खुर्चीवर मीच पाहिजे..! Pudhari Photo
संपादकीय

Maharashtra Municipal Elections | खुर्चीवर मीच पाहिजे..!

साफ चूक आहे. तुझी विचार करण्याची पद्धत चुकीची आहे, हे प्रथम समजून घे. अरे भावा, राज्यातील 247 नगर परिषदांच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे.

पुढारी वृत्तसेवा

मित्रा, मला एक सांग, राज्यातील विशेषत: नागरी भागातील जनता सध्या कशाची चर्चा करत असेल? नुकत्याच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची चर्चा करत असेल की, ट्रम्प महोदय रोज करत असलेल्या भारतावरील अन्यायाची चर्चा करत असेल?

साफ चूक आहे. तुझी विचार करण्याची पद्धत चुकीची आहे, हे प्रथम समजून घे. अरे भावा, राज्यातील 247 नगर परिषदांच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे आज सर्वत्र तीच चर्चा गावागावांत आहे. गावाचे नगराध्यक्षपद कोणत्या प्रवर्गाला सुटले आणि त्या प्रवर्गातील कोणती व्यक्ती नगराध्यक्षपदावर बसू शकते, याचीच चर्चा सुरू असणार आहे. गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले अनेक लोक या सोडतीनंतर नाराज झाले आहेत, तर बरेच लोक खूश झाले आहेत.

नाराजीचे काय कारण असू शकते? शेवटी लोकशाही प्रक्रिया आहे. त्यामुळे आरक्षण सोडतीत कोणाला ना कोणाला तरी काहीतरी मिळणारच आहे. त्यात नाराज होण्यासारखे काय आहे?

हे बघ, अरे सोपे आहे. एखाद्या खुल्या वर्गातील व्यक्तीने गेल्या पाच वर्षांपासून नगराध्यक्ष होण्याची तयारी केलेली असते. या सोडतीमध्ये समजा त्याला कळाले की, नगराध्यक्षपद महिलेला गेले आहे, तर त्याने काय करावे? त्याने केलेली सगळी तयारी तर वाया गेलीच की नाही. राजकारणी लोकांकडे सगळ्या प्रश्नांची अनेक उत्तरे असतात. समजा एखादे नगराध्यक्षपद महिलेकडे गेले, तर राजकारणी पती अवघ्या आठ दिवसांत आपल्या पत्नीला तयार करून त्या पदासाठी उभा करतो. राजकीय सभा, मेळावे काहीही न पाहिलेली आणि आपण बरे की, आपले घर बरे यात खूश असलेली गृहिणी अचानक राजकारणामध्ये येते आणि चक्क स्टार पण होऊ शकते. आपण नाही नगराध्यक्ष होऊ शकलो, तर हरकत नाही; परंतु आपल्या पत्नीला नगराध्यक्ष करून तिच्या पदराआडून सगळा कारभार पाहण्याची महत्त्वाकांक्षा भारतीय पतीमध्ये नसती तरच नवल होते.

माझे आणखी एक निरीक्षण सांगतो मित्रा! सगळ्या राजकीय पक्षांमध्ये पळापळ सुरू आहे. माजी नगरसेवकांना त्यांनी काही काम न केल्यामुळे निवडून येण्याची खात्री नाही. अशावेळी आपल्याला जास्तीत जास्त पाठिंबा देऊन निवडून आणू शकणार असा पक्ष कोणता, याचा शोध घेतला जात आहे. घाऊक पद्धतीने पक्षांतराचे दिवस आले आहेत.

ते जाऊ दे; पण एखाद्या व्यक्तीला किमान एक टर्म तरी नगराध्यक्ष होण्याची इच्छा का असते, हे अजून मला तरी समजले नाही. अरे, ते पण खूप सोपे आहे. एकदा का तुमच्या नावाआधी नगराध्यक्षपद लागले की, ते आयुष्यभर कामाला येते. आता तुला समजले का नगराध्यक्ष पदाचे महत्त्व? नसेल समजले, तर येत्या काळातील राजकारण नीट पाहा, म्हणजे तुझे मनोरंजनही होईल आणि खुर्चीवर मीच पाहिजे, हा आग्रह कशासाठी आहे, याचे ज्ञान होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT