इस्रायलला अमेरिकेने पाकिस्तानची माफी मागायला लावली. हे सर्व एकाच स्क्रिप्टचा भाग आहे. यामागे अमेरिकेचा स्पष्ट संदेश आहे, तो म्हणजे जर आम्ही इस्रायलसारख्या देशाला झुकवू शकतो, तर भारतानेही धडा घ्यावा; पण भारताने कधीच शेपटी घालणारा भागीदार बनणे स्वीकारले नाही.
कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त)
जगाच्या भूराजकीय रंगमंचावर सध्या एक विचित्र नाटक सुरू आहे. या प्रहसनातील मुख्य कलाकार आहेत - अमेरिका, भारत, पाकिस्तान आणि इस्रायल. या चौघांच्या हालचालींवरून स्पष्ट दिसते की, अमेरिकेचा ‘सामरिक फार्स’ म्हणजेच एक बनावट, नाटकी मुत्सद्देगिरीचा खेळ जगासमोर रंगतो आहे. भारत आज अमेरिकेच्या दबावाला न जुमानता आपले स्वतंत्र परराष्ट्र धोरण ठामपणे राबवतो आहे. रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करणे, ‘बिक्स’ आणि शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनमध्ये सक्रिय राहणे, चीनविरोधी अमेरिकन मोहिमेत सहभागी न होणे, हे सारे भारताचे स्वतंत्र निर्णय आहेत.
अमेरिकेला हे अजिबात रुचत नाहीये. म्हणूनच अमेरिका आज पाकिस्तानला पुन्हा गोंजारत आहे. पाकचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांना सन्मान देऊन, आर्थिक आणि राजकीय मदतीची आश्वासने देऊन, अमेरिका भारतावर अप्रत्यक्ष दबाव आणू पाहत आहे. त्यात इस्रायललाही सहभागी करून घेत आहे. या बाणेदार राष्ट्राला अमेरिकेने पाकिस्तानकडे दिलगिरी व्यक्त करायला लावली. इतिहासात हे कधीच घडले नव्हते. ही सर्व काही मुत्सद्देगिरी नव्हे, तर एक नाटकी खेळ आहे, ज्यामागे सूत्रधार आहे अमेरिका.
स्वातंत्र्यानंतर भारताने नेहमीच स्वायत्त धोरण ठेवले. नेहरूंचे अलिप्ततेचे धोरण असो किंवा मोदींचे ‘मल्टी-अलाईनमेंट.’ भारताने कधीच कोणाच्याही मागे शेपटी घालणारा भागीदार बनणे स्वीकारले नाही. आजही भारत आपल्या आर्थिक आणि सामरिक निर्णयांत पूर्ण स्वतंत्र आहे. चीन आणि रशियाशी व्यवहार ठेवत, अमेरिकेशी मैत्री राखणे हे संतुलित बहुधुवीय धोरण भारताने जाणूनबुजून स्वीकारले आहे. अमेरिकेला मात्र भारताकडून ‘होकार’ अपेक्षित आहे. ती ज्या देशाला मदत करते, त्याने तिचे ऐकावे हा अमेरिकेचा स्वभाव आहे; पण भारताने हा दबाव नाकारल्यामुळेच वॉशिंग्टनमध्ये तणाव आहे.
भारताने अमेरिकेच्या अटी नाकारताच, पाकिस्तान पुन्हा ‘उपयुक्त मित्र’ म्हणून पुढे आणला गेला. जी आर्मी स्वतःच्या देशाला उद्ध्वस्त करते आहे, तिच्याच प्रमुखाला अमेरिका फिल्ड मार्शल दर्जा देते. त्याचबरोबर, इस्रायललाही पाकिस्तानकडे माफी मागायला लावले जाते, हे सर्व एकाच स्क्रिप्टचा भाग आहे. यामागे अमेरिकेचा स्पष्ट संदेश आहे, तो म्हणजे ‘जर आम्ही इस्रायलसारख्या देशाला झुकवू शकतो, तर भारतानेही धडा घ्यावा.’
अमेरिकेची दोस्ती भावनांवर नव्हे, तर स्वार्थावर आधारलेली असते. तिच्या दृष्टीने कोणताही देश मित्र नसतो. तो फक्त उपयुक्त सहकारी असतो. ज्याने तिचे ऐकले नाही, तो तत्काळ विरोधक ठरतो आणि ज्याने तिची स्तुती केली, तो लगेच लोकशाहीचा साथीदार बनतो. पाकिस्तानच्या बाबतीतही हेच दिसते. ओसामा बिन लादेनला लपवून ठेवणाऱ्या, जिहाद्यांना पैसे पुरवणाऱ्या पाकिस्तानला आज अमेरिका पुन्हा मित्र म्हणते आहे. कारण, सध्या तिला भारताविरुद्ध त्या ‘स्पेअर टायर’ची गरज आहे.
इस्रायलने आजवर कधी कोणत्याही देशाची माफी मागितली नाही; पण ट्रम्प यांच्या आग््राहाखाली पाकिस्तानकडे दिलगिरी व्यक्त करणे म्हणजेच या नाटकाचा सर्वोच्च टप्पा आहे. ही सर्व ‘कूटनीती’ नसून, ट्रम्प यांचा व्यक्तिगत सूडभाव आहे. भारताने ट्रम्प यांना युद्धविरामाचे श्रेय देण्यास नकार दिला, म्हणूनच त्यांनी आता पाकिस्तान आणि इस्रायलच्या माध्यमातून भारताला अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
अमेरिका सध्या ‘डीप स्टेट’ म्हणजेच पडद्यामागील कारस्थाने रचणाऱ्या संस्थांद्वारे भारतावर दबाव आणते आहे. पाकिस्तानला जवळ करणे, इस्रायलकडून माफी मागवणे, ट्रम्पचे भारतविरोधी संकेत हे सगळे भारताच्या स्वायत्ततेला धक्का देण्याचे साधन आहे; पण भारत अशा दबावाखाली झुकणारा नाही. त्याने रशिया आणि चीनशी आपले संबंध बळकट केले आहेत. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता आणली आणि जागतिक पटलावर आर्थिक व सामरिक प्रभाव वाढवला.
आज अमेरिकेच्या दबावाखाली इस्रायल नमतो आहे, पाकिस्तान खुशीत आहे आणि ट्रम्प स्वतःला विजयी समजत आहेत; पण हे नाटक संपल्यावर परिस्थिती पुन्हा पूर्ववत होईल. अमेरिका पाकिस्तानला पुन्हा अडगळीत टाकेल. इस्रायल पुन्हा आपले जुने आक्रमक धोरण अवलंबेल आणि भारताशी पुन्हा व्यापारी-आर्थिक संपर्क साधण्याचा प्रयत्न होईल. कारण, भारताशिवाय कोणतेही आंतरराष्ट्रीय समीकरण पूर्ण होत नाही. भारत आज जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे. प्रचंड बाजारपेठ, कुशल मनुष्यबळ, स्थिर राजकीय नेतृत्व आहे. या सगळ्यामुळे तो अमेरिकेसाठी मित्रही आहे आणि प्रतिस्पर्धीही. अमेरिकेला पाकिस्तानमध्ये चीनविरोधी धोरण राबवण्यासाठी एक प्रादेशिक साधन हवे आहे. असीम मुनीरसारख्या जनरलच्या माध्यमातून भारताला दडपण्याचा प्रयत्न होतो आहे; पण तो यशस्वी होईल, असे वाटत नाही. पाकिस्तानचे राजकीय आणि आर्थिक अस्तित्व अस्थिर आहे. भष्टाचार, दहशतवादी संघटनांची ताकद आणि अंतर्गत असंतोष या तिन्ही गोष्टींनी त्याची कंबर मोडली आहे. अशा देशावर दीर्घकालीन पैज लावणे अमेरिकेसाठीही अशक्य आहे. म्हणूनच या जवळिकीचा शेवट पूर्वीसारखाच होईल. अमेरिका पाकिस्तानला पुन्हा अडगळीत टाकेल.
अमेरिकेच्या दबावाला प्रत्युत्तर देताना भारताकडे प्रमुख धोरणात्मक पर्याय आहेत - अमेरिकेच्या दबावाला न जुमानता, आपल्या हितसंबंधांच्या आधारे निर्णय घ्यावे. तेल खरेदी, संरक्षण करार, व्यापार अटी सर्व काही देशहितावर आधारित असावे. लॅटिन अमेरिका, आफ्रिका आणि दक्षिण-पूर्व आशियाशी संबंध वाढवून भारत ‘ग्लोबल साऊथ’चा नेतृत्वकर्ता बनू शकतो. यामुळे अमेरिका आणि युरोपचा दबाव कमी होईल. दुसरीकडे, स्वदेशी उत्पादन, संरक्षण उपकरणे आणि ऊर्जा स्वावलंबन ही भारताची खरी ताकद बनेल. अमेरिकेच्या निर्बंधांची भीती अशावेळी महत्त्वाची राहणार नाही.
आज भारताचे सर्वात मोठे शस्त्र म्हणजे दूरदृष्टी असलेले नेतृत्व. अमेरिका, चीन आणि रशियासारख्या महासत्तांशी एकाचवेळी संवाद साधणे, इस्रायलसारख्या देशाशी सामरिक सहकार्य राखणे आणि तरीही मध्य पूर्वेत संतुलन ठेवणे हे काम अत्यंत नाजूक आणि तितकेच जटिल आहे. भारत ते करत आहे; कारण त्याचा पाया विश्वास आणि स्वायत्तता यावर उभा आहे. भारत कोणाच्याही विरोधात नव्हे, तर सर्वांच्या समतोलात कार्य करतो. हाच त्याचा नवा राजकीय बँड आहे.