भारतीय बँकांचे (म्हणजे पर्यायाने आपलेच) कोट्यवधी रुपयांचे हे लोक परदेशात जाऊन बसले आहेत. काहीजण तर मुद्दाम इंग्लंड निवडतात. कारण, तिथले वकील चांगले. कायद्याच्या पळवाटांमधून सुटण्याचे मार्ग तेथील वकिलांना चांगलेच ठाऊक आहेत. त्यामुळे इंग्लंड हे अशा लोकांसाठी स्वर्गभूमीच बनली आहे. एकेकाळी ब्रिटिशांनी भारतावर 150 वर्षे राज्य केले होते. आताही त्यांच्यात पदरी येथील भ्रष्टाचारी जात?आहेत. किती ही गुलामी, असेही म्हणता येऊ शकते. हे झालं भ्रष्टाचारी श्रीमंतांचे; पण केवळ तेवढेच लोक परदेशगमन करत नाहीत. झालंच तर विविध गुन्ह्यांत अडकलेले गुंडदेखील परदेशी पळतात. दुबई, सिंगापूर ही त्यांची सेफ ठिकाणे. असे काही प्रकार करणार्या लोकांनी बहुधा गळ्यापर्यंत आल्यानंतर नेमके कोणत्या देशात पळून जायचे, हे ठरवलेलेच असते असे वाटते. ज्या देशात आपल्या देशाचे कायदे पोहोचू शकणार नाहीत, तिकडं जाण्याचा ओघ कधी आटेल तेव्हा परिस्थिती सुधारली, असे म्हणता येईल.
घोटाळे करायचे आणि देश सोडून पळून जायचे, ही पद्धत रूढ झाली आहे. काही महाभाग तर आधीच दुसर्या देशाचे नागरिकत्व घेऊन ठेवतात. म्हणजे वेळ प्रसंग आला, तर ऐनवेळी अडचण नको. नागरिकत्व असलेल्या देशात जायचे. इथल्या बँकांना किंवा लोकांना बुडवून थेट दुसर्या देशांमध्ये वास्तव्य करत परदेश फ्लाय करणार्या लोकांची संख्या वाढत जाईल तसतशी आपली चिंताही वाढत जाणार आहे.
एकंदरीत लोकांनी अवैध मार्गाने पैसा कमावला की, परदेशगमनाचे सुचते आणि ते फरार होतात. आपल्यासारख्या सामान्य लोकांना परदेश म्हणजे नेपाळ, भूतान जाण्यासाठी चार-पाच वर्षे तरी बचत करून ते शक्य होईल का नाही, हे पाहावे लागते. परदेशगमनाचा छंद भारतीय लोकांमध्ये वाढत चालला आहे, हे मात्र निश्चित! आपल्यासारख्या सामान्य लोकांना एका गावावरून दुसर्या गावाला जायचे तरीपण तयारी करावी लागते. या कर्जबुडव्या उद्योगपतींना आणि गुंडांना सर्व प्रकारची तयारी ठेवावी लागत असेल.
कोणी एक केबीसी नावाची पतसंस्था काढलेला व्यक्ती असंख्य लोकांना, कोट्यवधी रुपयांना बुडवून रातोरात फरार झाला. तो नंतर दुसर्या कुठल्यातरी देशामध्ये आठ दिवसांनंतर स्विमिंग पूलमध्ये पोहोताना दिसला. आताही एका जमीन घोटाळ्यातील महिला कुटुंबासह दुसर्या देशात पळून गेल्याची चर्चा आहे. एकंदरीत परदेशात या सगळ्यांचा संसार चांगला चालतो, असेच म्हणावे लागेल.