चीनच्या नव्या कुरापती Pudhari File Photo
संपादकीय

चीनच्या नव्या कुरापती

पुढारी वृत्तसेवा
नरेंद्र क्षीरसागर, आंतरराष्ट्रीय अभ्यासक

आशिया खंडात आक्रमक विस्तारवादी भूमिका घेणार्‍या चिनी ड्रॅगनमुळे सर्व शेजारील देश त्रस्त आहेत. यास भारतही अपवाद नाही. कोणत्या ना कोणत्या मार्गाने भारताला अडचणीत आणण्याचे चीनचे प्रयत्न सुरू असतात. अलीकडेच चीनने पूर्व लडाखच्या पँगाँग त्सो सरोवराच्या वायव्य किनार्‍याला जोडणारा एक पूल वापरास सुरुवात केली आहे. या पुलामुळे पीपल्स लिबरेशन आर्मीला (पीएलए) या भागात सैनिक आणि रणगाडे आणण्यासाठीचा कालावधी कमी होणार आहे. नवीन पूल हा भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईला प्रत्युत्तर असल्याचे मानले जात आहे.

चीनने पूर्व लडाखच्या पँगाँग त्सो सरोवराच्या वायव्य किनार्‍याला जोडणारा एक पूल उभारला आहे आणि तो कार्यान्वितही केला. यानुसार पीपल्स लिबरेशन आर्मीला (पीएलए) या भागात सैनिक आणि रणगाडे आणण्यासाठी कमी वेळ लागेल. उपग्रहाच्या चित्राचा संदर्भ देत माध्यमांनी या पुलाची माहिती दिली आहे. चीन सातत्याने सीमाभागात सैनिकांसाठीच्या पायाभूत सुविधांना बळकटी देण्याचे काम करत आहे आणि त्यात आता सुमारे 400 मीटर लांबीचा पूल उभारल्याचे वृत्त आहे. यामुळे चीनला सीमाभागात सैनिकांची जमवाजमव करण्यासाठी फार वेळ लागणार नाही. 2020 च्या प्रारंभी भारत अणि चीनमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेच्या (एलएसी) लडाख सेक्टरमध्ये सैनिकी हालचाली सुरू झाल्या. पँगाँग सरोवराच्या किनार्‍यावर भारतीय आणि चीन सैनिकांत धुमश्चक्री झाली आणि त्यामुळे परिणामी द्वीपक्षीय संबंध ताणले गेले. विशषेत: या काळात गेल्या 6 दशकांतील तणावाचा सर्वोच्च बिंदू पाहावयास मिळाला. बातम्यानुसार भारतीयांनीही लष्करी सुविधा मजबूत करणे आणि ‘पीएलए’च्या कुरापतींना चोख उत्तर देण्यासाठी अनेक प्रकारचे पावले उचलली आहेत. शिवाय पुलाची उभारणी होत असल्याचे वृत्त आले तेव्हा परराष्ट्र मंत्रालयाने चीनला इशारा देत भारत आपल्या हद्दीत कोणत्याही प्रकारच्या बेकायदा ताब्यांना मान्यता देणार नाही, असेही ठणकावले.

उपग्रहाच्या चित्राच्या आधारावर चीनने वादग्रस्त अक्साई चीन क्षेत्रात एलएसीजवळ पुलाची उभारणी केली आहे. यानुसार सैनिकांची योजना आखणे आणि रसद पुरवठा सुलभ केला आहे. अर्थात, हा भारताचाच भाग असून त्यावर 1960 पासून चीनचा बेकायदा ताबा आहे. पेंगाँग सरोवराच्या सर्वात शुष्क भागात तयार केलेला हा पूल चीनच्या सैनिकांना तातडीने हालचाली करताना लागणारा वेळ कमी करण्यात मदत करणार आहे आणि सैनिकच नाही, तर रणगाड्यांना ‘रेजांग ला’सह सरोवराच्या दक्षिण किनारपट्टीवर पोहोचण्यात मदत मिळणार आहे. तेथेच भारतीयांनी 2020 मध्ये चीनला हुसकावून लावले होते. भारतीय लष्कराने पँगाँग त्सो सरोवराच्या दक्षिण किनारपट्टीवर सामरिकद़ृष्ट्या महत्त्वाच्या अनेक ठिकाणांवर ताबा घेतला आहे. त्यामुळे नवीन पूल हा भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईला प्रत्युत्तर असल्याचे मानले जात आहे. एलएसीपासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावरील या पुलाला कथित रूपाने उत्तर किनारपट्टी आणि रुतोंगमधील पीएलएचा तळ यांच्यातील प्रवासाचा वेळ कमी करेल. शिवाय या पुलामुळे पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनारपट्टीवर असलेल्या पीएलएच्या मोल्डो गॅरिसन ठिकाणांचे स्थान आणखी बळकट करेल. यामुळे दोन्ही सेक्टरमधील प्रवासाची वेळ किमान 12 तासांनी कमी होऊन चार तासांवर येऊ शकते.

9 जुलै रोजी सकाळ, दुपार आणि सायंकाळी या वेळेला ‘ब्लॅकस्काय’ने टिपलेले चित्र पाहता चीनचा पूल सुसज्ज असल्याचे दिसते आणि चिनी वाहनांकडून त्याचा वापर केला जात असल्याचेही निदर्शनास येते. पँगाँग त्सो सरोवराच्या उत्तर आणि दक्षिण किनार्‍यावरून पुलांपर्यंत पोहोचणार्‍या रस्त्यावरून जाणार्‍या अनेक चिनी गाड्यांची ओळख पटविण्यासाठी ऑटोमेटेड व्हेईकल डिटेक्शनचा वापर केला जात आहे. किमान एका वाहनाला पुलावरून जाताना पाहिले आहे. पुलाच्या उत्तरेकडे जाणार्‍या मार्गावरही वाहन दिसले. या ठिकाणी पंप असण्याची शक्यता आहे. संघर्ष झाला, तर भारतीय तोफांद्वारे किंवा हवाई हल्ल्याद्वारे पुलाला लक्ष्य करण्यात येईल; परंतु चीनकडून त्याच्या सुरक्षेसाठी पुरेसे उपाय योजले जातील आणि हवाई संरक्षण प्रणाली तैनात केली जाईल. एका अहवालानुसार, पीएलएने पँगाँग त्सो सरोवराजवळच्या एक प्रमुख तळावर शस्त्र आणि इंधन साठ्यासाठी बंकर आणि लष्करी वाहनांच्या सुरक्षेसाठी बंकर तयार केल्याचे निदर्शनास येते. पँगाँग त्सो सरोवराच्या उत्तर किनारपट्टीवरील सिरजापमध्ये पीएलएचा तळ उभारला गेला असून त्यावर भारताने हक्क सांगितला आहे आणि हा भाग एलएसीपासून पाच किलोमीटर अंतरावर आहे. 2021-22 च्या काळात सरोवराजवळील पीएलएचा तळ हा चिनी सैनिकांच्या मुख्यालयाच्या रूपाने कार्य करत आहे; मात्र मे 2020 मध्ये एलएसीवर संघर्ष सुरू होईपर्यंत या क्षेत्रात मानवी वास्तव्य आढळून आले नव्हते. मे 2020 मध्ये पूर्व लडाखच्या एलएसीवर भारत आणि चीनमधील संघर्ष झाला. त्यात पँगाँग सरोवराच्या भागात उत्तरेतील गलवान खोर्‍यात 20 भारतीय जवान शहीद झाले आणि चीनने चार सैनिक मृत्युमुखी पडल्याचा दावा केला; मात्र तपासांती चीनचे चाळीस सैनिक मारले गेल्याचे उघड झाले. पँगाँग सरोवराच्या उत्तर किनारपट्टीवर भारत अणि चीन यांच्यात संघर्ष झाला होता. शेवटी या भागातील तणाव कमी करण्यावर दोघांनी एकमत दर्शविले आणि त्यानुसार चीनने फिंगर चार आणि फिंगर आठमध्ये तयार केलेल्या असंख्य सुविधा काढून घेतल्या. पँगाँगच्या उत्तर किनारपट्टीवरील सीमाभागाची ओळख निश्चित करण्यासाठी भौगोलिक चिन्ह म्हणून ‘फिंगर’ वापरले जात असताना तेथे चीनने पायाभूत सुविधा उभारण्याचा घाट घातला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT