Illegal extraction of sand
वाळूच्या अतिउपशाचा विपरीत परिणाम होतो. Pudhari File Photo
संपादकीय

बेसुमार वाळू उपशाचा धोका

पुढारी वृत्तसेवा
परनित सचदेव, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ

वाळूचा बेसुमार उपसा जगातील नद्यांच्या स्थितीत बदल घडवून आणत आहे. वाळूचे बेकायदा उत्खनन आणि तस्करी हा जगातील तिसर्‍या क्रमाकांचा गुन्हा मानला जात असून, त्याची उलाढाल 2021 मध्ये 350 अब्ज डॉलरपर्यंत राहिली आहे. उत्खनन हा जगातील सर्वात मोठा उपसा उद्योग आहे; कारण वाळू हा काँक्रिटमधील महत्त्वाचा घटक आहे आणि जागतिक बांधकाम उद्योग हा अनेक दशकांपासून वाढत आहे. वाळू अतिरिक्त गाळ जमा होण्यापासून रोखण्याचे काम करते; मात्र अतिउपशाचा विपरीत परिणाम होतो.

वाळूचा उपसा बेकायदा मार्गाने

सोन नदी ही गंगा नदीची उपनदी आहे. वाळू तस्करांची वक्रद़ृष्टी यावर पडली नसेल तर नवलच. असंख्य मजूर या नदीपात्रातून पिवळे सोने म्हणजे वाळू काढून रोज केवळ चारशे रुपये कमावतात. भारत जगातील चीननंतर सर्वात मोठा सिमेंट उत्पादक देश आहे. 2021 मध्ये सिमेंटचे 330 दशलक्ष मेट्रिक टनांचे उत्पादन झाले होते. स्वित्झर्लंडच्या जीनिव्हा येथील मुख्यालय असलेली एक स्वयंसेवी संस्था ‘ग्लोबल इनिशिटिव्ह’शी अधिनिस्त प्रेम महादेवन यांनी एक संशोधन पेपर लिहिला आणि तो प्रकाशित केला. यात भारतातील सिमेंट उद्योग हा जगातील तिसर्‍या क्रमाकांचा असल्याचे म्हटले आहे. यात 3.5 कोटींपेक्षा अधिक लोकांना रोजगार मिळाला आहे. 2000 च्या प्रारंभीपासूनच भारतात वाळूच्या मागणीत तीनपट वाढ नोंदविली गेल्याचा अंदाज आहे. बहुतांश वाळूचा उपसा बेकायदा मार्गाने केला जातो. अर्थात, वास्तविक मोजमाप करणे कठीण आहे. त्यांनी म्हटले, वाळू तस्कर स्वहित साधण्यासाठी चहुबाजूंनी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात संघटित राहत असतात. वाळू उपशासंदर्भात माहिती गोळा करणारी तसेच बंधारे, नद्या आणि लोकांचा अभ्यास करणारी स्वयंसेवी संस्था दक्षिण आशिया नेटवर्कच्या (एसएएनडीआरपी) मते, बिहार, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश हे प्रामुख्याने तस्करग्रस्त भाग आहेत आणि या ठिकाणी पोलिस आणि राजकीय नेत्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. ‘एसएएनडीआरपी’च्या मते, वाळू तस्करांच्या हल्लल्ल्यात जानेवारी 2019 ते नोव्हेंबर 2020 या काळात किमान 23 नागरिक, पाच पत्रकार आणि स्वयंसेवी कार्यकर्ते तसेच 11 सरकारी अधिकारी मारले गेले आहेत.

पोलिस उपअधीक्षक सुरेंद्र सिंह यांना डंपरखाली चिरडले

सुमैरा अब्दुलाली हे भारतातील बेकायदा वाळू उपशाविरुद्धचे खंबीर आणि आघाडीचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांनाही वाळू माफियांच्या हिंसाचाराचा सामना करावा लागला. परिणामी, त्यांचा एक हात अधू झाला, दात पडले आणि कायमस्वरूपी डोकेदुखी सुरू झाली. याप्रमाणे 19 जुलै 2022 रोजी हरियाणाच्या नूँहच्या पचगावजवळ वाळू उपसा रोखण्याचा प्रयत्न करणार्‍या 59 वर्षीय पोलिस उपअधीक्षक सुरेंद्र सिंह यांना एका डंपरखाली चिरडले.

जगातील बोटांवर मोजण्याएवढेच देश वाळूच्या तस्करीला लगाम घालण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या व्यवस्थेत बदलाची मागणी करत आहेत. तरीही उत्खनन हा जगातील सर्वात मोठा उपसा उद्योग आहे; कारण वाळू हा काँक्रिटमधील महत्त्वाचा घटक आहे आणि जागतिक बांधकाम उद्योग हा अनेक दशकांपासून वाढत आहे. संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या अहवालानुसार, जगात दरवर्षी 50 अब्ज दशलक्ष टन वाळूची विक्री केली जाते. अ‍ॅमस्टरडॅम विद्यापीठाच्या अभ्यासकांनी 2022 मध्ये केलेल्या एका अभ्यासातील निष्कर्षानुसार, सध्या आपण नदीतून एवढे उत्खनन करत असून, त्याची भरपाई करणे अशक्य आहे. परिणामी, 2050 पर्यंत जागतिक पातळीवर बांधकामयोग्य वाळूचे प्रमाण कमी होऊ शकते. ‘यूएन’च्या अहवालात, सध्याची स्थिती पाहिली तर वाळूचा उपसा अधिक काळ करता येणार नाही, असे म्हटले आहे. वाळूची मागणी एवढी वाढली आहे की, त्यामुळे जगभरातून जलमार्ग, समुद्राचा तळ, नद्या, वाळवंट येथून वाळूचा उपसा केला जात आहे. अमेरिकी भूगर्भशास्त्रज्ञांना सर्वेक्षणातून मिळणार्‍या संकेतानुसार, जगात उत्पादित वाळूचे मूल्य 785 अब्ज डॉलरपर्यंत राहू शकते. नद्यांचा तळ, तलावांचा तळ आणि किनारपट्टीचा भाग हा वाळूसाठी सर्वोत्तम स्रोत मानला जातो; मात्र मागणीमुळे समुद्राची किनारपट्टी आणि ढिगार्‍यांतूनही बेकायदा उपसा केला जात असून, त्याची विक्री केली जात आहे.

कोळशाच्या राखेपासून केली वीट तयार

मुंबईत आयआयटीत इंजिनिअरिंग आणि पर्यावरणशास्त्राचे अभ्यासक सिमेंट आणि काँक्रिटच्या पर्यायांवर काम करत आहेत. 2019 मध्ये त्यांच्या पथकाने गेल्या 38 वर्षांपासून देशात तयार झालेला कचरा आणि नगरपालिकेच्या डंपिंग झोनमध्ये एकत्र केलेला कचरा यांचे प्रमाण निश्चित केले. त्यांनी कोळशाच्या राखेपासून वीट तयार केली आणि मायक्रोफायबर निर्माण करणारे रोपटे वाढवून ते बायोमासमध्ये कसे परावर्तित करता येईल, यावर काम सुरू केले. 2028 मध्ये सृती पांडे यांनी ‘स्ट्रक्चर इको’ तयार केले आणि ते पिकांचा कचरा गोळा करण्याचे काम करतात. तो कचरा आपल्या कारखान्यात घेऊन जातात. या ठिकाणी 90 टक्के पेंढीपासून तयार केलेल्या पॅनलला लहान-लहान तुकड्यात विभागले जाते. त्याचा वापर भिंत किंवा छतासाठी केला जातो. या सामग्रीच्या आधारे कमी खर्चात इमारती बांधल्या जातात. आपण दरवर्षी 50 अब्ज टन वाळूचा वापर करतो. एवढ्या वाळूत भूमध्य रेषेवर पृथ्वीच्या चहुबाजूंनी 27 मीटर उंच आणि 27 मीटर रुंद भिंत उभारली जाऊ शकते. वाळूच्या मागणीने वाळू माफियांना बळ मिळाले आहे. हे तस्कर प्रत्येक देशात सक्रिय आहेत. मग अमेरिका असो, चीन, भारत, जमैका, इंडोनेशिया, श्रीलंका, मोरोक्को असो किंवा सिएरा लिओन. आपले विकासक हे पुढच्या पिढीसाठी पृथ्वीचे सुंदर रूप सोडताना दिसत नाहीत. पृथ्वीला यातना सहन कराव्या लागत आहेत. आता आपण अधिक शाश्वत आणि समाधानकारक तोडगा काढून त्याचा स्वीकार करण्याची वेळ आली आहे.

SCROLL FOR NEXT