सुचित्रा दिवाकर
सागरी जीवन वैविध्यतेने व्यापलेले असताना तितकेच गूढही आहे. समुद्रातील लाखो प्रजाती पर्यावरण संतुलन साधण्याचे काम करत असून, त्यांचे संरक्षण करणे आणि सुरक्षित ठेवणे मानवाची जबाबदारी आहे; पण अलीकडच्या काळात स्वार्थापोटी मानवाकडून सागरी संपत्तीचा विनाश केला जात असताना त्याचे परिणाम माशांना भोगावे लागत आहेत. पृथ्वीवरचा नैसर्गिक समतोल ढासळत असून, त्याचे दुष्परिणाम समुद्र जीवनावर होत आहेत. ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत असल्याने माशांचा श्वास गुदमरताना दिसत आहे.
आज समुद्रातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी असणे गंभीर समस्या मानली जात आहे. महाकाय महासागरात 17 लाख चौरस मैलांपेक्षा अधिक भागात ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. हे प्रमाण एकूण समुद्राच्या चार ते पाच टक्के आहे; पण काही ठिकाणी तर त्याचे प्रमाण 15 टक्क्यांपेक्षा अधिक राहिले आहे. अर्थात, ही समस्या हवामान बदलामुळे होणार्या समुद्राच्या तापमानातील वाढीच्या तुलनेत आणि बदलापेक्षा आणखी गंभीर आहे. नेदरलँडच्या रेडबोर्ड विद्यापीठातील इको फिजिओलॉजिस्ट विल्को वर्बर्कच्या मते, समुद्रातील वाढत्या तापमानामुळे ऑक्सिजनमध्ये घट होत आहे. 70 अंश फॅरेनहाईटपर्यंत उष्ण होण्याची बाब ही स्वाभाविकपणे समुद्रातील ऑक्सिजन कमी करणारी आहे. जेव्हा समुद्रात ऑक्सिजन कमी होतो, तेव्हा माशांचे आणि अन्य समुद्री जीवांसाठी जीवन जगणे असह्य होते, कारण माशांनाही श्वास घ्यावा लागतो.
1960 ते 2010 या काळात जगभरातील महासागरात सरासरी 2 टक्के ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले. एका शास्त्रज्ञांच्या मते ऑक्सिजन कमी राहण्याचे प्रमाण हे या शतकाच्या शेवटपर्यंत 7 टक्क्यांपर्यंत पोहोचले तर काही विशेष भागांत जसे पूर्वोत्तर प्रशांत येथे ऑक्सिजनचे प्रमाण 15 टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणात कमी राहू शकते. त्यामुळे 25 ते 30 टक्के सागरी जीवांच्या प्रजातींनी स्थलांतर केले आहे किंवा लुप्त झाल्या आहेत. आयपीसीसीच्या 2019 च्या अहवालानुसार 1970 ते 2010 या काळात महासागरातील काही भागांत ऑक्सिजन कमी राहिल्याने मोठ्या संख्येने माशांची संख्या घटली. आता या क्षेत्रात जेलीफिशसारख्या माशांची सख्ंया वाढली आहे आणि हे मासे कमी ऑक्सिजनच्या स्थितीतही जिवंत राहू शकतात. जेलिफिशची संख्या 3 ते 8 टक्क्यांनी वाढली आहे. यानुसार सागरी जीवनात असामान्य रूपातून बदल होत असल्याचे दिसून येत आहे.
ईशान्य चीनच्या सागरी किनार्यावर बॉम्बे डक माशाच्या प्रजातीचे प्रजनन वेगाने वाढत आहे. बॉम्बे डक ही जेलीफिशसद़ृश प्रजात असून, ती कमी ऑक्सिजनमध्येही जिवंत राहू शकते आणि विशेष म्हणजे कमी ऑक्सिजन असणार्या भागात त्यांची संख्या वाढत आहे. एक दशकापूर्वी दर तासाला 40 ते 50 पौंड मासे पकडले जात असताना, तेथे हे प्रमाण 440 पौंडांपर्यंत वाढले आहे. ब्रिटिश कोलंबियाच्या विद्यापीठातील मत्स्यपालन संशोधक डॅनियल पॉली यांच्या मते, या माशांचे वाजवीपेक्षा अधिक प्रमाण धोक्याची घंटा मानली जात आहे. अर्थात, ही वाढ सागरी जीवनात असंतुलन निर्माण होण्याचे संकेत देत आहेत. ऑक्सिजनच्या अभावामुळे अन्य माशांच्या प्रजाती मृत झाल्या असाव्यात किंवा त्यांनी जागा बदलली असेल.
बॉम्बे डक ही प्रजात कमी ऑक्सिजन असतानाही जिवंत राहू शकते. या स्थितीतून जागतिक इकोलॉजीत असंतुलन निर्माण हेाऊ शकते. सागरी ऑक्सिजनमधील घट होण्याची समस्या ही ग्लोबल वार्मिंगपेक्षा गंभीर आहे; कारण त्यामुळे समुद्रातील जीव, अधिवास, स्थिती तंत्र यांवर गंभीर परिणाम होत आहेत. शास्त्रज्ञांच्या मते, भविष्यात समुद्र अधिक उष्ण झाल्यास ऑक्सिजनचे प्रमाण आणखी कमी राहू शकते आणि त्यामुळे सागरी जीवनाच्या रचनेत मोठा बदल होऊ शकतो. सागरी जगातील ऑक्सिजनमधील घट ही जागतिक पर्यावरणाच्या संकटाची एक बाजू आहे. यामुळे केवळ सागरी जीवनावरच परिणाम होत नाही, तर पृथ्वीवरच्या इकोसिस्टीमलाही धोक्यात आणत आहेत. याचा गुंता सोडवायचा असेल तर ग्लोबल वार्मिंग व अन्य पर्यावरणीय मुद्द्यांना सामूहिक प्रयत्नांतून सोडवावे लागेल.