International Political News pudhari photo
संपादकीय

हंगेरीत राष्ट्रपती-पंतप्रधान संघर्ष

पुढारी वृत्तसेवा

मुरलीधर कुलकर्णी

हंगेरीच्या राजकीय इतिहासात २०२६ ची सार्वत्रिक निवडणूक ही एका मोठ्या परिवर्तनाची नांदी ठरली. सोळा वर्षांपासून सत्तेवर घट्ट पकड असलेल्या व्हिक्टर ऑर्बान यांच्या एकाधिकारशाही राजवटीचा अंत करून, पीटर मगर यांच्या 'तिस्झा' पक्षाने संसदेत दोन तृतीयांश जागा जिंकत ऐतिहासिक विजय मिळवला. मात्र, बुडापेस्टमध्ये सरकारचा जो शपथविधी पार पडला, त्याने हंगेरीला अभूतपूर्व घटनात्मक आणि राजकीय पेचात आणून सोडले आहे.

हा सोहळा तीव्र संघर्षाचा एक जाहीर आखाडा बनला. लोकशाही देशांमध्ये सत्ता बदलल्यानंतर काही किमान राजकीय शिष्टाचार आणि परंपरा पाळल्या जातात, परंतु पंतप्रधान पीटर मगर यांनी या परंपरांना जाहीरपणे सुरुंग लावत आक्रमक भूमिका स्पष्ट केली.

या राजकीय नाट्याचा मुख्य केंद्रबिंदू ठरला अधिकृत छायाचित्रांवर टाकलेला बहिष्कार. हंगेरीच्या परंपरेनुसार, नवीन मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर सर्व मंत्री राष्ट्रपतींसोबत एकत्रितपणे छायाचित्र काढतात. परंतु, पीटर यांनी राष्ट्रपती सुल्योक यांच्यासोबत फोटो काढण्यास आणि त्यांच्याकडून शुभेच्छा स्वीकारण्यास मंत्र्यांना प्रतिबंध केला.

हा बहिष्कार केवळ शब्दांपुरता मर्यादित नव्हता, तर हॉलमध्ये कॅमेऱ्यासमोर मंत्र्यांची रचना अशा विशिष्ट कोनात केली होती की, राष्ट्रपती सुल्योक कॅमेऱ्याच्या फ्रेममधून बाहेर राहतील. राष्ट्रपती सुल्योक हे माजी पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बान यांचे निष्ठावंत मानले जातात. त्यामुळे मगर यांच्या दृष्टीने हे राष्ट्रपती जुन्या भ्रष्ट राजवटीचे 'बाहुले' असून ते लोकशाही जनादेशाचे प्रतिनिधित्व करत नाहीत.

देशाच्या अधिकृत वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या राष्ट्रपतींना सुरुवातीच्या फोटोंमधून चक्क 'क्रॉप' करून वगळल्यामुळे हंगेरीच्या माध्यमांमध्ये आणि राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले. यावर राष्ट्रपती कार्यालयाने स्वतःच्या छायाचित्रकारांमार्फत हस्तांदोलनाचे फोटो काढून ते सोशल मीडियावर प्रसारित केले.

पंतप्रधान मगर यांनी थेट राष्ट्रपतींच्या राजीनाम्याचीच मागणी केल्यामुळे हा संघर्ष आता थेट संस्थात्मक लढाईच्या पातळीवर पोहोचला आहे. राष्ट्रपती सुल्योक यांनी राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिला असून आपण घटनात्मक शपथेशी प्रामाणिक राहू, असे जाहीर केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT