वारी- एक समृद्ध जीवनमार्ग File Photo
संपादकीय

Ashadhi Wari 2025: वारी- एक समृद्ध जीवनमार्ग

पंढरपूरचा विठोबा हा महाराष्ट्राचा लोकदेव आहे.

पुढारी वृत्तसेवा

डॉ. भावार्थ देखणे- आळंदी देवस्थान विश्वस्त आणि पालखी सोहळा प्रमुख

पंढरपूरचा विठोबा हा महाराष्ट्राचा लोकदेव आहे. लक्षावधी वारकरी ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा गजर करत करत त्याला भेटण्यासाठी चालत जातात आणि इहलोकातील मुक्ती अनुभवतात.

माउली म्हणतात:

श्रीगुरु दाविलीया वाटा ।

येऊनी विवेक तीर्थतटा ।

धुवोनी मळकटा । बुद्धीचा तेणे ॥

विवेकाचा मार्ग, ज्ञानाचा मार्ग महाराष्ट्रातील सद्गुरूरूपी संतांनी संपूर्ण महाराष्ट्राला दिला. या मार्गावरून अनेकांनी जीवन समृद्ध करणारी वाटचाल केली आणि खर्‍या आत्मानुभूतीची ओळख त्यांना झाली. हा पंढरीचा मार्ग म्हणजे विश्वाला मोहरे लावत जाणारा एक अलौकिक आकृतिबंध आहे. जो आकृतिबंध सद्विचार, सदाचार आणि सद्विवेक यांनी बनलेला आहे. म्हणूनच, या मार्गावरून जर मार्गक्रमण केले, तर आयुष्यामध्ये

कुठेही गुंता येत नाही.

मार्ग दावूनी गेले आधी ।

दयानिधी संत ते ।

तेणेची पंथे चालू जाता ।

न पडे गुंता कोठे काही ॥

हा ‘तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतं गमय’ असा तमाकडून उजेडाकडे नेणारा समृद्ध मार्ग आहे. या मार्गावरून सिद्ध, तपस्वी, साधू, संत, विचारवंत, सर्वसामान्य माणूस अशा सगळ्यांनी मार्गक्रमण केलेले आहे आणि त्यांना जे साधायचे ते साध्य झालेले आहे.

पाठी महर्षी येणे आले । साधकाचे सिद्ध जाहाले ।

आत्मविद थोरावले । येणेची पंथे ।

तुका म्हणे तुम्ही चला हेची वाटे ।

भरवसेनी भेटे पांडुरंग ॥

या वाटेवर आलेले अनेक साधक सिद्ध पदाला गेले. जिज्ञासू ज्ञानी झाले, कर्ते कर्मसंन्यासी झाले. हा मार्ग स्वच्छ, शुद्ध आणि नितळ आहे. अज्ञानाकडून ज्ञानाकडे, अविवेकाकडून विवेकाकडे आणि भेदाकडून अभेदाकडे जाणारा हा मार्ग आहे. ज्ञान-कर्म आणि साधना यांचा अहंकार वाटेवरती विरून गेला; कारण पंढरीच्या वाटेवर पडलेले एक एक पाऊल हा यज्ञ आहे.

नाम घेता वाट चाली । यज्ञ पाऊला पाऊली।

जर प्रत्येक पावलागणिक यज्ञ उभा राहत असेल, तर त्यामध्ये अहंकाराच्या समिधा या निश्चितच पडतात आणि माणसाला आपण या जगामध्ये किती लहान आहोत, याची पुरेपूर जाणीव होते. एकदा एक माणूस एका साधूच्या भेटीला जातो आणि त्यांना विनंती करतो की, मला जीवनोपयोगी उपदेश करा. खूपच विनंती केल्यावर त्याला ते साधू म्हणतात की, मला तुझ्यापेक्षा लहान अशा तीन गोष्टी आणून दे; मग मी तुला उपदेश करतो. हे तर काहीच अवघड नाही, असे म्हणत तो गोष्टींच्या शोधात निघतो.

थोडे पुढे गेल्यावर त्याला शेण दिसते. शेण बघितल्या बघितल्या तो पहिली लहान गोष्ट मिळाली म्हणून खूष होतो. पण, इतक्यात त्याची नजर त्याच शेणाने सारवलेल्या जमिनीकडे जाते आणि त्याच्या लक्षात येते की, हे लहान व निरुपयोगी वाटणारे शेण तर किती उपयोगी आहे! या शेणामुळे ही ओबडधोबड जमीन किती सुशोभित झाली आहे. सर्व खड्डे शेणामुळे लिंपले गेले आहेत. ज्या शेणाने जमिनीचे न्यून झाकले आहे ते शेण काही माझ्यापेक्षा लहान होऊ शकत नाही. मग तो पुढे जातो. त्याला एक काटेरी झुडूप दिसते. त्याला आनंद होतो की, चला आपल्यापेक्षा लहान गोष्ट मिळाली.

या काटेरी झुडपाला तर फळ नाही, फूल नाही, याचा काय उपयोग असणार? पण, लगेचच त्याला दिसते की, हे काटेरी झुडूप शेतातल्या पिकाचे गुरांपासून रक्षण करीत आहे. या झुडपामुळेच हे पीक सुरक्षित आहे. त्यामुळे हे झुडूप माझ्यापेक्षा लहान होऊ शकत नाही. मग तो अजून पुढे जातो. त्याला एक कुत्रा दिसतो. तो मनात म्हणतो की, हा तर नक्कीच माझ्यापेक्षा लहान आहे. याला साधूकडे घेऊन जाऊ.

तेवढ्यात त्याच्या लक्षात येते की, हा कुत्रा तर नेहमीच आपल्या मालकाशी इमान राखून असतो. याच्याइतका प्रामाणिक कोणी नाही; मग हा माझ्यापेक्षा कसा लहान होऊ शकेल? मग तो साधूकडे परत येतो आणि त्यांना म्हणतो, मला कळले आहे की, या जगात माझ्यापेक्षा लहान, कनिष्ठ असे काहीच नाही. तेव्हा साधू हसतात आणि म्हणतात, हाच तर तुला उपदेश आहे. पंढरपूरच्या वारीत आपण हाच बोध घेतो.

एवढ्या मोठ्या जनसमुदायामध्ये आपले अस्तित्व किती क्षुल्लक आहे, हे आपल्याला इथे लक्षात येते. याच्यापेक्षा दुसरा जीवनसिद्धांत तो कोणता? पण, हा जीवनसिद्धांत समजून घेण्यासाठी आपल्याला मात्र वारकरी व्हावे लागते. देहाला उपाध्या देण्यापेक्षा त्याचे उपयोजन समजले, तर खर्‍या ‘मी’च्या शोधार्थ जाता येईल. संत एकनाथ महाराज माझ्या देहाचा उपयोग कसा व्हायला हवा, यासाठी विठ्ठलाला मागणे मागतात ः देवा माझे मन लागो तुझ्या चरणी । संसारी व्यसनी पाडो नाही ॥ नामस्मरण घडो संत समागम । वाउगाची भ्रम नको देवा ॥ पायी तीर्थयात्रा मुखी रामनाम । हाची माझा नेम सिद्धी नेई ॥ आणिक मागणे काही नाही देवा । एका जनार्दनी सेवा दृढहोई ॥ अशा प्रकारे देहाचे उपयोजन कोणी केले, तर तो आनंदाचा धनी झाल्याशिवाय राहणार नाही.

कारण, असे केल्याने आपल्या अंतरंगातील ‘मी’ म्हणजेच ‘अहंकार’ दूर होतो. न्यायमूर्ती राम केशव रानडे ‘गीतेच्या गाभार्‍यात’ या पुस्तकात सुंदर विवेचन करतात. ते म्हणतात, माणसाने ‘मी’चा शोध करावा. इंद्रियांचा प्रांत, मनाचा प्रांत, बुद्धीचा प्रांत व दिव्यशक्तीचा प्रांत, असे चार प्रांत आहेत. ‘मी’ म्हणजे इंद्रिये, हा विचार जोपर्यंत आहे तोपर्यंत शांती नाही.

कारण, इंद्रिये सैरावैरा धावतात. इंद्रियांच्या वरचा प्रांत म्हणजे मनाचा प्रांत. ‘मी’ म्हणजे मन आहे, असे जेव्हा वाटते तेव्हा देखील शांती नाही. कारण, मन चंचल आहे. मनाच्या वरचा प्रांत म्हणजे बुद्धीचा प्रांत. माझी बुद्धी म्हणजे ‘मी’ आहे, अशी आपली जेव्हा समजूत असते तेव्हा देखील आपल्याला शांती मिळत नाही.

कारण, बुद्धीला अहंकार बाधक आहे. बुद्धीच्या वरचा प्रांत म्हणजे दिव्यशक्तीचा प्रांत. ‘मी’ म्हणजे दुसरे तिसरे काही नसून ‘मी’ म्हणजे दिव्यशक्ती आहे, असे जेव्हा आपल्याला वाटते तेव्हा मात्र आपल्याला खरी शांती लाभते. कारण, ‘मी’ म्हणजे दिव्यशक्ती आहे, असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्या विचारांची न्यूनता जाते आणि आपण त्रयस्थपणे आपल्या विचारांकडे पाहू लागतो. नाथ भागवतात एकनाथ महाराज म्हणतात, जीवभावाते मीचि जीवू । शिवभावाते मीचि शिवू ॥ मी एकू ना बहु । माझा अनुभवू मीचि जाण ॥

हे सहज कोणाला साधता येते तर वारकर्‍याला. कारण, ज्याला स्वत:चा विसर पडलेला असतो आणि पांडुरंग ज्याच्या हृदयाला भिडलेला असतो, तोच खरा वारकरी. तो देहभान विसरून ऊन-पाऊस-वारा या कशाचीही तमा न बाळगता फक्त पांडुरंग हेच साध्य मानतो. त्याचे आयुष्य हे विठ्ठलमय झालेले असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT