मुरलीधर कुलकर्णी
बँकॉक, थायलंड येथे 21 नोव्हेंबर 2025 रोजी पार पडलेल्या 74 व्या ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेच्या अंतिम सोहळ्यात मेक्सिकोच्या फातिमा बॉश फर्नांडिस हिने ‘मिस युनिव्हर्स 2025’चा झगमगता मुकुट परिधान करून इतिहास घडवला. जगभरातील 100 हून अधिक देशांच्या सौंदर्यवतींशी अत्यंत कडाक्याची स्पर्धा करत फातिमाने हे यश संपादन केले. अंतिम फेरीत तिने थायलंडच्या प्रविणार सिंग हिचा पराभव करून तिला उपविजेतेपदावर समाधान मानण्यास भाग पाडले. फातिमाचा हा विजय केवळ बाह्य सौंदर्याचा नसून, तिच्या असामान्य बुद्धिमत्तेचा आणि संघर्षाचा विजय आहे.
फातिमाचा जन्म 19 मे 2000 रोजी मेक्सिकोच्या तबास्को राज्यातील ‘टियापा’ गावी झाला. वडील बर्नार्डो बॉश हर्नांडेझ आणि आई व्हॅनेसा फर्नांडिस बाल्बोआ यांच्या संस्कारात वाढलेल्या फातिमाचे बालपण अतिशय आव्हानात्मक होते. शालेय वयात तिला ‘डिस्लेक्सिया’ आणि ‘एडीएचडी’ या समस्यांचे निदान झाले होते. डिस्लेक्सियामुळे तिला वाचन आणि अक्षरे ओळखण्यात अडचण येत असे, तर एडीएचडीमुळे एकाग्रतेचा अभाव आणि अतिचंचलता यांसारख्या समस्या होत्या. मात्र, याला आपली कमजोरी न मानता तिने जिद्दीने शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिने मेक्सिको सिटी आणि इटलीतील मिलान येथून फॅशन डिझाईनचे उच्च शिक्षण घेतले. 2018 मध्ये ‘फ्लोर तबास्को’ हा किताब जिंकून तिने आपल्या यशस्वी प्रवासाची मुहूर्तमेढ रोवली होती.
मिस युनिव्हर्सच्या प्रवासात तिला एका गंभीर वादाला आणि अपमानाला सामोरे जावे लागले. स्पर्धेपूर्वी काही समीक्षकांनी तिच्या या वैद्यकीय स्थितीचा (न्यूरो डायव्हरजन्स) संदर्भ देत तिच्या बुद्धिमत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ‘ती केवळ बाहुलीसारखी सुंदर आहे; पण तिच्याकडे विश्वसुंदरी होण्यासाठी लागणारी बुद्धिमत्ता नाही,’ अशी टीका तिच्यावर झाली. पण, या अपमानाला फातिमाने अत्यंत संयमाने आणि करारी उत्तर दिले. ‘न्यूरोडायव्हर्जंट असणे (मेंदूची वेगळी जडणघडण असणे) म्हणजे कमी हुशार असणे नव्हे, तर ती जगाकडे वेगळ्या द़ृष्टीने पाहण्याची शक्ती आहे,’ असे सांगत तिने स्वतःचा स्वाभिमान जपला. तिच्या या उत्तराने आणि त्यानंतरच्या विजयाने मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शेनबॉम यांनाही भुरळ घातली, ज्यांनी तिला देशाचा अभिमान म्हटले.
ग्लॅमरस जगाच्या पलीकडे जाऊन ती गेल्या नऊ वर्षांपासून कर्करोगग्रस्त मुलांसाठी काम करत आहे. तसेच ती ‘सस्टेनेबल फॅशन’ची खंबीर पुरस्कर्ती असून, टाकून दिलेल्या वस्तूंपासून कपडे बनवण्याचे प्रयोग ती करते. अंतिम फेरीत तिने दिलेला ‘तुमच्या अस्सलतेवर आणि स्वतःच्या अस्तित्वावर विश्वास ठेवा,’ हा संदेश उपस्थितांची मने जिंकून गेला. फातिमाचा हा प्रवास तिच्यातील जिद्द, सामाजिक भान आणि स्वतःच्या कमतरतांवर मात करण्याच्या करारी वृत्तीचे प्रतीक आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.