अनिल पाटील, अर्थतज्ज्ञ
भारतीय अर्थव्यवस्थेने जागतिक स्तरावर एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. देशाची अर्थव्यवस्था तब्बल 4.19 ट्रिलियन डॉलरच्या (सुमारे 348 लाख कोटी रुपये) विक्रमी पातळीवर पोहोचली असून, 145 कोटी लोकसंख्येच्या या देशात प्रत्येक नागरिकाच्या सरासरी उत्पन्नातही लक्षणीय वाढ झाली आहे. एकीकडे दरडोई उत्पन्न गेल्या दहा वर्षांत दुप्पट झाले असताना दुसरीकडे महागाईचा दर 2.10 टक्के या दशकातील नीचांकी पातळीवर आल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अमेरिकेचा डाऊजोन्स 17 जुलै 2024 रोजी 41198 अंकावर होता, तो आज 42573 अंकावर पोहोचला आहे. वार्षिक परतावा 8 टक्के दिला आहे. हाच इंडेक्स 1990 मध्ये 2625 अंकावर होता. 1990 पासून सरासरी परतावा 8 टक्के मिळाला आहे.
चायना शांघाय शेअर मार्केट इंडेक्स 2024 मध्ये 2977 अंकावर होता. तो 3516 वर पोहोचला आहे. हाच इंडेक्स 2007 मध्ये 5954 उच्चांकी अंकावर गेला होता. ऑगस्ट 2009 मध्ये 3534 अंकावर होता. तो आज 3516 अंकावर आहे. मागील 16 वर्षांत काहीही परतावा दिला नाही. 2007 पासून उणे परतावा दिला आहे. युकेमधील लंडन स्टॉक मार्केटमधील एफटीएसई इंडेक्स जुलै 2007 मध्ये 6300 वरून जुलै 2024 मध्ये 8373 वर होता. आज तो 8972 अंकावर पोहोचला आहे. 2007 पासून फक्त 2500 अंकांची वाढ झालेली पाहावयास मिळते. याचा अर्थ अवघा 2 टक्के परतावा मिळाला आहे.
जपानमधील निक्केई स्टॉक इंडेक्स जुलै 24 मध्ये 40017 अंकावर होता. आज तो 39901 अंकावर पोहोचला आहे. हाच इंडेक्स जानेवारी 1989 मध्ये 38271 या उच्चांकी अंकावर होता. 1990 पासून उणे परतावा दिलेला आहे. जर्मनीमधील डीई 40 हा इंडेक्स जुलै 2000 मध्ये 7220 अंकावर होता. तो जुलै 2024 मध्ये 18518 अंकावरून आज 24370 या अंकावर पोहोचला आहे. या देशातील बाजाराने 5 टक्के परतावा दिला आहे. भारतीय बाजाराचा इतिहास पाहिला असता 1990 मध्ये 100 अंकांनी सुरू झालेला सेन्सेक्स जुलै 2000 मध्ये 3321 अंकावर होता. तो 2020 मध्ये 41306 उच्चांकावर पोहोचला. मागील सप्टेंबर 2024 मध्ये 86578 उच्चांकी अंकावरून एप्रिल 2025 मध्ये 71425 या नीचांकावर आला होता. 45 वर्षांत 15 टक्के दराने परतावा दिला आहे. चालू वर्षीच्या 2025 च्या जून तिमाहीत निफ्टी 50 मध्ये समाविष्ट कंपन्यांच्या कमाई आणि नफा वृद्धीत कमकुवत वाढ दिसून येत आहे. काही घटकांच्या मागणीतील घट आणि काही विशिष्ट क्षेत्रातील अडथळ्यांमुळे या तिमाहीत नफावाढीचा दर फक्त 4.6 टक्के, तर उत्पन्न वाढ 4.5 टक्के इतकीच झाली आहे. हे वाढीचे दर गेल्या नऊ तिमाहीतील सर्वात कमी दिसत आहेत.
ऑटोमोबाईल क्षेत्रात मागणी कमी झालेली दिसून येत आहे. जागतिक स्तरावर अनिश्चिततेचे वातावरण असल्याने आयटी सेक्टरमध्ये मंदीचे सावट आहे. मागील महिन्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने व्याजदर कमी केल्यामुळे डेट मार्केटमध्ये थोडीशी अनिश्चितता दिसून येत आहे. कमी झालेल्या व्याजामुळे बँकांतील गुंतवणूकदारांना व्याजाचे नुकसान होणार आहे. व्याज दर कमी झाल्याने बँकांच्या नफ्यावर परिणाम दिसू शकतो; मात्र कर्जाचे व्याजदर कमी झाल्याने घर बांधणी, रिअल इस्टेटसारख्या क्षेत्रांमध्ये मागणी वाढू शकते. बाजारावर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे महागाई. आपल्या देशातील (सीपीआय) 2.82 टक्के नोंदविला आहे. आजपर्यंतच्या इतिहासात खालच्या स्तरावर म्हणजे नियंत्रणामध्ये आहे. कमी झालेली महागाई बाजाराला पोषक ठरते.
