विनिता शा
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ताज्या मासिक बुलेटिननुसार, जागतिक आर्थिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर भारताने पुन्हा एकदा गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकला आहे. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते जुलै या कालावधीत देशात शुद्ध प्रत्यक्ष परकीय गुंतवणूक म्हणजेच ‘एफडीआय’ वार्षिक तुलनेत तब्बल 208.57 टक्क्यांनी वाढून 10.8 अब्ज अमेरिकन डॉलर झाला आहे. गेल्यावर्षी याच काळात ही रक्कम फक्त 3.5 अब्ज डॉलर इतकी होती. त्याच कालावधीत सकल ‘एफडीआय’मध्येही मोठी झेप दिसून आली असून, ती 33.2 टक्क्यांनी वाढून 37.7 अब्ज डॉलर इतकी झाली आहे, तर मागील आर्थिक वर्षात ही रक्कम 28.3 अब्ज डॉलर होती. या आकड्यांवरून भारताची उत्पादन क्षमता, तंत्रज्ञान आणि सेवा क्षेत्रातील स्थैर्य गुंतवणूकदारांना आकर्षित करत असल्याचे स्पष्ट होते.
जुलै 2025 मध्ये ‘एफडीआय’ने मागील चार वर्षांतील उच्चांक गाठला असला, तरी ऑगस्ट महिन्यात यात काहीशी मंदी दिसून आली. त्या महिन्यात सकल ‘एफडीआय’ 6 अब्ज डॉलर इतका राहिला, जो जुलैच्या 11.11 अब्ज डॉलरच्या तुलनेत 5.11 अब्ज डॉलरने कमी होता. त्याचवेळी परदेशी कंपन्यांनी आपल्या गुंतवणुकीतील काही हिस्सा परत घेतल्याने निधी परतावा 30 टक्क्यांनी वाढून 4.9 अब्ज डॉलर झाला. त्यामुळे शुद्ध ‘एफडीआय’चा प्रवाह 61.6 कोटी डॉलरच्या बाहेर जाणार्या प्रवाहात म्हणजेच आऊटफ्लोमध्ये बदलला.
या बुलेटिननुसार, भारतीयांचा परदेश प्रवास आणि शिक्षणासाठीचा खर्चही वाढत आहे. ऑगस्ट महिन्यात भारतीयांनी परदेश प्रवासावर 1.61 अब्ज डॉलर खर्च केले, जो जुलैच्या 1.14 अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे. परदेशात शिक्षणासाठी झालेला खर्चही 39 टक्क्यांनी वाढून 31.9 कोटी डॉलर झाला आहे. दुसरीकडे, प्रवासी भारतीयांनी म्हणजेच ‘एनआरआय’नी ऑगस्ट महिन्यात देशात 2.6 अब्ज डॉलर इतकी रक्कम पाठवली असून, ती जुलैच्या तुलनेत 7.7 टक्क्यांनी जास्त आहे. या प्रवृत्यांवरून देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय आर्थिक चक्रांमध्ये भारतीय नागरिकांचा सहभाग वाढत चालल्याचे दिसून येते.
रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, सध्याच्या जागतिक अस्थिरतेत भारताने आपली अर्थव्यवस्था लवचिक ठेवल्याचे सिद्ध केले आहे. रशियाकडून कच्च्या तेलाच्या खरेदीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेकडून लागू करण्यात आलेल्या व्यापार शुल्कांचा भारताच्या वाढीवर फारसा परिणाम झाला नाही. कारण, देशाने आपल्या जागतिक व्यापारावरील अवलंबित्वात सातत्याने घट केली आहे. मजबूत स्थानिक मागणी, सरकारी पायाभूत खर्च आणि निर्यातीतील विविधीकरण, यामुळे भारताची अर्थव्यवस्था जागतिक मंदीच्या वातावरणातही स्थिर राहिली आहे.
‘एफडीआय’मध्ये झालेली झपाट्याची वाढ केवळ आर्थिक यशाचे द्योतक नाही, तर ती राजकीय स्थैर्य, नियामक पारदर्शकता आणि उद्योगांना पोषक वातावरण यांचाही पुरावा आहे. विदेशी गुंतवणूकदारांच्या द़ृष्टीने भारत आता जोखीम घेण्यास पात्र; पण विश्वासार्ह बाजारपेठ बनला आहे. तंत्रज्ञान, अक्षय ऊर्जा, इलेक्ट्रॉनिक उत्पादन आणि डिजिटल सेवांसारख्या नव्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत असल्याने रोजगारनिर्मिती आणि निर्यातीची क्षमता दोन्ही वाढत आहेत. भारत आता जगातील सर्वाधिक आकर्षक गुंतवणूक गंतव्यस्थान म्हणून उदयास येत आहे. ‘एफडीआय’मधील ही सततची वाढ केवळ अर्थव्यवस्थेच्या सुद़ृढतेचा नाही, तर देशाच्या जागतिक आर्थिक सामर्थ्याकडे वाटचाल करणार्या प्रवासाचा पुरावा आहे.