pudhari
पुढारी File Photo
संपादकीय

आपला तो..!

पुढारी वृत्तसेवा

नवीन पिढीच्या कारनाम्यांनी महाराष्ट्रचे पुत्र आणि कन्या वाटेल तसे गाड्या चालवून लोकांना चिरडत आहेत. आम्ही स्वतः पण दूरवरून एखादी कोटी-दीड कोटीची गाडी येताना दिसली की, शक्यतो एखाद्या जवळपासच्या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या पायऱ्यांवर जाऊन उभे राहत आहोत.

पैसे कमावण्याच्या नादात बऱ्याच लोकांना मुलाबाळांकडे पाहण्याइतकाही वेळ नाही. भल्या मोठ्या रकमा यांच्या तिजोरीत पडलेल्या असतात आणि यांच्या लेकराबाळांची डेबिट आणि क्रेडिट कार्ड ओसंडून वाहत असतात. भरपूर पैसा हाताशी असणाऱ्या या लेकराबाळांनी विशेषतः संध्याकाळच्या वेळी काय करावे, हा त्यांच्यासमोर मोठाच प्रश्न असतो.

मग ते गाड्या काढतात आणि शहरातील रहदारीमधून भरधाव मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात. अशी भारीची गाडी चालविताना समोर कुणी आले तर त्यात यांचा काय दोष? गोरगरीब आणि सामान्य जनतेने जेवढे होईल तेवढे अंग आक्रसून रस्त्याच्या एका कोपऱ्याने किंवा शक्यतो फुटपाथवरून चालत गेले पाहिजे. आम्ही तर म्हणतो, संध्याकाळ होण्याच्या आत सामान्य लोकांनी घर गाठले पाहिजे. अशा उन्मत्त वाहनचालकांमुळे शहरांमधील फुटपाथही सुरक्षित राहिले नाहीत, हे आपण नेहमी पाहतो. बेजबाबदार पालकांचा राज्यभर खूप निषेध केल्यामुळे तेसुद्धा काहीसे सावध झालेले दिसत आहेत. होणाऱ्या खर्चामुळे ते सावध झाले

मित्रांपैकी एकाचेही नाव का समोर आले नाही?

असतील, असे तुम्हास वाटत असेल, तर तुमचे चूक आहे. पोलिस मॅनेज करणे, प्रयोगशाळेमधील रिपोर्ट बदलणे, रिपोर्ट बदलण्यापेक्षा सॅम्पलच तिसऱ्या कुणाचे देणे, कोर्टामधील तारखा, अल्पकाळाची कोठडीची हवा, या सर्वांमध्ये महिना-दोन महिने सहज निघून जातात.

या दोन महिन्यांमध्ये जे उत्पन्न मिळणे अपेक्षित होते, ते मिळत नाही, यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत. आपल्या दिवट्याच्या गाडीखाली दोन निष्पाप जीव बळी गेल्याची कुठलीही खंत किंवा खेद ना ती पोर्शे कार चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाच्या वडिलांच्या चेहऱ्यावर दिसली नाही, ना त्याच्या आजोबांच्या चेहऱ्यावर दिसली. या सर्वांना काळजी केवळ कुलदीपकाची होती. यातील गमतीचा भाग म्हणजे या दिवट्याबरोबर त्या दिवशी गाडीमध्ये असणाऱ्या त्याच्या अतिदिवट्या मित्रांपैकी एकाचेही नाव कधीही समोर आले नाही.

खरे तर हे घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार आहेत. गावाकडे तिरट नावाचा पत्त्यांचा एक जुगार खेळला जातो. पोलिस धाड टाकतात आणि सात आठ जणांना उचलतात. दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्रांमध्ये त्या प्रत्येकाचे नाव आलेले असते. पोर्शे कार प्रकरणातील अल्पवयीन चालकाच्या मित्रांपैकी एकाचेही नाव कधीही वृत्तपत्रांमध्ये आले नाही, याचा अर्थ त्यांच्या बापांची मॅनेजमेंट परफेक्ट होती हा आहे. त्यांनी मॅनेजमेंटच अशी केली की, पोलिसांकडून एकाचेही नाव बाहेर जाहीर केले गेले नाही. शिवाय कोणाही पत्रकाराने त्यांची नावे शोधण्याचा प्रयत्न केला नाही असे दिसते. तर असे कारनामे करणाऱ्या किंवा ज्यांच्या हातून असे काही प्रकार होतील अशी शक्यता असणाऱ्या मुलांच्या बापांनी आता नवीन युगात शक्कल लढवली आहे. मुलाबाळांवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी 'डिटेक्टिव्ह' नेमले आहेत. बापाला वेळ नाही आणि आई बापापेक्षा अधिक व्यस्त आहे. अशावेळी व्यावसायिक गुप्तहेरांची मदत घेणे पण चांगलेच आहे.

SCROLL FOR NEXT