अपर्णा देवकर
युरोपियन आयोगाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात ‘जनरेशन झेड’ म्हणजेच 1997 ते 2010 दरम्यान जन्मलेल्या पिढीला सोशल मीडियामुळे तणाव व थकव्याचा सामना करावा लागत असल्याचे सांगितले असून, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. याचे कारण असे की, ही पहिली पिढी आहे, जिला अगदी लहान वयातच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म उपलब्ध झाले.
डिजिटल युगात वाढलेली ही पिढी तंत्रज्ञान, सोशल मीडिया आणि इंटरनेट यांच्याशी सुसंगत तर आहेच; पण पारंपरिक मूल्यांना आव्हान देणारी आणि स्वतःची मूल्ये, महत्त्वाकांक्षा व जीवनशैलीमध्ये नवीन द़ृष्टिकोन घेऊन येणारी म्हणूनही ओळखली जाते. मात्र, युरोपियन आयोगाचा अभ्यास स्पष्ट करतो की, सोशल मीडियाचा अतिवापर केल्यामुळे या पिढीतील किशोरवयीन आणि तरुणांमध्ये मानसिक थकवा, चिंता, ‘फोमो’ (फियर ऑफ मिसिंग आऊट), थकवा आणि सतत मोबाईलमध्ये गुंतून राहण्यासारखे वर्तन मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. 2024 च्या वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्टमध्येही हेच निदर्शनास आले होते की, जनरेशन झेड वयोगटातील तरुण सर्वाधिक असमाधानी आणि दुःखी आहेत आणि त्यांच्यातील तणाव वा नैराश्याचे कारण अभ्यास किंवा करिअरचा ताण नसून सोशल मीडिया आहे.
खरे तर कोरोना महामारीच्या काळात जेव्हा जगभरात लॉकडाऊन लागला होता आणि लोकांचे संपूर्ण आयुष्य इंटरनेटवर केंद्रित झाले होते, तेव्हा या पिढीसाठी शिक्षणापासून ते मनोरंजन व सामाजिक जीवनापर्यंत सर्व काही ऑनलाईन झाले होते. याच काळात ही पिढी शिक्षण, करिअर आणि नोकरीच्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करण्याच्या भीषण दबावाखाली सापडली होती.
पण दुर्दैव असे की, हीच पिढी आज जगभरात सांस्कृतिक पुनरुज्जीवन, राजकीय कट्टरता, जागतिक संघर्ष, हवामान बदल, पर्यावरणाचा र्हास आणि बेरोजगारी यांचा अनुभव घेत आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चाललेल्या या नकारात्मक प्रवृत्तींमुळेही ही पिढी अस्वस्थ आणि निराश होत आहे. कारण, सोशल मीडियावरील बहुतांश कंटेंट काल्पनिक आणि कृत्रिम असतात; पण हीच पिढी सोशल मीडियावर सर्वाधिक वेळ घालवते, त्यामुळे जेव्हा त्यांचा सामना जगाच्या कठोर वास्तवाशी होतो, तेव्हा त्यांचे व्यथित होणे आणि अस्वस्थ होणे स्वाभाविक आहे. सोशल मीडियाने या पिढीचा आत्मविश्वासही ढासळवला आहे.
या समस्येचे उत्तर काय? या प्रश्नावर विचार करताना दिसते की, अनेक देशांनी विशेषतः किशोरवयीन मुला-मुलींसाठी सोशल मीडियाच्या वापराबाबत कडक नियम लागू केले आहेत. सोशल मीडियाचे व्यसन कमी करण्यासाठी त्याचा योग्य उपयोग करणे आवश्यक आहे. म्हणजे फक्त करमणुकीसाठी नव्हे, तर आरोग्यदायी संवाद आणि शैक्षणिक उपयोगासाठी त्याचा वापर करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे ‘स्क्रीन टाईम’चा संतुलित वापर हासुद्धा अत्यावश्यक आहे. सोशल मीडियावर संवाद होतो; पण तो एकांगी आणि कृत्रिम असतो. प्रत्यक्ष संवाद मानसिक आरोग्यासाठी पोषक ठरतो. त्यामुळे घरामध्ये पालकांनी आपल्या मुलांशी दिवसातून काही वेळ प्रत्यक्ष बोलणे, त्यांचे विचार जाणून घेणे आणि त्यांच्या अनुभवांना मान्यता देणे महत्त्वाचे आहे.
शाळांमध्ये मानसिक आरोग्य, आत्मभान, तणाव निवारण आणि भावनिक समज याबाबतीत शिक्षण देणे आवश्यक झाले आहे. मुलांना भावनिक बुद्धिमत्ता (इमोशनल कोशंट) शिकवणे ही काळाची गरज आहे. यासाठी मानसोपचारतज्ज्ञ व सल्लागार मंडळींचे नियमित सत्र घेतले जावेत. सोशल मीडियावर इतरांचे आयुष्य नेहमीच सुंदर व परिपूर्ण भासते. ही कृत्रिम झलक अनेकांना न्यूनगंडात टाकते. त्यामुळे स्वतःची ओळख, क्षमता आणि मर्यादा समजून घेणे, स्वतःवर प्रेम करणे हे शिकवले पाहिजे.