दिलासा कर्करोगावरील लसीचा  (Pudhari File Photo)
संपादकीय

Cancer Vaccine | दिलासा कर्करोगावरील लसीचा

कर्करोगाविरोधातील लढाईत जगाला आता एका महत्त्वाच्या शोधाची आशा दिसू लागली आहे.

पुढारी वृत्तसेवा

कर्करोगाविरोधातील लढाईत जगाला आता एका महत्त्वाच्या शोधाची आशा दिसू लागली आहे. रशियातील शास्त्रज्ञांनी कर्करोगासाठी लस तयार केल्याचा दावा केला असून तिचा पहिला मानवी चाचणी टप्पा यशस्वी झाल्याचे समोर आले आहे. या नव्या घडामोडीमुळे वैद्यकीय क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडू शकतो, असा दावा करण्यात येत आहे.

प्रा. विजया पंडित

गेल्या काही वर्षांत कर्करोगाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. तसेच मृत्यू दरही चिंताजनकरीत्या वाढला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार भारतात दर 9 ते 10 व्यक्तींमध्ये किमान एका व्यक्तीला आयुष्यात कधीतरी कर्करोग होण्याची शक्यता आहे. फक्त 2024 मध्ये भारतात सुमारे 16 लाख नवीन कर्करोग रुग्ण आढळले आणि 9 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर रशियातून आलेली नवी माहिती मोठा दिलासा देणारी आहे.

एमआरएनए तंत्रावर आधारित रशियाने तयार केलेल्या या नव्या लसीचे नाव एंटरॉमिक्स असे असून ती एमआरएनए तंत्रज्ञानावर आधारित आहे. प्राथमिक चाचणी टप्प्यात (फेज 1) ही लस शंभर टक्के प्रभावी आणि सुरक्षित ठरली आहे. चाचणीत सहभागी रुग्णांना गंभीर दुष्परिणाम भोगावे लागले नाहीत, उलट ट्यूमर आकुंचन पावले किंवा त्यांची वाढ मंदावली. वैद्यकीय संशोधनाच्या दृष्टीने हे मोठे यश मानले जात आहे. या लसीत लहान एमआरएनए शरीरात सोडले जातात. हे अणू पेशींना विशिष्ट प्रथिन तयार करण्याचे संदेश देतात. ते प्रथिन कर्करोगी पेशींविरुद्ध रोगप्रतिकार यंत्रणेचे प्रशिक्षण करतात. विशेष म्हणजे एंटरॉमिक्स ही प्रत्येक रुग्णासाठी स्वतंत्ररीत्या बनवली जाते. त्या रुग्णाच्या ट्यूमरमधील अनुवंशिक वैशिष्ट्ये तपासून लस तयार केली जाते. त्यामुळे ती लस केवळ त्या व्यक्तीच्या कर्करोगी पेशींवर हल्ला करते.

कोरोना काळात वापरण्यात आलेल्या एमआरएनए लसीने जसे रोगप्रतिकार यंत्रणेला विषाणूशी लढण्यासाठी तयार केले, त्याच धर्तीवर एंटरॉमिक्स लस रोगप्रतिकार यंत्रणेला कर्करोगी पेशींना ओळखून नष्ट करण्यास सक्षम करते. परंतु या लसीचे वैशिष्ट्य म्हणजे तिची रचना. त्यामुळे कर्करोग उपचारात ही एक खर्‍या अर्थाने क्रांतिकारी ठरू शकते.

या लसीची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे प्रत्येक रुग्णासाठी ती वेगवेगळी तयार केली जाते. एमआरएनए तंत्रामुळे ती अत्यंत वेगाने विकसित करता येते. केमोथेरपी किंवा रेडिएशनसारख्या पारंपरिक उपचारांच्या तुलनेत या लसीचे दुष्परिणाम अत्यल्प असतात. त्यामुळे रुग्णाला अधिक चांगली जीवनशैली आणि आराम मिळण्याची शक्यता आहे. आता पुढील टप्प्यांमध्ये (फेज 2 व 3) मोठ्या प्रमाणावर ही लस तपासली जाणार आहे. तिथेही ती तितकीच प्रभावी आणि सुरक्षित ठरल्यास भविष्यात कर्करोग हा असाध्य किंवा दुर्धर आजार न राहता नियंत्रित करता येण्याजोगा आजार ठरेल.

विशेषतः भारतासारख्या देशात, जिथे कर्करोग झपाट्याने वाढत आहे, ही लस आशेचा किरण ठरू शकते. सुरुवातीला या लसीचे लक्ष्य कोलोरेक्टल कर्करोग, मेंदूतील ग्लायोब्लास्टोमा आणि डोळ्यातील ऑक्युलर मेलानोमा यांसारखे कर्करोग ठेवण्यात आले आहेत. पण जसजसे संशोधन आणि मानवी चाचण्या होत जातील तसतसे ही लस सर्व प्रकारच्या कर्करोगांसाठी प्रभावी ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. रशियन एंटरोमिक्स कॅन्सर व्हॅक्सिन आता रुग्णांवर वापरण्यास पूर्णपणे तयार आहे. व्हॅक्सिनने सर्व प्रीक्लिनिकल चाचण्या यशस्वीपणे पार केल्या आहेत. ही पूर्णपणे सुरक्षित व प्रभावी लस आहे. कोलोरेक्टल कॅन्सर (कोलन कर्करोग) हे या लसीचे पहिले लक्ष्य असेल. संशोधन व प्रीक्लिनिकल चाचण्यांवेळी या लसीमुळे ट्युमरच्या आकारात घट होणे, ट्युमरची वाढ थांबण्यासारखे निकाल समोर आले असल्याचे स्क्वार्त्सोवा यांनी सांगितले. ही लस सर्वात आधी कोलोरेक्टल कर्करोगावर (मोठ्या आतड्यांचा कर्करोग) उपचार करण्यासाठी वापरली जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT