मूळचे शिकारी असलेले जिम कॉर्बेट यांना जंगलातील नैसर्गिक वाघ-सिंहांची संख्या कमी होत आहे, हे लक्षात आल्यावर, त्यांनी बंदुकीऐवजी कॅमेरा वापरून वाघ-सिंह आणि अन्य वन्यजीव टिपले. त्यांच्या दूरद़ृष्टीमुळेच भारतात वन्यजीवांना भयमुक्त वातावरणात राहता यावे म्हणून अभयारण्ये घोषित केली. टप्प्याटप्प्याने पावले टाकल्यामुळे भारतात अभयारण्यांचा विकास झाला; पण त्याचवेळी काही ठिकाणी जंगलांमध्येही मानवी अतिक्रमणे झाली, हस्तक्षेप वाढला, विकासाच्या नावाखाली जंगलांची कत्तल झाली; पण सर्वच गोष्टी प्रतिकूल आहेत, असे नाही. या विध्वंसापासून योग्य तो धडा घेतला जात असल्याचे आशादायक चित्र किमान पर्यावरण रक्षणाबाबतीत तरी आहे, असे म्हणता येण्यासारखी स्थिती वन्यजीवरक्षणाबाबत दिसते.
भारतातील आशियाई सिंहांची संख्या गेल्या पाच वर्षांत 674 वरून 891 वर पोहोचली आहे. म्हणजेच पाच वर्षांत 32.2 टक्के वाढ झाल्याचे 16 व्या सिंहगणनेतून स्पष्ट झाले. सिंहांचे निवास क्षेत्रही लक्षणीय प्रमाणात वाढले. पहिल्यांदाच 22 सिंह ‘लायन कॉरिडोर’ भागात दिसून आले. याचा अर्थ कॉरिडोर निर्माण केल्याचा नक्कीच फायदा झाला. गुजरातच्या बारडा अभयारण्यात, तसेच जेतपूर, बाबरा-जसदान आणि अन्य परिसरात 497 सिंह आढळले. त्यांच्या पुनरुत्पादनाच्या द़ृष्टीने चांगली गोष्ट म्हणजे, त्यांच्या उत्पादक क्षमतेत वाढ झाली. प्रौढ माद्यांची संख्या 27 टक्क्यांनी वाढून, ती 260 वरून 330 पर्यंत पोहोचली. सर्वाधिक सिंहसंख्या अमरेली जिल्ह्यात असून, तेथे 82 प्रौढ नर, 117 प्रौढ माद्या आणि 79 छावे आहेत.
मितियाळा अभयारण्य व आसपासच्या क्षेत्रात सिंहांच्या संख्येत 100 टक्के वाढ झाली. धक्कादायक बाब म्हणजे, जे गिरनारचे अभयारण्य जगात प्रसिद्ध आहे, तेथील सिंहांच्या संख्येत मात्र 4 टक्के घट झाली. तसेच भावनगर किनारा क्षेत्रातही 12 टक्के घट दिसून येते. सिंहांचा अधिवास आणि संख्या जेथे वाढली तेथेच याचे प्रमाण कमी झाले, त्यावरून कोणत्या उपाययोजना कराव्यात, याचा निर्णय आता घेता येऊ शकेल. एकेकाळी तुर्कस्तानपासून भारतापर्यंत सिंहांचे साम्राज्य होते; पण आता ते फक्त गुजरातच्या सौराष्ट्र भागापुरते मर्यादित राहिले असले, तर ती चिंतेचीच बाब मानली पाहिजे. 10 ऑगस्ट हा ‘विश्व सिंह दिन’ म्हणून साजरा केला जातो. संपूर्ण जगात केवळ 15 हजारांच्या आसपास सिंह अस्तित्वात असून, भारतात गुजरात सोडून इतरत्र कुठेही सिंहांचा वावर नाही, ही भारतासाठी काळजीचीच बाब.
गुजरातमधील गीर राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्र 258 चौ. किलोमीटर असून, त्या सभोवतीच्या 1,400 चौ. किलोमीटर परिसरात सिंह वावरताना बघायला मिळतात. पूर्वीच्या काळात मध्य प्रदेश व राजस्थानातही सिंह होते; पण 1870 च्या आसपास राजस्थान आणि 1880 च्या आसपास मध्य प्रदेशमधून ते नामशेष झाले. 20 व्या शतकाच्या आरंभी तत्कालीन नवाब मुहम्मद रसूलखांजी बीबी यांना जुनागड जिल्ह्यात फक्त डझनभर सिंह शिल्लक राहिल्याचे लक्षात आले. त्यांनी गीरच्या जंगलास संरक्षित क्षेत्र घोषित केले. स्वातंत्र्योत्तर काळात, खासकरून गेल्या तीन दशकांत गुजरात सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे 2015 साली तेथील सिंहांची संख्या सुमारे सव्वापाचशे झाली आणि आता तर ती लक्षणीय वाढली. गीर उद्यानाच्या बाहेर सिंहांचा वावर वाढला. ते समुद्रकिनार्यालगत उत्तरेकडे पसरू लागले.
अर्थात, काहीवेळा सिंहांचे कळप हमरस्त्यावरूनही भटकताना दिसल्याची छायाचित्रे आणि चलचित्रे समोर आली आहेत. गुजरात वन विभागाने त्यांच्या संरक्षणासाठी स्थानिक लोकांना ‘वनमित्र’ म्हणून नियुक्त केले. कधी कधी सिंहांनी कोणाची गुरे मारली, तर त्यांच्यावर जमाव हल्ला करण्याची शक्यता असते. अशावेळी वन कर्मचार्यांच्या मदतीने सिंहांवर कोणी हल्ला करू नये, याची काळजी घेतली जाते. अशा उपायांमुळेच समुद्रकिनार्यालगतही सिंहांची संख्या वाढली. गीर राष्ट्रीय उद्यानातील पावणेतीनशे सिंह तर उद्यानाच्या बाहेर आढळून येतात. गुजरातचा सिंह आता पोरबंदरपर्यंतही पोहोचलाय. मात्र, 2018 साली एका विषाणुजन्य आजाराने तेथे 22 सिंह मृत पावले.
2016-17 मध्ये गुजरातेत सुमारे 184 सिंहांचा मृत्यू झाला आणि त्यातील 32 मृत्यू अनैसर्गिक होते. विषाणुजन्य आजार हे त्याचे कारण असल्याचा संशय आल्यावर, यापैकी काही सिंह मध्य प्रदेशातील शिवपूर व मोरैना जिल्ह्यातील कुनो राष्ट्रीय उद्यानात पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी 24 गावांतील 1,600 कुटुंबांचे इतरत्र पुनर्वसन केले गेले. कुनो अभयारण्याचा विस्तार करून, त्याभोवती विशाल बफर क्षेत्र घोषित केले गेले. सैबेरिया या थंड प्रदेशात मूळ स्थान असलेला वाघ 12 हजार वर्षांपूर्वी भारतात आला आणि क्रमाक्रमाने सरकत दक्षिणेच्या टोकापर्यंत गेला. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी वाघांसाठी ‘प्रोजेक्ट टायगर’ सुरू केला. वाघांनी हल्ले करून तेथील सिंहांची संख्या कमी केली.
अनेक वर्षे केवळ व्याघ्र संवर्धनावरच लक्ष्य केंद्रित केले गेले. एकेकाळी सिंह सर्व भारतभर आढळत होता. देशात सर्वत्र त्याच्यासाठी पोषक वातावरण आहे. योग्य प्रयत्न केल्यास, त्याचे अस्तित्व देशभर पुन्हा दिसू लागेल, असे मत दिवंगत वनसंशोधक मारुती चितमपल्ली यांनी व्यक्त केले होते. ‘ग्लोबल बायो डायव्हर्सिटी इंडेक्स’नुसार, ब्राझील हा पहिल्या क्रमांकावर असून, भारताचा क्रमांक आठवा लागतो. भारतात अंदाजे पक्ष्यांच्या 1,212 प्रजाती, उभयचर प्राण्यांच्या 446, माशांच्या 2,601, सस्तन प्राण्यांच्या 440 आणि वनस्पती प्रजाती 45 हजारांपेक्षा जास्त आहेत. या वनस्पती आणि प्राण्यांपासून मानवाला अन्न, निवारा, औषध आणि ऊर्जा मिळते. संपूर्ण पृथ्वीवरील जीवन व मानवाचे जीवन प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या जैवविविधतेवर अवलंबून आहे. जैवविविधतेच्या द़ृष्टीने वन्यप्राण्यांचे महत्त्वही विलक्षण आहे. जसजसे विषुववृत्तापासून दूर जाऊ, तसतशी जैवविविधता कमी कमी होत जाते. आफ्रिकेचा मध्यभाग, अॅमेझॉनचे खोरे, इंडोनेशिया व भारतात जैवविविधता मोठी आहे. ती जपण्याच्या द़ृष्टीने वनांमधील प्राण्यांचे आणि वाघ-सिंहांचेही सातत्यपूर्ण जतन-संवर्धन गरजेचे आहे.