Assembly election results | नव्या राजकारणाची सुरुवात

Assembly election results |
Assembly election results | नव्या राजकारणाची सुरुवात
Published on
Updated on

प्रा. डॉ. वि. ल. धारुरकर

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांतून भारतीय मतदार अधिक जागरूक, परिपक्व आणि विकासाभिमुख झाल्याचे दिसते.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल पाहता भारतीय मतदार दिवसेंदिवस चोखंदळ, चिकित्सक आणि निर्णयक्षम होत आहे, या सत्याची प्रचिती येते. या निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी 90 टक्क्यांच्या पुढे पोहोचली. हे सुजाण द़ृष्टीचे, प्रगल्भतेचे प्रतीक होय. या निकालांमध्ये एक समान धागा आहे तो म्हणजे, मतदारांच्या बदलत्या आकांक्षा, त्यांची परिपक्वता आणि विकासाबाबत वाढत असणारी जागरूकता. या तिन्ही गोष्टी भारतीय लोकशाहीला बळकटी देणार्‍या आहेत. सत्ता ही आपली मक्तेदारी नाही, मनमानी कारभार जनता आता सहन करणार नाही, हा संदेश या निकालांनी राजकीय नेत्यांना पुन्हा एकदा दिला आहे.

प. बंगालमध्ये भाजपची मुसंडी

सातत्याने तीन वेळा सत्तेवर असलेल्या ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या सत्तेविरोधात अँटी इन्कम्बन्सी भावना निर्माण होणे अपरिहार्य होते. शिवाय त्यांच्या पक्षातील अभिजन वर्गाची मक्तेदारी, उच्च स्तरावरील राजकीय गैरव्यवहार आणि मागील कालखंडात बिघडलेली कायदा-सुव्यवस्था, महिलांवर झालेले अन्याय-अत्याचार यामुळे बंगालमधील मतदार असंतुष्ट होते. भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार मोहिमांची आखणी करत लोकांपर्यंत सामाजिक कल्याणकारी विकास कार्यक्रम नेले. देशाच्या इतर राज्यात होत असलेल्या सर्वांगीण प्रगतीचे चित्र पाहून बंगाली नागरीकांनाही कृषी, उद्योग, शिक्षण, आरोग्य, ऊर्जा, सुरक्षा या सर्व बाबतीत काही रचनात्मक व ठोस घडावे, अशी अपेक्षा होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे बंगालमधील जनतेने डबल इंजिन सरकारच्या दिशेने कौल दिला. भाजपचा गड असलेल्या उत्तर बंगालपेक्षाही दक्षिण बंगालमध्ये अधिक जोरदार मुसंडी मारत भाजपने मतदारांना आपल्याकडे खेचण्यात यश मिळवलेे. त्यामुळे हे विक्रमी यश प्राप्त होऊ शकले. बंगालमध्ये भारतीय जनसंघाचे संस्थापक पंडित श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी भारताच्या मंत्रिमंडळात उद्योगमंत्री म्हणून काम पाहिले होते. त्यांनी जम्मू- काश्मीरच्या विलीनीकरणासाठी काश्मीरमध्ये सत्याग्रह केला होता; पण कारावासात त्यांचा मृत्यू झाला होता. ताज्या निकालांनी बंगाली मतदारांनी त्यांना न्याय दिला, असे म्हणावे लागेल. निवडणूक आयोगाच्या सतर्कतेमुळे बंगालमध्ये निवडणूकपूर्व आणि निवडणुकोत्तर काळात हिंसाचाराचा मागमूसही दिसून आला नाही. त्यामुळेच यंदा मतदानाची टक्केवारी वाढलेली दिसून आली. हिंदुत्वाच्या मुद्द्याने बंगालच्या मातीत घेतलेली ही पकड भविष्यातील राजकारणाची दिशा ठरवणारी ठरणार आहे.