आज अमेरिकेची 34 कोटी एकूण लोकसंख्या आहे. जीडीपी 30 ट्रिलियन आहे. देशातील लोकांचे दरडोई उत्पन्न 89105 डॉलर आहे आणि देशावर 37 ट्रिलियन डॉलर इतकी एकूण कर्जे आहेत. प्रतिव्यक्ती मागे 108000 डॉलर इतके कर्ज आहे. वाढत्या कर्जाची आणि वाढलेल्या व्याजदराची चिंता ही या देशाला मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. यामुळे अर्थव्यवस्था वाढीत अडथळा निर्माण होत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत उणे वृद्धी दिसत आहे. जगातील सर्वात मोठ्या श्रीमंत देशाची ही अवस्था आहे. या देशांत व्याजदर, महागाई वाढत आहे आणि वृद्धीदर कमी होत आहे. ट्रम्प सरकार आल्यानंतर अमेरिका फर्स्ट हे उद्दिष्ट ठेवून इतर देशांतील आयात केलेल्या वस्तूंवर मोठ्या प्रमाणात कर आकारणी लादत आहे. सध्या महागाई कमी आहे; परंतु व्याजदर वाढलेले आहेत. त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे. इतर देशातून येणार्या वस्तूंवर कर लावला असता परत महागाई वाढणार आहे. त्यामुळे या भीतीने व्याजाचे दर कमी होण्याची शक्यता दिसत नाही. टॅरिफमुळे महागाई वाढेल तसेच व्याजदर चढे राहतील आणि याचा परिणाम म्हणजेच मंदी येण्याची शक्यता दाट आहे.
चीनची अर्थव्यवस्था पाहिली असता ती 19 ट्रिलियन आहे. चीनमध्ये एकूण कर्ज हे जीडीपीच्या 300 टक्के आहे. चीनमधील दरडोई उत्पन्न 13,683 इतके आहे. 140 कोटी लोकसंख्या असलेल्या चीनची अर्थव्यवस्था अवघ्या 4.5 टक्के दराने वाढत आहे. वाढत्या कर्जाची चिंता आणि अमेरिका लादत असलेले नवीन करव्यवस्था यामुळे चिनी अर्थव्यवस्थेमध्ये अडथळा निर्माण होत आहे. आज जर्मनीमध्ये 8.4 कोटी लोकसंख्या असून 4.19 ट्रिलियन डॉलर इतकी अर्थव्यवस्था आहे. जर्मनीचा ग्रोथ रेट 1 टक्के आहे; मात्र अर्थव्यवस्थेमधील दरडोई उत्पन्न हे 55911 इतके आहे. आपण जर्मनीला मागे टाकून चौथ्या क्रमांकावर आलो, तरी जर्मनी हा आपल्यापेक्षा कितीतरी पटीने श्रीमंत आहे. हे दरडोई उत्पन्नावरून दिसून येते.
आपल्या देशांमध्ये 145 कोटी लोकसंख्या असून अर्थव्यवस्था 4.19 ट्रिलियन डॉलरवर पोहोचली आहे आणि देशातील दरडोई उत्पन्न हे 2014 मध्ये 1487 डॉलर्स होते. ते आता दुप्पट 2878 डॉलर्स इतके झाले आहे. देशातील गरिबी कमी होत आहे. मागील दहा वर्षांत 25 कोटी लोक दारिद्य्ररेषेतून मध्यम वर्गात आले आहेत. सध्या आपल्या देशाची महागाई 2.10 टक्के इतकी आहे. मागील दहा वर्षांतील सर्वात नीचांकी दर गाठला आहे. त्यामुळे अजून व्याजाचे दर कमी होऊ शकतात. गृह कर्ज व्याज दर कमी झाले की, गृहनिर्माण क्षेत्रात मोठी मागणी वाढू शकते. येणार्या तीन वर्षांत घरासाठी लागणार्या सर्व प्रकारच्या साहित्यनिर्मिती मोठ्या प्रमाणात वाढू शकतात. उत्पादन क्षेत्र मोठ्या जोमाने वाढत आहे. मोबाईल उत्पादनात जगात दुसरा क्रमांक आहे. स्टील उत्पादनात जगात तिसरा क्रमांक आहे. सर्वच क्षेत्रांत उत्पादनात भारताचा चौथा क्रमांक येतो. आपल्या देशांमधील लोकसंख्या ही जागतिक द़ृष्ट्या महत्त्वाची बाजारपेठ आहे.