऊन ‘ग्लोबल व्हिलेज’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरली आहे. तंत्रप्रणालींच्या संयोगांमुळे विशेषतः चित्र, ध्वनी आणि माहितीच्या एकत्रित वापरामुळे एकात्मिक माहिती, संवाद आणि करमणुकीचे एक वेगळेच दालन उघडले आहे. या रूपाने पृथ्वीवर पुन्हा एकदा ‘आईस एज’ अवतरले आहे, असे म्हणता येईल. व्यक्तिगत तर सोडाच, परंतु औद्योगिक, सामाजिक व सार्वजनिक पातळीवर संगणकाच्या या विविध अवतारांचे क्रांतिकारी आणि दूरगामी परिणाम होतील; पण अशा प्रकारच्या डिजिटल जीवनपद्धतीला वेगवान त्वरित सेवा देण्यासाठी विशाल मेमरी व संगणकीय क्षमता लागते. असाच विचार तीस दशकांपूर्वी आपल्या देशात झाला होता.
हवामान बदल, अंतराळ संशोधन, औषध निर्माणशास्त्र व भौतिकशास्त्र यासारख्या क्षेत्रांत जटिल मॉडेल तयार करण्यासाठी प्रचंड प्रमाणात डेटाची प्रक्रिया करण्याची गरज असते. इथेच महासंगणक लागेल, असा विचार झाला. जो संगणक नेहमीच्या सर्वसाधारण संगणकापेक्षा खूपच जास्त क्षमतेने काम करू शकतो, तो महासंगणक; पण 80 च्या दशकात असे उच्च तंत्रज्ञान आपण विकसित देशांकडून आयात करत होतो (प्रामुख्याने अमेरिका). अमेरिकेने त्यावेळी असा महासंगणक आपल्याला निर्यात करायला नकार दिला. भारतासारख्या गरीब, विकसनशील देशाला त्याची गरजच काय, असा विचार होता; पण घडले उलटेच. ‘सीडॅक’च्या शास्त्रज्ञांनी (पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांच्या नेतृत्वाखाली) स्वदेशी महासंगणक विकसित करायचा विडा उचलला. मग घडला तो इतिहास.
1991 मध्ये ‘सीडॅक’मध्येच ‘परम’ हा पहिला भारतीय महासंगणक तयार झाला. आपल्यासमोरील निरनिराळे प्रश्न सोडवणे, कृत्रिम बुद्धिमत्ता, विदा पृथ्थकरण व तिच्या वापरामुळे होत असलेल्या अद्भुत बदलांचा सकारात्मकतेने सामना करणे, यासाठी महासंगणकाचा वापर होतो. या स्पर्धेत नुसतेच टिकून राहण्यासाठी नव्हे, तर पुढे जाण्यासाठी महासंगणकीय तंत्रज्ञान देशासाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने 2015 मध्ये नवे राष्ट्रीय महासंगणक धोरण जाहीर केले. त्यानुसार अनेक महासंगणक अनेक ठिकाणी प्रस्थापित करणे योजिले होते. महासंगणक हा आधुनिक जगात अत्यंत महत्त्वाचा घटक बनला आहे. त्याची प्रचंड संगणन क्षमता विज्ञान, उद्योग व समाज या सर्व क्षेत्रांत क्रांती घडवून आणत आहे. भविष्यात महासंगणकाचा वापर अधिकाधिक वाढणार असून, त्यामुळे आपले जीवन अधिक सोपे आणि सुखकर होणार आहे. भारताला जर विकसित अर्थव्यवस्था व संशोधन प्रेरक राष्ट्र बनायचे असेल, तर स्वदेशी महासंगणक लागतील. त्यामुळे हे धोरण महत्त्वाचे आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय सुपरकॉम्प्युटिंग मिशनअंतर्गत स्वदेशी विकसित केलेले तीन परम रुद्र महासंगणक देशाला अर्पण केले. हे सुपर कॉम्प्युटर ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग’ने विकसित केले आहेत. 130 कोटी रुपये खर्चून बनवलेले हे तीन महासंगणक पुणे, दिल्ली व कोलकाता येथे अग्रेसर वैज्ञानिक संशोधनासाठी तैनात केले आहेत. पुण्यातील जायंट मीटर रेडिओ टेलिस्कोप, फास्ट रेडिओ बर्स्टस् व इतर खगोलीय घटनांचा शोध घेण्यासाठी सुपर कॉम्प्युटरचा उपयोग होईल.