

बोरगाव; पुढारी वृत्तसेवा : वाळवा तालुक्यातील बहे बंधारा, बहे पूल परिसरात कृष्णा नदीपात्रात मिसळलेल्या केमिकलयुक्त पाण्यामुळे बहे बंधार्यालगत मृत माशांचा खच लागला होता. या मृत माशांमुळे नदीकाठावर दुर्गंधी पसरली आहे. पाणी दूषित झाले होते.
नेहमीच कृष्णा नदीपात्रात औद्योगिक वसाहत, साखर कारखाने यामधून रसायनयुक्त पाणी नदीपात्रात सोडले जाते. मासे मृत होण्याचा प्रकार हा नदीकाठच्या लोकांना नवा नाही. नेहमीच नदीपात्रातील पाण्याची पातळी, प्रशासकीय सुट्टीचा दिवस, रात्रीच्यावेळी अनेकदा रसायनमिश्रित पाणी नदीपात्रात सोडले जाते.
बहे दरम्यान नदीपात्रात शनिवारी मध्यरात्रीपासून रसायनयुक्त पाणी मिसळले. त्यामुळे मासे तडफडून पाण्यावरती तरंगत होते. पाण्याला तेलकट स्वरूपाचा तवंग आला होता. मृत माशामुळे नदीकाठावर दुर्गंधी पसरली होती.
नदीकाठच्या अनेक गावांच्या पाणी योजनांचा पाणी उपसा तेथील नदीपात्रातून होतो. रसायनमिश्रित, दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे अनेक गावात भविष्यात साथीचे आजार पसरण्याची शक्यता आहे. शासनाने नदीपात्रात रसायनयुक्त पाणी सोडणार्यांवर तातडीने कायदेशीर कारवाई करू, अशी मागणी नदीकाठच्या नागरिकांतून होत आहे.