तामिळनाडूचा नवा ‘जननायक’

तामिळनाडूच्या राजकीय इतिहासात यंदाच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल सुवर्णअक्षरांनी लिहिले जातील. दशकानुदशके ज्या द्रविड राजकारणाच्या गडाला कोणीही धक्का लावू शकले नाही, तो 77 वर्षे जुना द्रमुकचा किल्ला अवघ्या दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ या पक्षाने भुईसपाट केला. ‘थलपती’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सुपरस्टार विजयने रुपेरी पडद्याबरोबरच राजकीय रणांगणातही ताकद सिद्ध करत तामिळनाडूमध्ये एका नव्या युगाचा श्रीगणेशा केला. या विजयाने टीव्हीकेने राजकीय विलेषकांचे सर्व आडाखे मोडीत काढले. तामिळनाडूमध्ये चित्रपट आणि राजकारण हे एकमेकांपासून वेगळे करता येत नाहीत. सी. एन. अण्णादुराई, एम. करुणानिधी, एम. जी. रामचंद्रन आणि जयललिता या सर्वांनी रुपेरी पडद्याच्या माध्यमातून मिळालेल्या ‘स्टारडम’चे रूपांतर सत्तेत केले होते. मात्र, गेल्या काही वर्षांत तमिळ जनतेला एका नव्या आणि तरुण नेतृत्वाची प्रतीक्षा होती. विजयने नेमकी हीच पोकळी ओळखून ‘तमिळगा वेत्री कळघम’ची स्थापना केली. त्याने केवळ ग्लॅमरवर विसंबून न राहता बूथ स्तरावर कार्यकर्त्यांचे जाळे विणले. पहिल्यांदा मतदान करणार्‍या तरुणांनी ‘टीव्हीके’ला बदलाचा पर्याय म्हणून स्वीकारले. माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्यानंतर अण्णा द्रमुकमध्ये निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी भरून काढण्यात ‘टीव्हीके’ यशस्वी ठरला. अण्णाद्रमुकचा पारंपरिक मतदार मोठ्या प्रमाणावर विजयकडे वळल्याचे चित्र दिसत आहे. द्रमुक हा राजकीय शत्रू आहे आणि भाजप हा वैचारिक शत्रू आहे, ही विजयची स्पष्ट भूमिका तमिळ अस्मितेचा अभिमान बाळगणार्‍या मतदारांना भावली. शिवाजी गणेशन किंवा कमल हासन यांच्याप्रमाणे करिअरच्या उतरत्या काळात नव्हे, तर यशाच्या शिखरावर असताना विजयने राजकारणात उडी घेतली आणि सी. एन. अण्णादुराई आणि एमजीआर यांच्या पावलावर पाऊल ठेवून तामिळनाडूच्या राजकारणात इतिहास घडवला. हा ‘नवा सेनापती’ आता तामिळनाडूला कोणत्या दिशेने घेऊन जातो, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

आसाममध्ये हॅट्ट्रिक

आसाम विधानसभा निवडणुकीत भाजपने मिळवलेला विजय हा विकासकामांवर आणि सांस्कृतिक अस्मितेच्या मुद्द्यावर मतदारांनी दिलेली सकारात्मक पावती म्हणावा लागेल. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने सलग तिसर्‍यांदा सत्ता राखत आपला गड अधिक मजबूत केला. सीमारेषा सुरक्षा, पायाभूत सुविधांचा विकास आणि स्थानिक समुदायांच्या हक्कांचे संरक्षण या मुद्द्यांना आसामच्या जनतेने भरभरून दाद दिली.

पुद्दुचेरीत एनडीए

पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशातही भाजपने मित्रपक्षांसह मिळवलेला विजय हा दक्षिण भारतात पाय रोवण्याच्या त्यांच्या रणनीतीचा एक भाग ठरला आहे. येथील स्थानिक प्रशासनातील सुधारणा आणि केंद्र सरकारकडून मिळणारा निधी यामुळे मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले होते.

केरळमध्ये भाजप तिसरी शक्ती

केरळमध्ये यंदाच्या निकालांनी मोठी उलथापालथ घडवून आणत डाव्यांची सत्ता उलथवून टाकली आहे. तब्बल 10 वर्षांनंतर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडीने (यूडीएफ) जोरदार पुनरागमन केले आहे. भ्रष्टाचाराचे आरोप आणि प्रशासकीय त्रुटी यांसारख्या मुद्द्यांवरून मतदारांनी विजयन सरकारला नाकारल्याचे दिसते. काँग्रेसचे व्ही. डी. सतीशन यांच्या नेतृत्वाखालील संघटित प्रचार आणि राहुल गांधी यांनी दिलेल्या बळामुळे यूडीएफला सर्व स्तरांतील मतदारांपर्यंत पोहोचण्यात यश मिळाले आहे. भाजपने यावेळेस केरळमध्ये ऐतिहासिक कामगिरी नोंदवत चतनूर, नेमम आणि कझाकुट्टम यांसारख्या मतदारसंघात विजय मिळवला आहे. या विजयामुळे केरळच्या राजकारणात तिसर्‍या शक्तीचा उदय होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news