श्री. गहिनीनाथ महाराज औसेकर- सहअध्यक्ष, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर
भागवत धर्माची भगवी पताका शेकडो वर्षे खांद्यावर घेऊन लक्षावधी वैष्णवांचा मेळा आषाढी वारीसाठी भूलोकीचे वैकुंठ असलेल्या पंढरीला येतो आहे. अनेक शतके उभ्या असलेल्या या मंदिराची काळाच्या ओघात स्वाभाविकच पडझड झाली होती. पण, या मंदिराच्या बळकटीकरणाचे, दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आणि ते पुरे झाल्यावर त्याचे मूळ सौंदर्य समोर आले. मंदिर नव्या झळाळीने उजळून निघाले.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व परिवार देवतांची मंदिरे खूप प्राचीन स्वरूपाची आहेत. मंदिरांचे सुशोभीकरण केल्यास त्याची प्राचीन शैली जपण्यास मदत होईल, या विचाराने मंदिराचे काम हाती घेण्यात आले. ही सर्व मंदिरे पुरातन असल्याने त्यांची दुरवस्था झाली होती व त्यांची पडझड होत असल्याने मंदिरांचे बळकटीकरण करणे अत्यंत निकडीचे होते.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर हे खूप जुने, ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि वास्तुशास्त्रानुसार महत्त्व असणारे मंदिर आहे. मात्र, यामध्ये काळाच्या ओघात नैसर्गिक आणि मानवनिर्मित कारणांमुळे बरेच बदल झाले. त्यामुळे अनेक ठिकाणी मंदिराच्या बांधकामाची दुरुस्ती करण्याची गरज निर्माण झाली. त्यासाठी 20 वर्षांपूर्वी मंदिराचा विकास आराखडा तयार करण्यात आला होता.
पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मंदिराच्या सर्वांगीण विकासकामाचा सर्वंकष आराखडा (डीपीआर) पुरातत्व विभागाच्या यादीतील योग्य वास्तुविशारदाकडून तयार करण्यात आला. यासाठी शासनाने पुरेसा निधीही उपलब्ध करून दिला. आराखडा तयार करताना खूप काळजी घ्यावी लागली. कारण, हे ऐतिहासिक मंदिर पुरातत्वीय दृष्ट्या खूपच मोलाचे असल्याने पुरातत्व खात्याचा सल्ला वेळोवेळी घ्यावा लागला.
ऐतिहासिक आणि पुरातत्वीय दृष्ट्या महत्त्वाच्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा असेल, तर त्याबाबतच्या अनेक कायद्यांचे पालन करावे लागते. त्या तरतुदीही आम्ही काटेकोररीत्या तपासल्या आणि त्या पाळूनच हे काम करण्यात आले. पंढरपूरच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचा आराखडा तयार केला तेव्हा त्यानुसार त्यासाठी अंदाजे 73 लाख 85 हजार रुपये लागणार होते. शासनाने ते उपलब्ध करून दिले.
पंढरपूरच्या मंदिराच्या या कामाची सुरुवात तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कार्तिकी एकादशीच्या मुहूर्तावर म्हणजे गुरुवार, दिनांक 23 नोव्हेंबर 2023 ला पहाटे साडेतीन वाजता श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात झाली. त्यानंतर सुरुवात झाली ती अवघड, कौशल्यपूर्ण कामाला. या आराखड्यात अनेक कामे करण्यात आली. त्यात श्रींचा गाभारा, सोळखांबी सभामंडप, बाजीराव पडसाळी, गजेंद्र मंडप, श्री महालक्ष्मी मंदिर, श्री व्यंकटेश मंदिर, मंदिराच्या दगडाची शास्त्रीय पद्धतीने स्वच्छता, दगडाचा तुटलेला भाग दुरुस्त करणे, सांध्यातील खराब चुनकाम काढणे, दगडांमधील दर्जे, सांधे चुनकामात सांधणे, अनियोजित व हानिकारक जोडण्या काढणे, विसंगत बांधकामाचे स्वरूप बदलून मूळ रूपात आणणे, हवा खेळती राहण्याची यंत्रणा आदी ठिकाणांच्या कामांचा समावेश होता.
या आराखड्यामध्ये श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आणि परिवार देवतांच्या मंदिरांच्या मूळ ढाच्यास धक्का न लावता संवर्धन करायचे होते. ते भान काम करताना पाळण्यात आले....आणि अखेरीस पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या बळकटीकरणाचे काम पूर्ण झाले. ही सर्व कामे नियोजनपूर्वक आणि पुरातत्व खात्याच्या नियमांनुसार करण्यात आली.
त्यामुळे मूळ वास्तुशैली आणि बांधकामाला अजिबात धक्का लावण्यात आलेला नाही. त्याचप्रमाणे भाविकांसाठी शाश्वत आणि मूल्यवर्धित आधुनिक सुविधा, सोयीसुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या पूर्ण झालेल्या कामाची पाहणी देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच केली आहे आणि या कामाबाबत समाधान व्यक्त केले. या मंदिरास मूळ रूपात आणण्याचे भाग्य आम्हा मंदिर समितीस लाभले आहे. मंदिर समितीच्या इतिहासात इतका भरीव निधी पहिल्यांदाच शासनाने उपलब्ध करून दिला आहे.