आर्थिक विकास, शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, आरोग्य आणि कला व साहित्य यांपैकी कोणत्याही क्षेत्रात पाकिस्तान हा भारताशी बरोबरी करू शकत नाही. आज भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने वाटचाल करतोय आणि क्रीडा क्षेत्रातही अगदी थेट ऑलिम्पिकपर्यंत भारताने वाढत्या यशाची कमान कायम ठेवली आहे. भारतीय संघाने महत्त्वाच्या स्पर्धेत अनेकवेळा पाकिस्तान संघाला चारीमुंड्या चीत केले आहे. त्याची प्रचिती आशिया चषक स्पर्धेत आली आहे. अलीकडच्या काळात भारतीय क्रिकेट संघाच्या यशाची कमान वाढताना दिसत असताना आता तरुण तडफदार खेळाडूंनी कमाल करून दाखवली. रविवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानवरील वर्चस्व कायम ठेवत भारतीय क्रिकेट संघाने आशिया चषक ट्वेंटी-ट्वेंटी स्पर्धेत सलग दुसर्या विजयाची नोंद केली.
कुलदीप यादव याच्यासह सर्वच फिरकी गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी मार्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवच्या अप्रतिम फलंदाजीच्या जोरावर भारताने हा सामना 7 गडी आणि 25 चेंडू राखून जिंकला. पाकिस्तानचा भारताने धुव्वा उडवला. वास्तविक पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारताने यशस्वीपणे राबवलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांतील संबंध पूर्णतः बिघडलेले आहेत. ही सर्व पार्श्वभूमी असल्यामुळे भारताने दुबईतील पाकिस्तानसोबत सामना खेळू नये, अशी मागणी देशातील बहुतांश विरोधी पक्षांकडून केली होती. पण केंद्र सरकारने आधीच परवानगी दिल्यामुळे आशिया चषकातील साखळी सामना ठरल्याप्रमाणे पार पडला.
एकीकडे रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही, असे म्हणायचे आणि मग सामना ठेवायचा, हे कसे चालेल? पाकिस्तानसोबत अवघ्या दोन महिन्यांत क्रिकेट कसे खेळू शकता, असा प्रश्न शिवसेना उबाठा या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला होता. काही लोकांनी भारताचा जगप्रसिद्ध भालाफेकपटू नीरज चोप्राला ‘देशद्रोही’ ठरवले होते. त्याच प्रकारे तुम्ही आयसीसीचे अध्यक्ष जय शहा यांनाही देशद्रोही म्हणणार का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला होता.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे पुत्र जय शहा यांच्या दबावामुळेच हा सामना खेळला गेला असल्याचा आरोप केला जात आहे. वास्तविक या आरोपात कोणतेही तथ्य नाही. तरीही रविवारी उबाठाकडून ‘माझं कुंकू माझा देश’ हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला मनसे आणि काँग्रेसचीही साथ लाभली. केंद्र सरकारला ‘ऑपरेशन सिंदूर’ची आठवण करून देण्यासाठी कुंकवाची डबीही पाठवली. ठिकठिकाणी पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या आणि पाकिस्तानसोबत कदापि क्रिकेट खेळता कामा नये, असे सांगण्यात आले.
दिल्लीत आम आदमी पक्षानेही पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्याच्या विरोधात निषेध व्यक्त केला. भारत व पाकिस्तान दोन्ही देशांतील संबंध सुधारेपर्यंत उभयतांमध्ये क्रिकेट खेळणे मान्य नसल्याचे मत माजी फिरकीपटू हरभजन सिंग यानेही व्यक्त केले. दोन महिन्यांपूर्वी दिग्गज क्रिकेटपटूंच्या झालेल्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानविरोधात खेळण्यास नकार देत, जेतेपदावर पाणी सोडले होते. तेव्हाही हरभजनने मत परखडपणे मांडले होते. भारतीय संघाचा माजी कर्णधार सुनील गावसकर यांनीही अशाच स्वरूपाचे मत व्यक्त केले. पाकविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घालण्याचे आवाहन समाजमाध्यमांवरूनही केले जात होते.
अर्थात सामन्याला विरोध करणारे हे सर्व राजकारण करत होते, असे म्हणता येणार नाही. प्रत्येकाला विशिष्ट मत असण्याचा व ते मांडण्याचा अधिकार लोकशाहीने दिला आहे. केंद्र सरकारने नुकताच आगामी ऑलिम्पिक स्पर्धांचे यजमानपद मिळवण्यासाठी पाकविरुद्ध फक्त बहुराष्ट्रीय स्पर्धेत खेळण्यास बीसीसीआयला हिरवा कंदील दाखवला. त्यामुळे पाकिस्तानविरुद्ध फक्त द्विपक्षीय मालिकेत खेळायचे नाही ही भारताची भूमिका आहे. केवळ भारत आणि पाकिस्तान यांच्यात थेट सामने खेळण्यास भारताने अलीकडील काळात नकारच दिला आहे. शिवाय बलाढ्य भारताच्या तुलनेत पाकचे खेळाडू नवखे आहेत. पाकच्या कर्णधाराचे नावही फारसे कोणाला माहीत नाही. भारताचे क्रिकेटमधील स्थान खूप वरचे आहे. तर पकिस्तानच्या क्रिकेटची सातत्याने घसरगुंडी सुरू आहे. गेल्या दोन दशकांत भारताने पाकचा सतत पराभवच केला आहे. यापैकी बरेच विजय हे भारताने एकतर्फी नोंदवले आहेत. भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचाही पराभव केला आहे; तर त्याचवेळी पाकिस्तानी संघ अफगाणिस्तानकडूनही पराभूत होतो.
आशियाई चषकाच्या पहिल्याच सामन्यात भारताने यूएईला सहज नमवले. तर पाकला ओमानवर विजय मिळवण्यासाठीही बरीच झटापट करावी लागली. भारतीय संघात शुभमन गिल, सूर्यकुमार, अभिषेक शर्मा हे फलंदाज; तर कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्तीसारखे फिरकी गोलंदाज आहेत. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याचा तर दबदबा आहे. अशा या परिस्थितीत पाकिस्तानचे खेळपट्टीवर कंबरडे मोडून भारताने एक प्रकारे पहलगामचाच बदला घेतलाय. भारत-पाकिस्तान लढतीवरील बहिष्कारामागील भावनेची सर्वांना जाणीव आहे. पण त्याचवेळी भारतीय क्रिकेट बोर्डाच्या आणि सरकारच्या आदेशांची अंमलबजावणी करणे भाग आहे, असे भारतीय क्रिकेट संघाच्या क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक रायन दौएत्शे यांनी सांगितले.
पहलगाममध्ये मृत्यू पावलेल्या काहीजणांच्या कुटुंबीयांनीही सामन्यास विरोध केला होता आणि या भावनांचा केंद्र सरकारही आदरच करते. शिवाय पाकिस्तानशी क्रिकेट खेळणे म्हणजे ‘ऑपरेशन सिंदूर’ स्थगित करणे नव्हे. पाकिस्तानने यापुढे दहशतवादी कृत्ये केल्यास त्यांना यापूर्वीपेक्षाही अधिक भयंकर धडा शिकवू, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. पाकिस्तानबाबत भारताच्या कठोर पवित्र्यात कुठेही सौम्यता आलेली नाही. मार्च 1997 मध्ये जगमोहन दालमिया यांची आयसीसीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आणि त्यायोगे प्रथमच एका भारतीय व्यक्तीस या शिखर संघटनेचे अध्यक्षपद भूषवण्याचा मान प्राप्त झाला. 28 ऑगस्ट 2024 रोजी जय शहा यांची आयसीसीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. ज्या प्रतिष्ठित संस्थेचे नेतृत्व एक भारतीय व्यक्ती करतोय, त्या संस्थेचे नियम पाळणे, हे कर्तव्यच आहे. हे कर्तव्यपालन करताना पाकिस्तानबाबतच्या आक्रमक धोरणास अजिबात मुरड घातलेली नाही.