युवराज इंगवले
भ्रष्टाचार ही आता सार्वत्रिक समस्या बनली आहे. किती नियम आणि कायदे केले, तरी सर्व काही धाब्यावरून बसवून भ्रष्टाचार करून मोठ्या प्रमाणात माया गोळा करण्याचा जणू ट्रेंडच बनला आहे. त्याला कोणताही देश अपवाद ठरलेला नाही. कैक वर्षांपासून भ्रष्टाचाराचा हा भस्मासूर रुढार्थाने जणू माणसाच्या डोक्यावर बसला आहे. अगदी तळागाळापासून ते उच्चपदस्थांपर्यंत हे सर्व काही बिनदिक्कत सुरू आहे. आता दक्षिण कोरियाचे तुरुंगात असलेले माजी राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांच्या अडचणींत आणखी वाढ झाली आहे. शेअर बाजारातील फेरफार आणि लाचखोरीच्या गंभीर आरोपांखाली त्यांच्या पत्नी आणि माजी फर्स्ट लेडी किम केओनही यांना अटक झाली. यामुळे दक्षिण कोरियाच्या इतिहासात प्रथमच असे घडले आहे की, देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि त्यांची पत्नी दोघेही तुरुंगात आहेत. सोल सेंट्रल डिस्ट्रिक्ट कोर्टाने 52 वर्षीय किम यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले. सरकारी वकिलांनी किम यांच्या बेकायदेशीर कृत्यांचा तपशील देणारा 848 पानांचा अहवाल न्यायालयासमोर सादर केला होता. पुराव्यांशी छेडछाड केली जाण्याची शक्यता लक्षात घेता न्यायालयाने हे वॉरंट जारी केले. त्यानंतर काही तासांतच त्यांना अटक झाली.
किम केओन यांच्यावर अनेक दिवसांपासून विविध आरोप होत होते, ज्यामुळे त्या सतत वादाच्या भोवर्यात होत्या. भांडवली बाजार आणि वित्तीय गुंतवणूक कायद्यांचे उल्लंघन, राजकीय निधी कायद्यांचे उल्लंघन, शेअर बाजारात फेरफार असे त्यांच्यावर आरोप आहेत. राष्ट्राध्यक्ष असताना यून सुक येओल यांनी विरोधी पक्षांनी किम यांच्यावरील आरोपांच्या चौकशीसाठी आणलेली तीन विशेष तपास विधेयके व्हेटो वापरून फेटाळून लावली होती. नोव्हेंबरच्या अखेरीस शेवटचा व्हेटो वापरल्यानंतर अवघ्या एका आठवड्यातच यून यांनी देशात मार्शल लॉ लागू केला होता. याचमुळे एप्रिलमध्ये त्यांच्यावर महाभियोग चालवून त्यांना पदावरून हटवले. दि. 10 जुलै रोजी त्यांना अटक झाली आणि तेव्हापासून ते तुरुंगात आहेत. या राजकीय अस्थिरतेमुळे देशात जूनमध्ये मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागल्या.
तुरुंगाच्या नियमांनुसार किम केओन यांना आता त्यांचे नेहमीचे कपडे सोडून खाकी रंगाचा कैद्यांचा गणवेश घालावा लागेल. त्यांना एक कैदी क्रमांक दिला जाईल आणि त्यांचा हातात पाटी धरून कैद्यांप्रमाणे फोटो काढला जाईल. सध्या दक्षिण कोरियामध्ये उष्णतेची लाट असताना किम यांना 107 चौरस फुटांच्या कोठडीत ठेवले आहे. तेथे पंखा आहे; पण एसी नाही. त्यांना नाश्त्यामध्ये ब्रेड, जॅम आणि सॉसेज दिले आहेत. त्यांच्या कोठडीत जेवण आणि वाचनासाठी एक लहान टेबल आणि शौचालय आहे; पण झोपण्यासाठी बेड नाही. विशेष म्हणजे, नियमानुसार पती-पत्नीला एकाच तुरुंगात ठेवले जाते; परंतु सरकारी वकिलांनी किम यांना त्यांचे पती असलेल्या तुरुंगापासून सुमारे 20 किलोमीटर दूर असलेल्या वेगळ्या तुरुंगात ठेवण्याची विनंती केली. या घटनेमुळे दक्षिण कोरियाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. पती देशद्रोहाच्या आरोपाखाली आणि पत्नी भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्ये असलेली ही एक दुर्मीळ घटना मानावी लागेल.