केशवराव भोसले नाट्यगृह  Pudhari File Photo
संपादकीय

नाटकवाल्यांचं माहेरघर

पुढारी वृत्तसेवा
अभिराम भडकमकर, ज्येष्ठ नाटककार

नाटक प्रवाही ठेवण्याचं आणि नवनवीन रंगकर्मींना व्यासपीठ देण्याचं काम केशवराव भोसले नाट्यगृह आजवर करत राहिलं आहे आणि तसंच पुढल्या कित्येक पिढ्यांसाठी करत राहील, यासाठी आपण कंबर कसली पाहिजे. ‘संगीतसूर्य’ या संकटांच्या ढगांनी झाकून गेला असेल; पण तो मावळणार नाही याची खबरदारी आपण घेतली पाहिजे, कारण आपण सगळेच या संगीतसूर्याचीच किरणं आहोत.

केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये काहीही पाहायला जाणं हा लहानपणी एक अतिशय आनंदाचा भाग होता. तो मखमली पडदा बाजूला गेल्यानंतर तिथं एक वेगळंच विश्व उभा राहायचं. बालनाट्यं पाहिली, कुणाकुणाची गॅदरिंग पाहिली. हा पडदा बाजूला झाला की, एका वेगळ्याच दुनियेत आपण जातो, अशी भावना मनामध्ये निर्माण झालेली होती. काही वर्षांनी मुख्याध्यापक संघाच्या आंतरशालेय एकांकिका स्पर्धांच्या निमित्तानं पहिल्यांदा पु. ल. देशपांडे यांच्या ‘पुढारी पाहिजे’ या नाटकात मी केशवराव भोसले नाट्यगृहाच्या स्टेजवर पाऊल टाकलं. आजही मला आठवतं, माझी कवीची भूमिका होती. मी प्रवेश केला आणि मला जाणवलं, मी एका वेगळ्याच जगात आलो आहे. समोरचे ते लाईटस्, स्पॉटलाईटस्, अंधारातून चमकणारे प्रेक्षकांचे डोळे... असं वाटलं, आयुष्यभर हेच करायला मिळालं तर किती छान होईल! याच क्षेत्रात पाऊल टाकण्याचा विचार किंवा बीज पहिल्यांदा तिथंच रुजलं असावं. आजही आठवतं, भूमिका संपल्यानंतर एक्झिट करताना विंगेच्या बाहेर यावंसंच वाटत नव्हतं. नाटक आणि नाटकाची जादू म्हणजे काय, याचा पहिला अनुभव दिला तो केशवराव भोसले नाट्यगृहानं. जसजसा मोठा व्हायला लागलो, तसतसं कळायला लागलं की, हे साधंसुधं नाट्यगृह नाही, तर याला विलक्षण मोठा इतिहास आहे.

समाज हा चहुअंगांनी विकसित झाला पाहिजे आणि म्हणून कला आणि क्रीडा यांचीही जोपासना व्हायला हवी, या विचारांनी कोल्हापूरचे द्रष्टे राजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी कुस्त्यांचं मैदान आणि नाट्यगृह दोन्ही बांधलं. या नाट्यगृहाच्या निर्मितीमागे इतका मोठा विचार आहे, हे नंतर कळलं. आणि तेव्हाच या नाट्यगृहाला ज्या माणसाचं नाव दिलं आहे, तो माणूस म्हणजे नाट्य क्षेत्रामधला एक अत्यंत ताकदीचा अभिनेता आणि गायक हे नंतर कळलं. त्यानंतर राज्य नाट्य स्पर्धा पाहण्याच्या निमित्तानं कितीतरी नाटकं इथं पाहिली. शाहीर दादा कोंडके यांचं ‘विच्छा माझी पुरी करा’ पाहिल्याचं मला आठवतंय. ज्येष्ठ अभिनेते शरद तळवलकर यांना ‘घरोघरी हीच बोंब’मध्ये पाहिल्याचंही मला स्पष्ट आठवतंय. काशीनाथ घाणेकर यांना लाल्याच्या भूमिकेमध्ये पाहिलं, ते अगदी कालपरवाच पाहिल्यासारखं मला नेहमी वाटत राहतं. ‘सखाराम बाईंडर’च्या प्रयोगाला वयानं लहान म्हणून आत सोडलं नव्हतं, तेही मला आठवतं. गुरुवारी संध्याकाळी या सार्‍या आठवणी दाटून आल्या. समोरचं ते अग्निज्वाळांचं तांडव पाहून असहायतेनं, दुःखानं डोळ्यांतून घळाघळा पाणी येऊ लागलं. घरातलं एखादं वडीलधारं माणूस गेलं अशी एक पोकळी मनात निर्माण झाली.

मीच नव्हे, तर कोल्हापूरच्या रंगकर्मींच्या कित्येक पिढ्यांनी आपलं पहिलं पाऊल याच नाट्यगृहामध्ये ठेवलं. हे नाटकवाल्यांचं माहेरघर होतं, अड्डा होता. तालमीचं ठिकाण होतं. जमून गप्पा, धमाल करायचं ठिकाण होतं. एखाद्या ज्येष्ठ माणसासारखा कुणीतरी या वास्तूच्या रूपानं आपल्या पाठीशी उभा आहे, अशी भावना या नाट्यगृहामुळं मनात असायची. कालांतरानं ‘बालगंधर्व’ चित्रपटाचा मुहूर्त इथं झाला. बालगंधर्व, केशवराव आणि कोल्हापूर हे सगळं कसं परस्परांशी एका भावनिक नात्यानं जोडलं गेलं होतं. ‘बालगंधर्व’ चित्रपटात केशवराव भोसले यांची ‘संगीत संयुक्त मानापमान’च्या संदर्भातली जी भूमिका आहे, त्या निमित्तानं पुन्हा एकदा केशवराव भोसले नावाच्या या प्रचंड व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करता आला. स्वतःच्या कंपनीचा प्रवास पूर्ण आगगाडी आरक्षित करून करणारे केशवराव! जगाच्या पाठीवर असं उदाहरण असेल का? अवघ्या तीन-साडेतीन दशकांचं आयुष्य लाभलेल्या या माणसानं आधी स्त्री भूमिका साकारल्या आणि त्यानंतर आवाज फुटल्यानंतर पुरुष भूमिकांमध्येसुद्धा स्वतःचा विलक्षण ठसा उमटवला. त्यांच्या दमदार आवाजानं मराठी नाट्यसंगीताचं दालन समृद्ध झालं. स्वतःचा प्रचंड मोठा असा चाहता वर्ग त्यांनी निर्माण केला. अत्यंत शिस्तशीर आणि व्यावसायिक बंधन पाळणारी नाट्य संस्थाही त्यांनी चालवली. मराठी नाट्यसंगीताचं, कोल्हापूरचं नाव मोठं केलं. अशा या महान कलावंताचं नाव या नाट्यगृहाला दिल्यामुळं या नाट्यगृहाची उंची वाढली.

मला आठवतं की, महाविद्यालयात असताना याच नाट्यगृहाच्या मेकअप रूमच्या बाहेर उभा राहून नाटकासाठी येणार्‍या-जाणार्‍या कलावंतांना बघणं हा आमचा एक छंद होता. आपल्याला याच क्षेत्रात जायचं आहे, ही भावना मनामध्ये इथंच निर्माण व्हायची. आणि एक ना एक दिवस माझंही नाटक इथं सादर होईल, असं स्वप्न फुलायला लागायचं. मला आठवतं, माझं पहिलं नाटक ‘हसत खेळत’, ज्यामध्ये अशोकमामा म्हणजेच अशोक सराफ काम करत होते, त्याचा प्रयोग कोल्हापूरला होता. प्रवासात थोडा उशीर झाला असला तरी गाडी वेळेच्या आधी पोहोचली; पण खूपच कमी वेळ मध्ये होता. मला आठवतं की, आमचा सेट काढण्यासाठी आणि सामान आत नेण्यासाठी उपस्थित रसिकांपैकी काही जणांनी मदत केली होती. नाटक पाहणारे काय किंवा नाटक करणारे काय, सगळेच रंगभूमीचे पुजारी. त्यामुळं वेळ झाला असला तरी काही वेळातच सेट उभा राहिला आणि नाटक सुरू झालं. नाटक संपल्यानंतर आम्ही सगळे रसिकांसमोर उभा राहिलो. लेखक म्हणून ती माझी पहिलीच ओळख. आणि ‘हा लेखक तुमच्या कोल्हापूरचा आहे,’ असं सुधीर भट यांनी लोकांना सांगितलं. मला आजही आठवतं, माझा मित्र लियाकत बारगीर मला नकळत नाटक पाहायला आला होता. गॅलरीतून अत्यंत प्रेमानं आणि आनंदानं आपल्या मित्राचं कौतुक तो पाहत होता. त्यानं वरून हात केला आणि मी स्टेजवरून! ही आठवण मी कधीच विसरू शकत नाही.

दुसरी आठवण तर अत्यंत विदारक आहे. मागच्या वर्षी याच वेळी याच दिवशी आम्ही ‘संगीत संयुक्त मानापमान’ नावाचं ‘संयुक्त मानापमान’ला शंभर वर्षं झाली, त्या घटनेला अभिवादन करणारं एक नाटक नव्यानं लिहिलं होतं. त्याचा प्रयोग आम्ही केशवराव भोसले यांना मानवंदना देण्यासाठी याच सभागृहात केला होता. कालच्याच दिवशी! तुडुंब प्रतिसाद लाभला. जुनी गाणी ऐकताना रसिक बेहद खूश झाले. तरुण पिढीलासुद्धा संगीतसूर्य केशवराव भोसले यांची महती त्या नाटकातून कळून येत होती. जुन्या जाणत्यांना तर ते सारं माहीत होतं आणि म्हणूनच प्रयोग विलक्षण रंगला. प्रयोग संपल्यानंतर झालेला टाळ्यांचा कडकडाट खरोखरच ‘छप्पर फाड’ असा होता. आणि नेमक्या गुरुवारच्या दिवशी त्याच वेळी या रंगमंदिराच्या छतापर्यंत आग जातानाचे अनेक व्हिडीओ समोर येत होते आणि काळजाचं पाणी पाणी होत होतं. या नाटकात ‘संगीतसूर्य केशवराव भोसले यांची तान ही ज्वाळेसारखी लखलखीत होती,’ असं म्हटलं होतं, तेच नाट्यगृह ज्वालांनी वेढलं होतं. हे आमच्यासाठी फक्त नाट्यगृह नव्हतं, तर रंगमंदिर होतं. अहो, आम्ही घडलो इथंच. केवळ मराठीच नव्हे, तर भारतीय रंगभूमीचा हा ऐतिहासिक ठेवा होता. ही आपली संस्कृतिक संपत्ती होती आणि तिचं जतन आपल्याला करता आलं नाही. आणि नेमकी दुसर्‍याच दिवशी केशवराव भोसले यांची जयंती होती. हा नियतीचा खेळ म्हणायचा की काय? असंख्य आठवणी दाटून येत आहेत. नाटकंच काय, पण कित्येक व्याख्यानं इथं ऐकलीत. बा. भ. बोरकरांनी दिलेलं व्याख्यान आणि गायिलेली कविता मला आठवते. शाळेच्या गॅदरिंगला निळूभाऊ आम्हाला इथंच पुरस्कार देऊन गेले. आमचं मन संवेदनशील आणि वैचारिक बैठक पक्की करण्याचं काम या वास्तूंनी केलं. आज त्या ठिकाणी उभा आहेत, त्या काळपटलेल्या भिंती आणि इथं कधीतरी एक नाट्यगृह होतं, हे सांगणार्‍या काही खुणा दिसत आहेत. केशवराव भोसले यांच्या आयुष्यामध्ये असेच चढ-उतार आले होते. साधं सोपं, सरळ आणि सुंदर आयुष्य त्यांना कधी लाभलंच नाही. आणि त्यांच्या नाट्यगृहाचीही अशी अवस्था व्हावी? पण, केशवराव न कधी नियतीला शरण गेले, ना कुठल्या संकटांना. आता ते आपल्याला करायचं आहे. पुन्हा एकदा दिमाखात ही वास्तू उभा राहिली पाहिजे. आणि त्यासाठी सर्व कलावंतांनी आणि प्रेक्षकांनी मराठी नाटकावर, नाट्यसंगीतावर, कलेवर प्रेम करणार्‍या सर्वांनीच आता एकत्र आलं पाहिजे आणि ठरवलं पाहिजे की, पुन्हा एकदा दिमाखात ही वास्तू उभा राहील.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT