नगरपंचायत निवडणुकीत भाजप आणि शिंदे या दोन सत्ताधारी पक्षांतच जुंपली आहे. या दोन पक्षांत खरी लढत होताना दिसत आहे. विरोधी पक्षाचा मागमूस कुठे दिसत नाही. निवडणूक जिंकण्यासाठीचे राजकारण, प्रचार, यामुळे या दोन्ही पक्षांत अंतर वाढताना दिसत आहे.
शशिकांत सावंत
राज्यातील नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने कोकणात नवी राजकीय समीकरणे उदयाला येत आहेत. याचे कारण आहे, कोकणात ज्या 26 नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत, त्या सर्व नगरपालिकांमध्ये विरोधी पक्षाचा मागमूस कुठे नसल्याने सत्तारूढ पक्षांमध्ये लढाई रंगली आहे आणि हे पक्ष आहेत, शिवसेना आणि भाजप.
कोकणात पालघरमध्ये 4, ठाण्यामध्ये 2, रायगडमध्ये 10, रत्नागिरी 6 आणि सिंधुदुर्ग 4, अशा एकूण 26 नगरपालिकांच्या निवडणुका आहेत. खरे तर कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे; पण या कोकणात आता भाजपनेही आपले प्रभावी नेटवर्क तयार केले आहे. एकूण कोकणातील 75 आमदारांपैकी भाजपचे 16 आमदार आहेत आणि दोन खासदार आहेत; तर शिवसेनेचे 17 आमदार आणि दोन खासदार आहेत. त्यामुळे या दोन पक्षांमध्येच निवडणूक कुस्ती रंगणे स्वाभाविक ठरले; पण ही कुस्ती रंगताना दोन्ही पक्षांनी नवे भिडू सोबत घेतले आहेत.
कोकणातील रत्नागिरी वगळता कुठल्याच जिल्ह्यामध्ये महायुती झाली नाही. रत्नागिरी, सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी निवडणुकीपूर्वी दोन्ही जिल्ह्यांत युती व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. परंतु, सिंधुदुर्गच्या चारी नगरपालिकांमध्ये शिवसेना-भाजप आमने-सामने आले आहेत.
भाजपसोबत रायगडमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी सहभागी झाली आहे; तर सिंधुदुर्गात कणकवलीसारख्या शहरात ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना एकत्र आहेत. या नव्या पॅटर्नला उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची मूकसंमती मिळाली असावी, असा राजकीय जाणकारांचा होरा आहे. त्यामुळे हे राजकीय समीकरण नव्याने तयार होऊ पाहत आहे. दुसर्या बाजूला भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस हे समीकरण जन्म घेऊ लागले आहे. ही नवी राजकीय समीकरणे एका बाजूला तयार होत असताना, सत्तारूढ दोन पक्षांमधील राजकीय लढायांमुळे नात्यांमध्येही दुरावा येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्गात नितेश विरुद्ध नीलेश या दोन राणे बंधूंमध्ये निर्माण झालेले विसंवाद आणि दुसर्या बाजूला प्रचाराच्या रणधुमाळीत भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये निर्माण झालेली दरी, नात्यांमध्ये दुरावा वाढवणारी आहे. विशेष म्हणजे, नीलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पण त्यांना अटक मात्र करण्यात आलेली नाही. ते स्वतःही हा प्रश्न उपस्थित करत?आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचार सभांनी आरोप-प्रत्यारोपांचे रण अधिक तीव्र झाले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात रविवारी दक्षिण कोकणात सहा सभा घेतल्या आणि या सभांमध्येही मालवणचे आमदार नीलेश राणे यांनी केलेले ‘स्टिंग ऑपरेशन’ आणि त्यांच्यावर दाखल झालेला गुन्हा यावर बोलताना, ‘डरेगा नहीं शिवसेना का वाघ, तुमच्या मागे आहे एकनाथ,’ असे सांगत शिवसैनिकांमध्ये नवी जान आणण्याचा प्रयत्न केला; तर भाजपसाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जवळपास 10 ते 11 सभा घेत ‘एकच नंबर असतो तो म्हणजे नंबर एक. दोनला नसते किंमत,’ असे सांगत भाजपच्या बाजूने रण तापवले. त्यामुळे या दोन पक्षांमधील दरी प्रचाराच्या निमित्ताने अधिक दुरावल्याचे चित्र आहे. या सार्या प्रचारात ताणलेली युती आणि फाटलेली नाती, याचीच प्रचिती आली आहे.