हे सुरांनो एक व्हा! (Pudhari File Photo)
संपादकीय

Music Harmony | हे सुरांनो एक व्हा!

विविध प्रकारच्या वाद्यांचा आणि गायकांच्या सुरांचा मेळ बसला की, संगीत कानाला ऐकायला सुरेल वाटते.

पुढारी वृत्तसेवा

विविध प्रकारच्या वाद्यांचा आणि गायकांच्या सुरांचा मेळ बसला की, संगीत कानाला ऐकायला सुरेल वाटते. राजकारणामध्येही अनेक प्रकारचे सूर असतात. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जवळ आल्यानंतर वेगवेगळे सूर उमटायला सुरुवात झाली आहे. पुढील काळामध्ये जनतेला कोणता आर्केस्ट्रा पाहायला मिळेल की गोंधळ पाहायला मिळेल, हे फक्त परमेश्वरच जाणे. युती आणि आघाडीचा काळ असताना बेसुरांची मैफील नेहमी होत असते. राज्यातील महत्त्वाच्या पक्षांनी स्थानिक पातळीवर युती किंवा आघाडीचे अधिकार जिल्हा पातळीवरील नेत्यांना दिले आहेत. मैत्रीपूर्ण लढती होतील, तर करा; परंतु एकमेकांचा द्वेष करू नका, असेही सांगितले गेले. हे काही आम्हास समजलेले नाही. सरकारमध्ये एकत्र असलेल्या दोन पक्षांचे उमेदवार एकमेकांविरुद्ध उभे राहिले, तर ते एकमेकांविरुद्ध बोलल्याशिवाय राहतील का? प्रेमात, युद्धात आणि निवडणुकीत सर्व काही क्षम्य असते. प्रत्येक उमेदवार निवडणूक अटीतटीनेच लढवल्याशिवाय तो निवडून येऊ शकत नाही. अशावेळी विरोधी पक्षाला नामोहरम केल्याशिवाय आपली बाजू उजवी दिसत नसते, ही प्रत्येकाची अडचण आहे.

आपण गेल्या पाच वर्षांत काय केले किंवा पुढील पाच वर्षांत आपण काय करणार आहोत, याची आश्वासने देत निवडणूक लढवता येईल; परंतु प्रतिपक्षापेक्षा आपण सरस आहोत, हे सिद्ध होणार नाही. विरोधी उमेदवारांनी केलेला भ्रष्टाचार, त्यांचा नाकर्तेपणा, त्यांच्या पक्षाची धरसोडीची भूमिका, कुठल्याही तत्त्वाचे राजकारण नसणे या गोष्टींवर टीका केल्याशिवाय निवडणूक होत नसते. यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत परस्परविरोधी सूर निघतच असतात.

युती किंवा आघाडीचे दोन प्रकार आहेत. एक निवडणूक पूर्व आणि एक निवडणूक झाल्यानंतर. निवडणूकपूर्व युती ही जनतेला आवाहन करण्यासाठी असते. निवडणुका झाल्यानंतर युती किंवा आघाडी ही सर्व काही गुंडाळून वाटेल तशी जमवलेली असते. निवडणूक पश्चात युती किंवा आघाडी ही असंख्य तडजोडी करून केवळ सत्ता मिळवण्यासाठी केलेली असते. मतदान संपल्यामुळे जनतेच्या हातामध्ये हात चोळत बसण्याशिवाय काहीही नसते.

अशावेळी जनता हताश होऊन ज्यांना आपण निवडून दिले आहे, ते अवघ्या 15 दिवसांत कसे बदलले आणि एकमेकांच्या विरुद्ध लढलेले पक्ष कसे एकत्र आले, याची मात्र गंमत पाहत असते. टीका करा; पण सांभाळून करा, असा सल्ला राज्यपातळीवरील नेते स्थानिक कार्यकर्त्यांना देत आहेत. या देशात आज कुणी कुणाचे ऐकत नाही. लेक बापाचे ऐकत नाही की सून सासूचे ऐकत नाही. अशावेळी राज्य पातळीवरील नेतृत्वाचे कार्यकर्ते कितपत ऐकतील, याविषयी कोणाच्याही मनात शंका नाही. काय असेल ते असो; परंतु हे सुरांनो एक व्हा आणि जनतेचा विकास साधा, एवढेच आवाहन आम्ही करू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT