प्रा. डॉ. वि. ल. धारुरकर
‘शेजारी प्रथम’ हे सूत्र घेऊन भारताने सर्व सार्क राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले आहेत. हिंद-प्रशांत क्षेत्रात शांतता, स्थैर्य आणि समृद्धीची पहाट घडवून आणण्यासाठी भारताचे हे धोरण वरदान ठरले आहे. भारत-मालदीव संबंध हे याच सूत्राचे एक मौलिक उदाहरण होय. गेल्या साठ वर्षांमध्ये भारताने मालदीवशी राजकीय संबंध मजबूत करताना या सूत्राच्या आधारे या हिंदसागर क्षेत्रातील देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विकासात भारताने महत्त्वपूर्ण वाटा उचलला आहे.
हिंद महासागरातील देशातील पायाभूत संरचना तसेच पर्यावरण बदलाचे प्रश्न तसेच तेथील शिक्षण, आरोग्य, निवास, वाहतूक, दळणवळण यासारख्या अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यात भारताने प्राधान्याने समर्थ व सशक्त भूमिका बजावली आहे. अंतर्गत रस्ते असोत, शाळांची बांधणी असो की विमानतळाचा विकास असो या सर्व बाबतीत भारताने टाकलेली पावले मैत्री व सहकार्याचा आदर्श प्रस्थापित करणारी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नुकताच पार पडलेला दोन दिवसांचा मालदीव दौरा त्यामुळेच विशेष महत्त्वाचा ठरला. दोन्ही देश मुक्त व्यापार कराराच्या दिशेने पावले टाकत आहेत. तसेच भारताने मालदीवला 74 अवजड वाहने प्रदान केली आहेत. राजकीय संबंधात वस्तुनिष्ठतेला महत्त्व असते. भारताने कुठल्याही भावनिक समस्यांना माध्यमांच्या दबावाला आणि टीकेला बळी न पडता ठोस निर्णय घेतले व ते कृतीमध्ये आणले ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. चार सामंजस्य करार आणि तीन द्विपक्षीय सहकार्याचे करार ही या दौर्याची एक मोठी उपलब्धी आहे.
माले विमानतळावर मोदी यांचे उत्स्फूर्त स्वागत झाले. त्यांना तोफांची सलामी देण्यात आली. तसेच नव्याने बांधलेल्या संरक्षण इमारतीवर त्यांचे चित्र रेखाटले. या यू टर्नची जादू कशात असेल, तर भारताने केलेल्या भक्कम सकारात्मक सहकार्यात आहे. मालदीवच्या कुठल्याही संकटसमयी पहिल्यांदा कोण धावून गेला असेल, तर तो भारत होय. मागील सर्वसाधारण निवडणुकीत डॉ. मोहम्मद मोईज्जू यांनी इंडिया आऊटचा नारा दिला होता. त्यानंतर काही काळ वादळ निर्माण झाले; पण त्यांना आलेला चीनचा कटू अनुभव पाहता त्यांनी धोरण लिलया बदलले आणि भारताविषयी नकारात्मक नव्हे, तर सकारात्मक भूमिका घेतली. त्यांच्या या रचनात्मक भूमिकेचे प्रतिबिंब या दौर्यामध्ये प्रामुख्याने दिसून आले. या दौर्याच्या काळात भारताने मालदीवला 4,260 कोटी रुपयांचे क्रेडिट लाईन कर्ज मंजूर केले आहे. शिवाय मागील कर्जाचा परतावा करण्यासाठी कालावधीही वाढवून दिला आहे.
शेजारी देश जेव्हा आर्थिक संकटात सापडतात तेव्हा नुसते गोड बोलणारा चीन काही कामाला येत नाही. उलट तत्काळ आणि योग्य मदत मिळते ती भारताकडून. त्यामुळे सार्क आणि हिंद महासागर क्षेत्रातील देश भारताच्या बाजूने भक्कमपणे उभे आहेत. राबविलेले विकास प्रकल्प असोत की, भविष्यकालीन योजना असोत, त्यांच्या अंमलबजावणीच्या बाबतीत भारताचा द़ृष्टिकोन प्रामाणिक असा आहे. कोणत्याही बाबतीत भारताने अशी विकासकामे करताना नाटकीपणा दाखवला नाही. भारत आणि चीन यांच्या मदतीमध्ये हाच खरा फरक आहे. भारत दिलेला शब्द पाळतो; पण चीन मात्र मोठ्या मोठ्या गोष्टी, वल्गना करतो आणि प्रत्यक्षात मात्र हातावर तुरी देऊन पसार होतो. यामुळे श्रीलंका, मालदीव, नेपाळ, भूतान यासारखी राष्ट्रे चीनच्या कटू अनुभवापासून धडे घेऊन सुधारत आहेत. याचा प्रत्यय मालदीव दौर्यातून आला आहे. ‘इंडिया आऊट’ म्हणणार्या मोईज्जू यांना मालदीवच्या प्रत्येक संकटसमयी भारत धावून येतो, हे मान्य करावे लागले.
मालदीवच्या 60 व्या स्वातंत्र्यदिनी त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून पंतप्रधान मोदी यांची निवड केली, यातच भारताच्या परराष्ट्र धोरणाचे यश सामावलेले आहे. परराष्ट्रमंत्री जय शंकर यांनी मुत्सद्देगिरीने योग्य ती पावले टाकून याबाबतीत सकारात्मक वातावरण तयार केले आहे, ही गोष्ट विशेषत्वाने नमूद केली पाहिजे. मालदीवमधील भारताचे राजदूत सुब्रमण्यम आणि परराष्ट्र सचिव मिस्त्री यांच्या निवेदनातील सारांश हे सांगतो की, भारताच्या सकारात्मक आणि विकास प्रेरक योजनांमुळे चित्र बदलले आहे आणि भारत-मालदीव मैत्रीच्या क्षितिजावर नवा सूर्योदय घडून आला आहे. भारत आणि मालदीव संबंधात यू टर्न कसा आला आणि बदल कसे घडून आले, याचा अभ्यास करता असे दिसते की, भारताने प्रदान केलेले विकास प्रकल्प हे या बदलाचे खरे रहस्य होय. नकारात्मक वातावरणाचे रूपांतर सकारात्मक स्थितीमध्ये करणे अवघड होते; पण त्यात भारताला जबरदस्त यश आले ते कठीण प्रयत्नामुळे आणि चिकाटीमुळे. आजवर केलेले प्रयत्न हे भविष्यकाळात निरंतर सहकार्याची हमी व ग्वाही देणारे असतील. मालदीव हे राष्ट्र संपूर्णपणे भारताच्या पर्यटन उद्योगावर अवलंबून आहे.
भारतीय पर्यटक मालदीवला दरवर्षी 20 लाखांपेक्षा अधिक संख्येने पर्यटक भेट देतात. भारतीय पर्यटक जितके अधिक संख्येने मालदीवला जातील तेवढ्या अधिक प्रमाणात मालदीवचा आर्थिक विकास होतो; परंतु मध्यंतरी मालदीवच्या नेत्यांनी केलेल्या उलटसुलट विधानांमुळे काही वर्षांपूर्वी भारतीय पर्यटकांनी मालदीववर जणू बहिष्कार टाकला होता. आता मोईज्जू यांनी धोरण बदलले आणि भारतापुढे मैत्रीचा हात पुढे केला. त्यामुळे भारतीय पर्यटकही आता मालदीवकडे भेट देण्यासाठी उत्सुक झालेले आहेत. मालदीवच्या विकासामध्ये रस्ते दळणवळण, हवाई वाहतूक तसेच शाळा, आरोग्य आणि सुरक्षा हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. या सर्व प्रश्नांच्या पूर्ततेसाठी भारताने घेतलेला पुढाकार महत्त्वाचा आहे.
भारत आणि मालदीव यांच्यातील मागील सहा दशकांचा राजकीय संबंधांचा प्रवास हा निश्चितच सकारात्मक आणि फलदायी आहे. पंतप्रधान मोदी यांची मालदीव भेट ही या संबंधाला एका नव्या उंचीवर नेणारी आहे. ही विकासाची भागीदारी रचनात्मक भागीदारी आहे. उभय देशांमध्ये मैत्रीपूर्ण स्नेहसंबंध निर्माण करणारी आहे. भारताचे एवढेच म्हणणे आहे की, आपली भूमी भारताच्या शत्रूंना वापरण्यास देऊ नये आणि ही गोष्ट मालदीवनेे यावेळी मान्य केली आहे आणि यापुढे चीन सारख्या देशातून भारतविरोधी कोणतीही कारवाई केली जाणार नाही, याबाबत मालदीव डोळ्यांत तेल घालून खबरदारी घेणार आहे, हे सर्वांत महत्त्वाचे आहे. मोईज्जू यांनी भारताविषयी व्यक्त केलेली कृतज्ञता ही आपल्या मदतीची पावती आहे. भविष्यात मालदीवमध्ये कोणतेही सरकार येवो, भारत-मालदीव संबंध हे असेच वर्धिष्णु असतील आणि ते यापुढेही उंचीवर नेणारे ठरतील, या द़ृष्टीने ही भेट एक नवा मैलाचा दगड ठरला आहे.