ओडिशा राज्यात नुकताच एक भन्नाट किस्सा घडला आहे. एका सराईत चोराला पोलिसांनी अटक केली. त्याने असंख्य चोर्या केल्या होत्या आणि पोलीस त्याच्यावर लक्ष ठेवूनच होते. पोलिसांच्या सापळ्यात तो अलगद अडकला आणि जेलमध्ये जाऊन बसला. ही बातमी काही विशेष नाही. चोर चोर्या करतच असतात. पोलीस त्यांना पकडतच असतात. हा व्यवहार नित्यनेमाने सुरू असतो. यात खरा ट्विस्ट पुढे असा आला की, हा चोर, ज्याचे नाव मनोज कुमार असे आहे, तो स्वतःचे एक यूट्यूब चॅनेल चालवत होता. हे चॅनेलही बर्यापैकी पॉप्युलर आहे. या चॅनेलवरून तो लोकांना गुन्हे करू नका, शांततेत जगा, गुन्हा म्हणजे शिक्षेला आमंत्रण होय, अशा प्रकारचे सल्ले देत असे. याचा अर्थ तो लोकांना जगण्याची प्रेरणा देत होता. यालाच ‘मोटिव्हेशनल स्पीकर’ असे म्हणतात. हा दिवसा मोटिव्हेशनल यूट्यूब चॅनल चालवायचा आणि रात्रीच्या वेळी प्रोफेशनल पद्धतीने चोर्या करायचा. थोडक्यात, म्हणजे सांगायची थेअरी एक आणि प्रॅक्टिकल दुसरेच असा काहीसा याचा प्रकार होता.
या चोराला यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातूनही पैसे मिळायचे आणि चोरीच्या माध्यमातूनही पैसे मिळायचे. पोलिसांना नेमका अंदाज लावता आला नाही की, याला जास्त कमाई यूट्यूब वरून होते की चोरीमधून होते. अशी आगळीवेगळी चोरी झाल्यानंतर हा चोर ओडिशामध्ये बर्यापैकी पॉप्युलर झाला. त्याचे नाव गाजायला लागले आणि त्याचे यूट्यूब चॅनेल पाहणार्यांची संख्याही वाढली. त्याच्या चॅनेलचे नावही उल्लेखनीय आहे. त्याच्या चॅनेलचे नाव आहे, ‘जीवन बदलून टाका’. कुणाचे जीवन त्याची यूट्यूबवरील भाषणे ऐकून बदलले असेल की नाही, हे माहीत नाही; परंतु त्याच्या स्वतःच्या जीवनामध्ये तो रोज बदल करत असे. दिवसा लोकांना प्रेरणा द्यायची आणि रात्री चोर्या करायच्या असा फॉर्म्युला वापरत असल्यामुळे सकाळ-संध्याकाळ त्याच्या जीवनात बदल होत असे.
सदरील चोराला चोरीचा भरपूर मोठा अनुभव असून तो गेल्या 10 वर्षांपासून हे प्रकार करत आहे. सोशल मीडिया प्रचलित झाल्यापासून असे अनेक लोक आहेत जे शांततावादी, पुरोगामी अशी भूमिका वॉलवर मांडत असतात आणि त्याचवेळी त्यांचे प्रत्यक्ष वागणे काही वेगळेच असते. सोशल मीडिया हे आभासी जग असते. इथे तुम्हाला जसे पाहायला मिळते, तसे प्रत्यक्षात असेलच याची काही खात्री नाही. याचे प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे, हा मनोज कुमार नावाचा चोर होय! तरुणांना व्यसनांपासून दूर राहा, असे आवाहन करणारे अनेक वक्ते स्वतः बरेचदा व्यसनाच्या आहारी गेलेले असतात. खूप सभ्य, संयमी आणि शांत भासणारे सोशल मीडियावरील व्यक्तिमत्त्व प्रत्यक्षात अत्यंत आक्रमक आणि आक्रस्ताळे असू शकते. कोणाही व्यक्तीच्या सोशल मीडियावरील दिसणार्या गुणांवर विश्वास ठेवण्याची अजिबात सोय राहिलेली नाही.