युवराज इंगवले
जपान हा आशियातील छोटा देश; पण त्याने केलेले प्रगती ही जगाला थक्क करायला लावणारी आहे. आता हा देश वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. जपानमध्ये तरुणांची संख्या कमी तर 100 अथवा त्याहून अधिक वयाच्या लोकांची संख्या विक्रमी वाढली आहे हे विशेष! ती आता सुमारे एक लाख झाली असल्याची घोषणा जपान सरकारने केली. हा आकडा जपानच्या वाढत्या आयुर्मानाचे आणि त्याच वेळी देशासमोरील लोकसंख्याशास्त्रीय आव्हानांचे प्रतीक बनला आहे. जपानमध्ये सलग 55 व्या वर्षी नवीन विक्रम प्रस्थापित झाला. सप्टेंबरपर्यंत देशातील शतायुषी नागरिकांची संख्या 99,763 वर पोहोचली आहे. या एकूण संख्येत महिलांचे प्रमाण सुमारे 88 टक्के इतके प्रचंड आहे. जपानमध्ये नागरिकांचे सरासरी आयुर्मान जगात सर्वाधिक आहे आणि अनेकदा जगातील सर्वात वयस्कर व्यक्ती जपानचीच असल्याचे दिसून येते. मात्र, काही अभ्यासांनुसार जगभरातील शतायुषींच्या अचूक संख्येबद्दल मतभेद आहेत. जपान हा जगातील सर्वात वेगाने वृद्ध होणार्या देशांपैकी एक आहे. तेथील लोकांचा आहार अधिक आरोग्यदायी असला तरी देशाचा जन्म दर खूप कमी आहे, ज्यामुळे तरुण लोकसंख्येचे प्रमाण घटत आहे. सध्या जपानमधील सर्वात वयस्कर व्यक्ती नारा शहराच्या उपनगरातील यामातोकोरयामा येथील 114 वर्षीय शिगेको कागावा या महिला आहेत; तर सर्वात वयस्कर पुरुष इवाता या किनारी शहरातील 111 वर्षीय कियोताका मिझुनो हे आहेत.
आरोग्यमंत्री ताकामारो फुकोका यांनी 87,784 महिला आणि 11,979 पुरुष शतायुषी नागरिकांचे त्यांच्या दीर्घायुष्याबद्दल अभिनंदन केले. तसेच समाजाच्या विकासासाठी त्यांनी अनेक वर्षे दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ही आकडेवारी 15 सप्टेंबर रोजी जपानच्या ‘ज्येष्ठ नागरिक दिना’च्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध झाली. हा एक राष्ट्रीय सण असून, या दिवशी नवीन शतायुषी नागरिकांना पंतप्रधानांकडून अभिनंदन पत्र आणि चांदीचा कप देऊन सन्मानित केले जाते.
यावर्षी 52,310 व्यक्ती या सन्मानासाठी पात्र ठरल्या आहेत. 1960 च्या दशकात जी-7 देशांमध्ये जपानमध्ये 100 वर्षांवरील लोकांचे प्रमाण सर्वात कमी होते. मात्र त्यानंतरच्या दशकांमध्ये यात लक्षणीय बदल झाला आहे. वाढत्या आयुर्मानाचे श्रेय हृदयविकार आणि स्तनाचा व प्रोस्टेटचा कर्करोग यांसारख्या सामान्य कर्करोगांमुळे होणार्या मृत्यूंच्या घटलेल्या प्रमाणाला दिले जाते. तेथील लोकांच्या आहारात मांसाचे सेवन कमी आणि मासे व भाज्यांचा जास्त समावेश असतो. विशेषतः महिलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे जपानमधील महिलांचे आयुर्मान पुरुषांपेक्षा जास्त असल्याचे दिसून येते. तेथे सार्वजनिक आरोग्य संदेशाद्वारे लोकांना मीठ कमी खाण्यासाठी यशस्वीपणे प्रवृत्त केले. पण हे केवळ आहारापुरते मर्यादित नाही. जपानमधील लोक वृद्धापकाळातही सक्रिय राहतात.