युवराज इंगवले
प्रतिभेच्या जोरावर अनेक भारतीयांनी जगभरात आपली छाप सोडली आहे. त्यामध्ये दिवसेंदिवस भरच पडत असताना दिसत आहे. अशातच आणखी एका भारतीय वंशाच्या महिलेने अमेरिकेत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. अमेरिकेच्या ओहायो राज्याच्या सॉलिसिटर जनरलपदी भारतीय वंशाच्या प्रतिभावान वकील मथुरा श्रीधरन यांची नियुक्ती झाली आहे; मात्र या उच्च पदावरील नियुक्तीनंतर त्यांना सोशल मीडियावर तीव— वंशद्वेषी आणि अपमानकारक टीकेला सामोरे जावे लागले, हे विशेष! अनेकांनी त्यांच्या भारतीय असण्यावरून आणि त्यांनी लावलेल्या ‘बिंदी’वरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या टीकेनंतर ओहायोचे अॅटर्नी जनरल डेव्ह योस्ट हे श्रीधरन यांच्या समर्थनासाठी पुढे आले आणि त्यांनी टीकाकारांना सडेतोड उत्तर देत निवडीचे ठामपणे समर्थन केले आहे.
ओहायोचे अॅटर्नी जनरल डेव्ह योस्ट यांनी ‘एक्स’वर मथुरा श्रीधरन यांची राज्याच्या 12व्या सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्तीची घोषणा केली. पोस्टमध्ये योस्ट यांनी श्रीधरन यांच्या बुद्धिमत्तेचे कौतुक केले. ते म्हणतात की, मथुरा अत्यंत हुशार आहेत. त्यांनी गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद जिंकला होता. त्यांनी ज्या दोन सॉलिसिटर जनरल (फ्लॉवर्स आणि गेसर) यांच्या हाताखाली काम केले, त्या दोघांनीही त्यांच्या नावाची शिफारस केली होती. तिला बढती देताना मला खूप आनंद होत आहे. ती ओहायो राज्याची उत्तम सेवा करेल; मात्र या घोषणेनंतर काही लोकांनी श्रीधरन यांच्यावर वंशद्वेषी टीका करण्यास सुरुवात केली. एका यूझरने लिहिले की, एवढ्या महत्त्वाच्या पदासाठी तुम्ही अशा व्यक्तीची निवड का केली, जी अमेरिकन नाही? तर, दुसर्या एका यूझरने त्यांच्या टिकलीकडे लक्ष वेधत म्हटले, ‘बरं, तो ठिपका (बिंदी) लहान आहे, तरीही दिसतोच.’ मथुरा श्रीधरन या एक अत्यंत प्रतिष्ठित आणि अनुभवी वकील आहेत.
त्यांनी प्रतिष्ठित मॅसॅच्युसेटस् इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून (एमआयटी) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स आणि अर्थशास्त्र या विषयात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर 2018 मध्ये त्यांनी न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ लॉमधून कायद्याची पदवी घेतली. त्यांनी ओहायो अॅटर्नी जनरल कार्यालयातील ‘टेंथ कमांडमेंट सेंटर’च्या संचालक म्हणूनही काम पाहिले आहे. या पदावर असताना त्यांनी राज्याच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी अनेक खटले दाखल केले. मथुरा यांना प्रवास करायला आणि जेवण बनवायला खूप आवडते. त्या त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर जेवणाच्या रेसिपी शेअर करत असतात.
मथुरा एक प्रशिक्षित शास्त्रीय गायिकासुद्धा आहे. 2010 मध्ये चेन्नई येथे झालेल्या संगीत महोत्सवासह अनेक ठिकाणी परफॉर्म केले आहे. त्यांनी 2015 मध्ये अॅड. अश्विन सुरेश यांच्याशी लग्न केले. मथुरा यांची नियुक्ती ही त्यांच्या पात्रतेची आणि बुद्धिमत्तेची पोहोचपावती असली, तरी या घटनेने अमेरिकेसारख्या प्रगत देशातही वंश आणि दिसण्यावरून होणारा भेदभाव किती खोलवर रुजलेला आहे, हे पुन्हा समोर आणले आहे.