इम्रान विरुद्ध मुनीर File Photo
संपादकीय

Imran Vs Munir | इम्रान विरुद्ध मुनीर

पाकिस्तान हे अमेरिकेसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे, असे उद्गार अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी काढले होते.

पुढारी वृत्तसेवा

पाकिस्तान हे अमेरिकेसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे, असे उद्गार अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी काढले होते. ‘अ प्रॉमिस्ड लँड’ या आपल्या पुस्तकात ओबामा यांनी म्हटले होते की, पाकिस्तानी सैन्य विशेषतः त्यांच्या आयएसआयमधील काही जणांचे तालिबान व अल कायदासोबत संबंध असल्याचे उघड गुपित होते. थोडक्यात, पाकिस्तान हे ‘दहशतवादी राष्ट्र’ असल्याचे त्यांनी सूचित केले होते. पाकिस्तानमध्ये सर्वसामान्य नागरिक आणि अल्पसंख्याक सुरक्षित नाहीत. सामाजिक कार्यकर्ते, लेखक, पत्रकार यांनादेखील अचानकपणे अद़ृश्य केले जाते. आता भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून तुरुंगात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची हत्या झाल्याचा दावा अफगाणिस्तानातील काही माध्यमांनी केला आहे. त्यावरून पाकमध्ये वादळ उठले आहे. लष्करप्रमुख असीम मुनीर हेच देशाचा कारभार पाहत असून, त्यांचे आणि इम्रान यांचे वैर जगजाहीर आहे. त्यांच्या इशार्‍यानुसार इम्रान यांची हत्या झाली असावी, असा संशय आहे. हत्येच्या या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही.

उच्च न्यायालयाने आठवड्यातून किमान एकदा इम्रान यांची भेट घेण्याची परवानगी दिलेली असतानाही जवळपास तीन आठवडे त्यांना भेटण्याची परवानगी नातेवाईकांना नाकारली गेली. लष्कराच्या वरदहस्तामुळे सत्तारूढ झालेले इम्रान खान त्यानंतर लष्करालाच डोईजड झाले. त्यामुळे त्यांना पंतप्रधानपदावरून हटवण्यात आले. त्यानंतर पाकिस्तानात दोन वर्षे राजकीय अस्थिरता होती. मग, इम्रान यांना अटक करण्यात येऊन शिक्षाही ठोठावण्यात आली. पक्षांतर्गत निवडणुका न घेतल्याचा ठपका ठेवून, पाकिस्तान तहरिके इन्साफ (पीटीआय) पक्षाचे निवडणूक चिन्हही काढून घेण्यात आले, तरीही सार्वत्रिक निवडणुकांत पीटीआयला 93 जागा मिळाल्या.

नवाझ शरीफ यांच्या पीएमएलला (एन) 98 आणि बिलावल भुत्तो झरदारी यांच्या पीपीपीला 68 जागा मिळाल्या. मतदानाची टक्केवारी पाहिल्यास पीटीआयला सर्वाधिक म्हणजे 31 टक्के, तर पीएमएलला (एन) 24 टक्के आणि पीपीपीला 13 टक्के मते मिळाली. पंजाब आणि सिंध प्रांतात अनुक्रमे शरीफ आणि भुत्तो यांच्या पक्षास नेहमीप्रमाणे यश मिळाले, तर पीटीआय हा खैबरपख्तुनख्वाँ आणि बलुचिस्तानमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला; मात्र पाकिस्तानी लष्कराने निवडणुका हायजॅक करून शर्यतीत शरीफ यांना पुढे ठेवले, असा आरोप आहे. पाकिस्तानातील संसदीय निवडणुकीचे निरीक्षण करण्यासाठी अमेरिका, ब्रिटन व युरोपियन युनियनचे जे प्रतिनिधी आले होते त्यांनीदेखील त्या निवडणुकीच्या पारदर्शकतेबद्दल शंका व्यक्त केली होती.

इम्रान खान हे तुरुंगात असूनदेखील त्यांच्या पक्षाला चांगल्या जागा मिळाल्या आणि त्यामुळेच इम्रान यांच्यापासून अन्य पक्षांना आणि लष्कराला धोका वाटत आहे. 2024 मध्ये पीएमएल आणि पीपीपी यांनी एकत्र येऊन लष्कराच्या आशीर्वादाने सरकार स्थापन केले आणि शाहबाझ शरीफ हे पंतप्रधान बनले; परंतु पाकिस्तानच्या 78 वर्षांच्या इतिहासात एकाही पंतप्रधानाला पाच वर्षांचा काळ पूर्ण करता आलेला नाही. तीन ते चार वेळा लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सरकारची सत्ता उलथवून सैन्याने कब्जा घेतला, तर 12 पंतप्रधानांवर वेगवेगळे आरोप ठेवून, सत्तेतून बेदखल करण्यात आले. 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान बनलेले लियाकत अली खान यांची रावळपिंडीतच हत्या झाली.

1958 मध्ये लष्करप्रमुख जनरल अयूब खान यांनी सत्तापालट घडवून आणला आणि पंतप्रधानांना पदावरून हटवले. राष्ट्रपतींना राजीनामा देण्यास भाग पाडले. यानंतर अयूब खान स्वतः राष्ट्रपती बनले आणि पंतप्रधानपद 13 वर्षांसाठी चक्क रद्द केले. 1979 मध्ये जनरल झिया उल हक यांनी झुल्फिकार अली भुत्तोंवर निवडणुकीत हेराफेरी केल्याचा आरोप ठेवून, त्यांना सुळावर चढवले. 1999 मध्ये कारगिल युद्धानंतर जनरल परवेझ मुशर्रफ यांनी देशात आणीबाणी लागू केली आणि नवाझ सरकारला पदच्युत केले. पीपीपीच्या नेत्या बेनझीर भुतो यांचीदेखील हत्या झाली. नवाझ शरीफ यांनी चौथ्यांदा पंतप्रधानपद स्वीकारले तेव्हा म्हणजे 2017 मध्ये पनामा पेपरगेटमध्ये नाव आल्यानंतर त्यांना खुर्ची सोडावी लागली. आता इम्रान, त्यांची पत्नी बुशरा बीबी भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तुरुंंगात आहेत. इम्रान सत्तेवर असताना बुशरा यांचा सरकारमध्ये खूप प्रभाव होता. बुशरा बीबी यांच्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचा निर्णय मुनीर यांनी घेतला होता आणि म्हणूनच त्यांना 2019 मध्ये आयएसआयमधून इम्रान यांनी हाकलले होते. त्याचाच बदला आता मुनीर घेत आहेत.

इम्रान खान हे पठाणी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. आपली उपेक्षा होत असल्याचे खैबरपख्तुनख्वाँ आणि बलुचिस्तान या प्रांतांतील लोकांची भावना आहे. आपल्या नेत्याला वाईट वागणूक दिली जात आहे व त्याच्या जीवाला धोका आहे, ही भावना झाल्यामुळेच पीटीआय पक्षाचे कार्यकर्ते शेकडोंच्या संख्येत तुरुंगाबाहेर जमले. याआधीदेखील ते रस्त्यावर उतरले होते.

लष्कराच्या मुख्यालयावर हे कार्यकर्ते चाल करून गेले होते. शिवाय पाकिस्तानी लष्कराला इम्रान खान यांच्या लोकप्रियतेची भीती वाटते. पाकिस्तानातील खैबरपख्तुनख्वाँ, बलुचिस्तान, सिंध, पाकव्याप्त काश्मीर असा सर्वत्र जनतेत असंतोष आहे. आता तर इम्रान यांचे पुत्र कासिम खान यांनीच स्वतःच इम्रान जिवंत असल्याचा पुरावा द्या, अशी मागणी केली आहे. तुरुंग प्रशासन इम्रान ठीक असल्याचे सांगत असले, तरी जनतेचा त्यावर विश्वास नाही. पाकिस्तान सरकार याबाबत काहीही ठोसपणे सांगत नसल्याने संशयाचे धुके निर्माण व्हायला वाव आहे. खैबरपख्तुनख्वाँच्या मुख्यमंत्र्यांना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचेही सांगितले जात आहे. पीटीआयचे कार्यकर्ते आक्रमक होत आहेत. इम्रान यांच्या बहिणींनी तर गेल्या काही दिवसांपासून हा मुद्दा लावून धरला आहे. त्यामुळे याबाबत ठोस काही माहिती समोर आली नाही, तर या असंतोषात आणखी भर पडत जाऊन त्याचा स्फोट होऊ शकतो. पाक सरकार आणि तेथील लष्करी यंत्रणा आता हे प्रकरण कसे हाताळते, त्यावर पाकिस्तानातील राजकारणाची दिशा ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT